YouVersion Logo
Search Icon

मार्क 4

4
पेरणी करणार्‍याचा दाखला
1येशूंनी सरोवराच्या किनार्‍यावर शिकविण्यास सुरुवात केली. पुन्हा एकदा त्यांच्याभोवती जमा झालेला समुदाय इतका मोठा होता की, ते एका होडीत बसून किनार्‍यावरील लोकांना शिकवू लागले. 2त्यांनी अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकविल्या, त्यांच्या शिक्षणात त्यांनी सांगितले: 3“ऐका! एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. 4तो बी पेरीत असताना, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. 5काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. 6परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली. 7काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, ते उगवले खरे पण काटेरी झुडूपांनी त्याची वाढ खुंटविली व त्याला पीक आले नाही. 8पण काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले, त्याची वाढ झाली आणि त्या काही ठिकाणी तीसपट, साठपट किंवा शंभरपट पीक आले.”
9मग येशू म्हणाले, “ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.”
10मग ते एकटे असताना बारा जणांनी आणि इतरांनी त्यांना दाखल्याबद्दल विचारले. 11ते म्हणाले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिले आहे. परंतु बाहेरच्यांना सर्वगोष्टी दाखल्याद्वारेच सांगण्यात येतील. 12यासाठी की,
“ते पाहत असले तरी त्यांना काही दिसत नाही,
आणि ते ऐकतात तर, परंतु काही समजत नाही;
कदाचित ते वळतील आणि त्यांची क्षमा होईल!”#4:12 यश 6:9, 10
13नंतर येशू त्यांना म्हणाले, “तुम्हाला हा दाखला समजत नाही का? तर इतर दाखले तुम्हाला कसे समजतील? 14शेतकरी वचनाची पेरणी करतो. 15काही लोक त्या वाटेवर पडलेल्या बी प्रमाणे आहेत, जिथे वचन पेरले जाते. ते वचन लगेच ऐकतात, पण सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो. 16काहीजण, खडकाळ जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात. 17पण वचनामुळे संकटे आली किंवा त्यांचा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. पण त्यांना मूळ नसल्यामुळे थोडा काळ टिकतात. 18काही असे आहेत, की ते काटेरी झुडपांमध्ये पेरणी केलेल्या बियांप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात; 19परंतु संसाराची चिंता, पैशांची लालसा व इतर गोष्टींची हाव यांची त्यांना भुरळ पडते आणि त्यामुळे परमेश्वराच्या वचनाची वाढ खुंटते व फळ येत नाही. 20याउलट काहीजण उत्तम जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात, स्वीकार करतात, पीक देतात—जे पेरले होते त्यापेक्षा तीसपट, साठपट आणि शंभरपट पीक देतात.”
दिवठणीवरील दिवा
21नंतर येशूंनी त्यांना म्हटले, “कोणी दिवा लावून मापाखाली किंवा खाटेखाली ठेवतो काय? त्याऐवजी, तुम्ही दिवठणीवर ठेवत नाही का? 22असे काही झाकलेले नाही जे उघड होणार नाही किंवा असे काही गुप्त नाही जे जाहीर केले जाणार नाही. 23ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.”
24ते त्यांना पुन्हा म्हणाले, “तुम्ही जे ऐकता ते नीट ध्यानात घ्या. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल आणि त्यापेक्षा अधिक जास्त तुम्हाला देण्यात येईल. 25कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल; ज्यांच्याजवळ नाही, त्यांच्याजवळ जे असेल नसेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.”
वाढणार्‍या बियांचा दाखला
26येशू आणखी म्हणाले, “परमेश्वराचे राज्य असे आहे. एक मनुष्य जमिनीवर बी विखरतो. 27रात्र आणि दिवस, तो झोपतो किंवा उठतो, इकडे बी उगवते आणि कसे वाढते, ते त्याला कळतही नाही. 28कारण जमीन स्वतः पीक उत्पन्न करते—पहिल्यांदा अंकुर, कणसे आणि मग कणसात दाणे भरतात. 29अशा क्रमाने पीक तयार झाल्याबरोबर तो विळा चालवून पीक कापून नेतो, कारण हंगाम आलेला आहे.”
मोहरीच्या दाण्याचा दाखला
30आणखी ते म्हणाले, “परमेश्वराचे राज्य कसे आहे किंवा कोणता दाखला देऊन त्याचे वर्णन करता येईल? 31ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो पृथ्वीवरील सर्व दाण्यापैकी सर्वात लहान असला तरी, 32तो दाणा वाढून त्याचे झाड होऊन बागेतील सर्वात मोठे झाड होते आणि त्याच्या मोठ्या फांद्यांवर आकाशातील पक्षी विसावा घेऊ शकतात.”
33अशाच प्रकारच्या अनेक दाखल्यांद्वारे जसे ते समजू शकतील तसे येशू त्यांच्यासोबत वचनाद्वारे बोलले. 34ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही. परंतु एकांतात मात्र ते आपल्या शिष्यांना सर्व स्पष्ट करून सांगत असत.
येशू वादळ शांत करतात
35त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर, येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” 36तेव्हा लोकांची गर्दी मागे सोडून शिष्य येशूंना ते जसे होडीत होते तसेच त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन गेले. इतर होड्याही त्यांच्याबरोबर होत्या. 37थोड्याच वेळात सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या आणि होडी बुडू लागली. 38येशू नावेच्या मागच्या भागास उशी घेऊन झोपी गेले होते. तेव्हा शिष्य त्यांना जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत, याची तुम्हाला काळजी नाही काय?”
39मग ते उठले आणि त्यांनी वार्‍याला धमकाविले व लाटांना, “शांत हो” असे म्हटले! तेव्हा ताबडतोब वादळ शमले आणि सर्व शांत झाले.
40त्यांनी शिष्यांना विचारले, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला अद्यापही विश्वास नाही का?”
41शिष्य घाबरून गेले आणि एकमेकास म्हणू लागले, “हे आहेत तरी कोण? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात?”

Currently Selected:

मार्क 4: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in