YouVersion Logo
Search Icon

मार्क 3

3
शब्बाथ दिवशी येशू बरे करतात
1आणखी एका वेळेला येशू सभागृहामध्ये गेले आणि तिथे हात वाळलेला एक मनुष्य होता. 2काही लोक त्यांच्यावर आरोप ठेवण्यास कारण पाहत होते, शब्बाथ दिवशी येशू त्याला बरे करतात काय हे पाहण्यासाठी बारकाईने नजर ठेवून होते. 3येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाले, “असा सर्वांसमोर उभा राहा.”
4नंतर येशू त्यांना म्हणाले, “शब्बाथ दिवशी नियमानुसार कोणती गोष्ट योग्य आहे: चांगली कामे करणे किंवा वाईट कामे करणे, जीव वाचविणे किंवा जीव घेणे?” परंतु ते शांत बसले.
5त्यांनी सभोवार जमलेल्यांकडे रागाने आपली नजर फिरविली आणि त्यांची कठीण हृदये पाहून ते अत्यंत अस्वस्थ झाले व त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात पहिल्यासारखा बरा झाला. 6यानंतर परूश्यांनी जाऊन येशूंना कसे जिवे मारता येईल याविषयी हेरोदियांबरोबर योजना केली.
समुदाय येशूंच्या मागे जातो
7इकडे येशू आणि त्यांचे शिष्य सरोवराकडे निघून गेले. त्यांच्यामागे गालील प्रांतातून मोठा समुदाय आला होता. 8येशूंनी जे सर्वकाही केले होते ते ऐकून, पुष्कळ लोक त्यांच्याकडे यहूदीया, यरुशलेम, इदूमिया, यार्देन नदीपलीकडील प्रदेश, सोर व सीदोन येथून आले होते. 9तिथे गर्दी असल्यामुळे व येशूंच्या भोवती लोकांची गर्दी थांबविण्यासाठी त्यांनी शिष्यांना एक लहान होडी तयार ठेवावी असे सांगितले. 10कारण त्यांनी पुष्कळांना बरे केले होते, त्यामुळे जे लोक आजारी होते ते येशूंना स्पर्श करावा म्हणून पुढे रेटत होते. 11जेव्हा अशुद्ध आत्म्यांनी पछाडलेले त्यांना पाहत असत, तेव्हा ते त्यांच्यापुढे खाली पडत आणि मोठ्याने ओरडून म्हणत, “तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात!” 12परंतु त्यांनी त्यांना सक्त ताकीद दिली की त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका.
येशू बारा प्रेषितांची निवड करतात
13येशू डोंगरावर गेले आणि त्यांना ज्यांची गरज होती त्यांना स्वतःकडे बोलाविले आणि ते त्यांच्याकडे आले. 14तेव्हा त्यांनी बारा जणांची#3:14 काही मूळ प्रतींमध्ये 12 प्रेषित असे संबोधिले आहे. निवड केली, यासाठी की त्यांनी त्यांच्याबरोबर असावे आणि प्रचार करण्यासाठी बाहेर पाठविता यावे 15आणि त्यांना भुते काढण्याचा अधिकार द्यावा.
16त्यांनी नेमणूक केलेल्या बारा जणांची नावे अशी:
शिमोन (याला त्यांनी पेत्र हे नाव दिले),
17जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान (त्यांना बोओनेग्रेस हे नाव दिले, याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होता),
18आंद्रिया,
फिलिप्प,
बर्थलमय,
मत्तय,
थोमा,
अल्फीचा पुत्र याकोब,
तद्दय,
शिमोन कनानी#3:18 कनानी हा एक राष्ट्रवादी पक्ष असून त्यांनी रोमी सत्तेला विरोध केला शिमोन त्यांच्यापैकी एक होता.
19आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने त्यांचा विश्वासघात केला.
येशूंवर नियमशास्त्राच्या शिक्षकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप
20येशू एका घरात गेले आणि समुदायाने पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना भोजन करण्यासही वेळ मिळेना. 21येशूंच्या कुटुंबीयांनी#3:21 किंवा साथीदारांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते त्यांना घेऊन जाण्यासाठी आले, कारण ते म्हणाले, “याला वेड लागले आहे.”
22आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्र शिक्षक म्हणाले, “तो बालजबूलाने पछाडलेला आहे! तो भुतांचा राजा सैतान याच्या साहाय्याने भुते घालवितो.”
23येशूंनी त्यांना जवळ बोलाविले आणि त्यांच्याबरोबर दाखल्याने बोलण्यास सुरुवात केली: “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल? 24जर एखाद्या राज्यात फूट पडली तर ते राज्य स्थिर राहू शकत नाही. 25जर एखाद्या घरात फूट पडलेली आहे, तर ते घर स्थिर राहू शकत नाही. 26सैतानच स्वतःविरुद्ध झाला आणि सैतानातच फूट पडली तर त्याचा टिकाव लागणार नाही; त्याचा शेवट झालाच आहे. 27खरोखर, एखाद्या बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बळकट मनुष्याला बांधले पाहिजे मगच त्याचे घर लुटता येईल. 28मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मनुष्याला सर्व पापांची व प्रत्येक दुर्भाषण केल्याची क्षमा होईल, 29परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही; ते सार्वकालिक पापाचे दोषी आहेत.”
30असे त्यांनी म्हटले कारण येशूंमध्ये, “अशुद्ध आत्मा आहे” असे ते म्हणत होते.
31इतक्यात येशूंची आई आणि भाऊ येऊन बाहेर उभे राहिले आणि एकाला त्यांना बोलविण्यास पाठविले. 32त्यांच्या सभोवती समुदाय बसला होता आणि त्याने त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर थांबले आहेत आणि ते तुमचा शोध घेत आहेत.”
33यावर त्यांनी म्हटले, “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?”
34नंतर सभोवतालच्या समुदायाकडे नजर फिरवित ते म्हणाले, “ही माझी आई आणि माझे भाऊ आहेत! 35जो कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि आई आहे.”

Currently Selected:

मार्क 3: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in