YouVersion Logo
Search Icon

मार्क 2

2
येशू पक्षघाती मनुष्याला बरे करून क्षमा करतात
1काही दिवसानंतर, जेव्हा येशू कफर्णहूम या ठिकाणी पुन्हा आले, तेव्हा लोकांनी ऐकले की ते घरी आले आहेत. 2ते इतक्या मोठ्या संख्येने जमले की जागा उरली नाही, दाराबाहेरही जागा उरली नाही आणि येशूंनी वचनातून लोकांना उपदेश केला. 3तेवढ्यात काही लोक एका पक्षघाती मनुष्याला त्यांच्याकडे घेऊन आले, त्याला चार जणांनी उचलून आणले. 4आणि तिथे मोठी गर्दी असल्यामुळे ते त्या मनुष्याला येशूंजवळ घेऊन जाऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी येशू जिथे बसले होते त्या ठिकाणचे छप्पर उघडले आणि तिथून त्या मनुष्याला त्याच्या अंथरुणासहित खाली सोडले 5जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
6हे ऐकून तिथे बसलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले, 7“हा मनुष्य अशाप्रकारे का बोलतो? तो दुर्भाषण करतो! परमेश्वराशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?”
8ते काय विचार करीत आहेत, हे येशूंनी लगेच त्यांच्या आत्म्यामध्ये ओळखले आणि ते त्यांना म्हणाले, “तुम्ही या गोष्टींचा असा विचार का करता? 9या पक्षघाती मनुष्याला ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपले अंथरूण उचलून घे व चालू लाग’? यातून काय म्हणणे सोपे आहे. 10तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” 11ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.” 12तो मनुष्य उठला आणि लगेच अंथरूण उचलून त्या सर्वांसमोर चालत गेला. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले व सर्वांनी परमेश्वराची स्तुती केली. ते म्हणाले, “आम्ही असे काही कधीही पाहिले नाही!”
लेवीला पाचारण व पापी लोकांबरोबर भोजन
13नंतर येशू पुन्हा सरोवरावर चालत गेले आणि तिथे त्यांच्याभोवती मोठा लोकसमुदाय जमा झाला व ते त्यांना शिकवू लागले. 14येशू चालत असताना जकात नाक्यावर बसलेला अल्फीचा पुत्र लेवी त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि त्यांना अनुसरला.
15येशू आणि त्यांचे शिष्य लेवीच्या घरी भोजन करत असताना, त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार व पापी लोक भोजन करत होते. कारण येशूंच्या मागे आलेले पुष्कळजण तिथे होते. 16जेव्हा नियमशास्त्र शिक्षक जे परूशी होते त्यांनी येशूंना जकातदार व पापी लोकांबरोबर जेवत असताना पाहिले, तेव्हा त्यांनी शिष्यांना विचारले, “तुमचे गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतात?”
17हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे.”
उपवासासंबंधी येशूंना प्रश्न विचारतात
18आता योहानाचे शिष्य आणि परूशी उपवास करीत होते. काही लोक येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “योहानाचे शिष्य आणि परूशी उपवास करतात, परंतु तुमचे शिष्य का करत नाही?”
19येशूंनी उत्तर दिले, “वराचे पाहुणे वर त्यांच्याबरोबर असताना उपवास कसे करू शकतात? जोपर्यंत वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत ते उपवास करू शकत नाहीत. 20परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपवास करतील.
21“नवीन कापडाचा तुकडा जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. नाहीतर ते नवीन ठिगळ वस्त्राला फाडेल आणि छिद्र अधिक मोठे होईल. 22आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जाईल, द्राक्षारस वाहून जाईल आणि द्राक्षारस व बुधल्याचा नाश होईल. नाही, तसे होऊ नये म्हणून ते नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात.”
येशू शब्बाथाचे धनी
23एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून जात होते आणि त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर चालत असताना, ते गव्हाची काही कणसे तोडू लागले. 24ते पाहून परूशी त्यांना म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे असे ते का करतात?”
25येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता व त्यांना गरज असताना त्याने काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही का? 26महायाजक अबीयाथार यांच्या दिवसात तो परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या, ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.”
27मग येशूंनी त्यांना म्हटले, “शब्बाथ मनुष्यासाठी निर्माण केला आहे, मनुष्य शब्बाथासाठी नाही. 28म्हणून मानवपुत्र#2:28 मानवपुत्र सर्वसाधारणतः येशू स्वतःला या नावाने संबोधित असे हा शब्बाथाचा देखील प्रभू आहे.”

Currently Selected:

मार्क 2: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in