योहा. 6
6
पांच हजारांना जेवू घालणे
मत्त. 14:13-21; मार्क 6:30-44; लूक 9:10-17
1या गोष्टी झाल्यानंतर येशू गालीलच्या सरोवराच्या दुसर्या बाजूस गेला ज्याला तिबिर्य सरोवरसुद्धा म्हणतात. 2तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी असलेल्यांवर तो जी चिन्हे करीत होता ती त्यांनी पाहिली होती. 3येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांबरोबर बसला. 4आता वल्हांडण हा यहूद्यांचा सण जवळ आला होता. 5तेव्हा येशू दृष्टी वर करून व लोकांचा जमाव आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांस खायला भाकरी कोठून विकत आणणार?” 6हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत हे त्यास ठाऊक होते. 7फिलिप्पाने त्यास उत्तर दिले, “त्यांच्यातल्या प्रत्येकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी पुरणार नाहीत.” 8त्याच्या शिष्यांतला एकजण, शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्यास म्हणाला, 9“येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ पाच जवाच्या भाकरी आणि दोन मासळ्या आहेत; परंतु इतक्यांना त्या कशा पुरणार?” 10येशू म्हणाला, “लोकांस बसवा.” त्या जागी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरूष होते ते बसले. 11येशूने त्या पाच भाकरी घेतल्या आणि त्याने उपकार मानल्यावर त्या बसलेल्याना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतून त्यांना हवे होते तितके दिले. 12ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “उरलेले तुकडे गोळा करा, म्हणजे काही वाया जाऊ नये.” 13मग जेवणार्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या.
14तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच आहे.”
15मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.
16संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली सरोवराकडे गेले; 17आणि एका तारवात बसून सरोवराच्या दुसर्या बाजूस कफर्णहूमकडे जाऊ लागले. इतक्यात अंधार झाला होता आणि येशू त्यांच्याकडे आला नव्हता. 18आणि मोठा वारा सुटून सरोवर खवळू लागले होते. 19मग त्यांनी सुमारे सहा किलोमीटर वल्हवून गेल्यावर येशूला पाण्यावरून तारवाजवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. 20पण तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” 21म्हणून त्यास तारवात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांला जायचे होते त्याठिकाणी तारू किनाऱ्यास लावले.
22दुसर्या दिवशी जो लोकसमुदाय सरोवराच्या दुसर्या बाजूस उभा होता त्यांने पाहिले की, ज्या लहान होडीत त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरे तारू नव्हते आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या तारवावर चढला नव्हता. तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. 23तरी प्रभूने उपकार मानल्यावर त्यांनी जेथे भाकर खाल्ली त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरी लहान तारवे आले होते. 24तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नव्हते हे जेव्हा लोकांनी बघितले तेव्हा त्यांनीही होड्या घेतल्या व येशूला शोधीत ते कफर्णहूमला आले.
25आणि तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटला तेव्हा ते त्यास म्हणाले, “रब्बी, आपण इकडे कधी आलात?” 26येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही चिन्हे बघितलीत म्हणून नाही, पण भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. 27नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.” 28तेव्हा ते त्यास म्हणाले, “आम्ही देवाची कामे करावीत म्हणून काय करावे?” 29येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” 30म्हणून ते त्यास म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की ते बघून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? 31आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यास स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.’ 32तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, मोशेने तुम्हास स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हास देतो. 33कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.” 34तेव्हा ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य द्या.”
35तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही. 36परंतु तुम्ही मला पाहीले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हास सांगितले. 37पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही. 38कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला नाही, पण ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे. 39आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे. 40माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.”
41 “मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे” असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. 42तेव्हा ते म्हणाले, “हा येशू योसेफाचा मुलगा नाही काय? याच्या पित्याला आणि आईला आम्ही ओळखतो. आता हा कसे म्हणतो, मी स्वर्गातून उतरलो आहे?” 43येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही आपआपल्यात कुरकुर करू नका. 44ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यास शेवटल्या दिवशी मी उठवीन. 45संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहीले आहे की, ‘ते सगळे देवाने शिकवलेले असे होतील’, जो पित्याकडून ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. 46जो देवापासून आहे त्याने पित्याला पाहिले आहे. त्याच्याशिवाय कोणी पित्याला पाहिले आहे असे नाही. 47मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. 48मीच जीवनाची भाकर आहे. 49तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला आणि ते मरण पावले.
50 पण स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. 51स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”
52तेव्हा यहूद्यांनी आपआपल्यात वाद वाढवून म्हटले, “हा आम्हास आपला देह कसा खायला देऊ शकेल?” 53यावरुन येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. 54जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्यास शेवटल्या दिवशी पुन्हा उठवीन. 55कारण माझा देह खरे खाद्य आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. 56जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो. 57जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि मी जसा पित्यामुळे जगतो, तसे जो मला खातो तोसुध्दा माझ्यामुळे जगेल. 58स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मरण पावले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.” 59कफर्णहूमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात या गोष्टी सांगितल्या.
60त्याच्या शिष्यांतील पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, “हे वचन कठीण आहे; हे कोण ऐकून घेऊ शकतो?” 61आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहे हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुम्ही अडखळता काय? 62मनुष्याच्या पुत्राला तो आधी होता जेथे होता तेथे जर वर चढताना पाहाल तर? 63आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ घडवीत नाही. मी तुमच्याशी बोललो ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. 64तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत” कारण कोण विश्वास ठेवत नाही आणि आपल्याला कोण धरून देईल, हे येशू पहिल्यापासून जाणत होता. 65तो म्हणाला, “म्हणून मी तुम्हास म्हणले की, कोणीही मनुष्य, त्यास पित्याने ते दिल्याशिवाय, तो माझ्याकडे येऊ शकत नाही.”
66त्यानंतर, त्याच्या शिष्यांतले पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. 67तेव्हा येशू बाराजणांना म्हणाला, “तुमची पण जायची इच्छा आहे काय?” 68तेव्हा शिमोन पेत्राने त्यास उत्तर दिले, “प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाकडे आहेत. 69आणि आम्ही विश्वास ठेवला आहे आणि जाणतो की, आपण देवाचे पवित्र पुरूष आपण आहात.” 70येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बाराजणांना निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यातील एकजण सैतान आहे.” 71हे त्याने शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्याविषयी म्हणले होते; कारण बारा जणांतला तो एक असून त्यास धरून देणार होता.
Currently Selected:
योहा. 6: IRVMar
Qaqambisa
Share
Copy
Ufuna ukuba iimbalasane zakho zigcinwe kuzo zonke izixhobo zakho? Bhalisela okanye ngena
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.