मार्क 5
5
येशू भूतग्रस्त मनुष्यास बरे करतात
1ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या#5:1 काही प्रतींमध्ये गदारेनेस दुसर्या प्रतींमध्ये गरगेसेनेस प्रांतात आले. 2येशू होडीतून उतरले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरस्तानातून धावत बाहेर आला. 3हा मनुष्य स्मशानभूमीत राहत होता आणि त्याला बांधून ठेवणे अशक्य होते, साखळदंडाने बांधणेही शक्य नव्हते. 4बरेचदा त्याचे हात व पाय साखळदंडाने बांधले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले व पायातील लोखंडाच्या बेड्यांचे तुकडे केले. त्याला ताब्यात ठेवण्याची ताकद कोणातही नव्हती. 5दिवस आणि रात्र तो स्वतःला दगडांनी ठेचून घेई व थडग्यामध्ये आणि डोंगरामधून मोठमोठ्याने ओरडत असे.
6येशूंना त्याने दूर अंतरावरून पाहिले व तो धावत आला आणि त्यांच्यासमोर गुडघे टेकून पाया पडला, 7तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुला माझ्याशी काय काम? परमेश्वराची शपथ मला छळू नकोस.” 8कारण येशूंनी त्याला म्हटले होते, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून बाहेर ये.”
9“तुझे नाव काय?” येशूंनी विचारले,
त्याने उत्तर दिले, “माझे नाव लेगियोन#5:9 लेगियोन अर्थात् सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळजण आहोत. 10आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नकोस,” अशी त्यांनी येशूंना पुन्हा विनंती केली.
11त्याचवेळी डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. 12“आम्हाला त्या डुकरांमध्ये जाण्याची परवानगी दे.” अशी भुतांनी येशूंना विनंती केली. 13येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली, लगेच अशुद्ध आत्मे त्या मनुष्यातून बाहेर निघाली आणि डुकरांमध्ये शिरली व त्या दोन हजार डुकरांचा कळप डोंगराच्या उतरंडी वरून धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात पडला व बुडाला.
14डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात जाऊन ही घटना सांगितली, काय घडले हे पाहावे म्हणून लोक बाहेर आले. 15जेव्हा ते येशूंकडे आले, तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिले जो भुताच्या सैन्याने पछाडलेला होता तो बसलेला, कपडे घातलेला आणि भानावर आलेला आहे; हे पाहून ते अतिशय भयभीत झाले. 16प्रत्यक्ष पाहणार्यांनी भूतग्रस्त मनुष्याचे काय झाले आणि डुकरांच्या बाबतीत काय झाले, ते सर्वांना सांगितले. 17तेव्हा येशूंनी आमच्या भागातून निघून जावे अशी लोकांनी त्यांना विनंती केली.
18येशू पुन्हा होडीत चढत असताना, जो मनुष्य पूर्वी भूतग्रस्त होता, त्याने आपल्यालाही बरोबर न्यावे, अशी येशूंना विनंती केली. 19पण येशूंनी ती मान्य केली नाही, परंतु ते त्याला म्हणाले, “आपल्या प्रियजनांकडे घरी जा आणि प्रभूने तुझ्यासाठी जे काही केले आणि तुझ्यावर किती मोठी दया केली हे त्यांना सांग.” 20त्याप्रमाणे तो मनुष्य गेला आणि त्या भागात असलेल्या दकापलीस#5:20 दकापलीस अर्थात् दहा गावे येथे येशूंनी त्याच्यासाठी किती मोठ्या गोष्टी केल्या हे सांगू लागला आणि प्रत्येकजण विस्मयाने थक्क झाला.
येशू मृत बालिकेला जिवंत करतात व आजारी स्त्रीस बरे करतात
21जेव्हा येशू होडीत बसून पलीकडच्या तीरावर गेले, तेव्हा त्यांच्याभोवती खूप मोठा समुदाय गोळा झाला, त्यावेळी ते सरोवराच्या किनार्याजवळ होते. 22त्यावेळी याईर नावाचा सभागृहाचा एक पुढारी आला, येशूंना पाहून त्यांच्या पाया पडला. 23त्यांना आग्रहाने विनंती करू लागला, “माझी लहान मुलगी मरणाच्या पंथाला लागली आहे, कृपा करून या व आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती बरी होईल व वाचेल.” 24म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले.
सभोवतालचा जमावही त्यांच्याबरोबर निघाला व गर्दी करू लागला. 25आणि तिथे एक स्त्री होती, जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती. 26याकाळात तिने अनेक वैद्यांच्या उपचारांमुळे पुष्कळ दुःख सहन केले होते व ती कंगाल झाली होती आणि एवढे करूनही बरी न होता उलट तिचा आजार अधिकच बळावला होता. 27जेव्हा तिने येशूंबद्दल ऐकले, तेव्हा तिने मोठ्या गर्दीतून त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला. 28“मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन,” असे तिला वाटत होते. 29तत्काळ तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण आजारातून मुक्त झालो आहोत याची तिला शरीरात जाणीव झाली.
30तत्क्षणी येशूंनी आपल्यामधून शक्ती बाहेर पडली असे जाणले आणि समुदायाकडे मागे वळून त्यांनी विचारले, “माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला?”
31“यावर त्यांचे शिष्य म्हणाले, एवढी मोठी गर्दी तुमच्याभोवती असताना तुम्ही विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’ ”
32तरी आपल्याला कोणी स्पर्श केला, हे पाहण्यासाठी ते आजूबाजूला शोधू लागले. 33तेव्हा भयभीत झालेली ती स्त्री आपल्या बाबतीत काय घडले हे लक्षात घेऊन थरथर कापत आली आणि त्यांच्या पाया पडून तिने त्यांना सर्व खरे सांगितले. 34येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा आणि आपल्या पीडेपासून मुक्त राहा.”
35येशू अजून बोलतच होते, तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घरून काही लोक आले. ते म्हणाले, “तुमची कन्या मरण पावली आहे, आता गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही.”
36त्यांचे बोलणे ऐकून#5:36 किंवा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून येशू सभागृहाच्या अधिकार्याला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.”
37येशूंनी पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणासही बरोबर येऊ दिले नाही. 38ते सभागृहाच्या अधिकार्याच्या घरी आले, तेव्हा गडबड व उच्च स्वरात लोकांची रडारड, आक्रोश त्यांना दिसून आला. 39ते आत गेले आणि लोकांना म्हणाले, “हा गोंधळ आणि आक्रोश कशासाठी? ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.” 40परंतु ते त्याला हसू लागले.
त्या सर्वांना बाहेर घालविल्यावर, तिचे आईवडील आणि आपले शिष्य यांना घेऊन त्या बालिकेला ज्या खोलीत ठेवले होते तिथे गेले. 41तिच्या हाताला धरून येशू तिला म्हणाले, “तलीथा कूम!” (म्हणजे “छोट्या मुली, मी तुला सांगतो, ऊठ!”) 42ते ऐकताच ती उठून उभी राहिली आणि चालू फिरू लागली. तिचे वय बारा वर्षाचे होते. यावरून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. 43येशूंनी त्यांना कडक आदेश दिला की, याविषयी कोणाला सांगू नका व मुलीला काहीतरी खावयास द्यावे असे सांगितले.
Currently Selected:
मार्क 5: MRCV
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.