लूक 1
1
प्रस्तावना
1आम्हामध्ये ज्या घटना घडल्या#1:1 किंवा खचितच विश्वास केला त्यांचा वृतांत संग्रहित करण्याचे काम अनेकांनी हाती घेतले. 2या घटनांचे वृतांत प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रथम साक्षीदारांनी व परमेश्वराच्या वचनाची सेवा करणार्यांनी आमच्याकडे सोपविलेले आहेत. 3सन्माननीय थियफिल, तुमच्यासाठी एक अचूक व अधिकृत वृतांत लिहून काढावा, हे मनात ठेऊन मी स्वतःसुद्धा प्रत्येक गोष्टीचा अगदी सुरुवातीपासून बारकाईने व काळजीपूर्वक शोध केला आहे. 4यासाठी की, ज्यागोष्टी तुम्हाला शिकविण्यात आल्या आहेत, त्यांची तुम्हाला खात्री होईल.
बाप्तिस्मा करणारा योहानाच्या जन्माविषयी भविष्यवाणी
5यहूदीयाचा राजा हेरोद याच्या काळात तिथे जखर्याह नावाचा एक याजक होता, तो अबीयाच्या याजकवर्गातील होता; त्याची पत्नी अलीशिबासुद्धा अहरोनाच्या वंशाची होती. 6दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असून प्रभूच्या आज्ञा व नियम पालन करण्यामध्ये निर्दोष होते. 7त्यांना मूलबाळ नव्हते, कारण अलीशिबा गर्भधारण करू शकत नव्हती आणि ती दोघेही खूप वयस्कर झालेली होती.
8एकदा आपल्या गटाच्या अनुक्रमाने जखर्याह परमेश्वरापुढे याजक म्हणून सेवा करीत असताना, 9परमेश्वराच्या मंदिरात जाऊन धूप जाळण्यासाठी याजकांच्या रीतीप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. 10आणि जेव्हा धूप जाळण्याची वेळ आली तेव्हा, जमलेले सर्व भक्तजन बाहेर प्रार्थना करीत होते.
11तेव्हा जखर्याहच्या समोर प्रभूचा एक दूत प्रगट झाला, तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिला. 12त्याला पाहताच जखर्याह चकित आणि भयभीत झाला. 13पण देवदूत त्याला म्हणाला, “जखर्याह भिऊ नकोस, कारण परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझी पत्नी अलीशिबा तुझ्यासाठी एक पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव योहान असे ठेव. 14तो तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्मामुळे अनेकांना हर्ष वाटेल. 15तो प्रभूच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल. 16तो अनेक इस्राएली लोकांना प्रभू त्यांच्या परमेश्वराकडे परत घेऊन येईल. 17तो एलीयाहच्या आत्म्याने व सामर्थ्याने प्रभूच्या पुढे चालेल, आईवडिलांची हृदये त्यांच्या लेकरांकडे वळवेल व अवज्ञा करणार्यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवेल व लोकांना प्रभूच्या मार्गाप्रमाणे चालण्यासाठी तयार करेल.”
18जखर्याह देवदूताला म्हणाला, “मी याबद्दल खात्री कशी बाळगावी? मी वयस्क मनुष्य आहे आणि माझ्या पत्नीचेही वय होऊन गेले आहे.”
19यावर देवदूत म्हणाला, “मी गब्रीएल आहे. मी प्रत्यक्ष परमेश्वराच्या समक्षतेत उभा असतो आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही शुभवार्ता तुला सांगण्यासाठी मला पाठविण्यात आले आहे, 20आणि आता हे पूर्ण होईल त्या दिवसापर्यंत तू मुका होशील व तुला बोलता येणार नाही, कारण नेमलेल्या समयी माझे शब्द खरे होतील या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाही.”
21इकडे लोक जखर्याहची वाट पाहत होते. तो मंदिरात इतका वेळ का थांबला याचे त्यांना आश्चर्य वाटले. 22तो बाहेर आला तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. यावरून त्याने मंदिरात दृष्टान्त पाहिला असेल हे त्यांनी ओळखले, मात्र बोलू न शकल्यामुळे तो त्यांना खुणा करीत होता.
23मग त्याच्या सेवाकार्याचा काळ संपला व तो घरी परतला. 24त्यानंतर त्याची पत्नी अलीशिबा गर्भवती झाली आणि पाच महिने एकांतवासात राहिली. 25ती म्हणाली, “प्रभूने हे माझ्यासाठी केले आहे, या दिवसांमध्ये त्यांची कृपादृष्टी मजवर करून लोकांमध्ये होणारी माझी मानहानी दूर केली आहे.”
येशूंच्या जन्माचे भविष्यकथन
26अलीशिबेला गर्भवती होऊन सहा महिने झाले असताना, परमेश्वराने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावात, 27एका कुमारीकडे पाठविले, जिचा विवाह दावीद राजाच्या वंशावळीतील योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर निश्चित झाला होता. त्या कुमारीचे नाव मरीया होते. 28गब्रीएल देवदूत मरीयेपुढे प्रगट झाला आणि तिला म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रिये, अभिवादन! प्रभू तुझ्याबरोबर आहेत.”
29देवदूताच्या शब्दांनी मरीया फारच अस्वस्थ झाली आणि हे अभिवादन कशाप्रकारचे असावे, याविषयी ती विचार करू लागली. 30देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस; कारण परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली आहे. 31तू गर्भधारण करून पुत्राला जन्म देशील आणि त्याचे नाव येशू ठेवावे. 32ते परमथोर होतील आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीदाचे सिंहासन देतील. 33ते याकोबाच्या संतानांवर सदासर्वकाळ राज्य करतील व त्यांच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.”
34मरीयेने देवदूताला विचारले, “हे कसे होईल? मी तर कुमारिका आहे!”
35यावर देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र म्हणतील.#1:35 किंवा जन्माला येणार्या मुलाला पवित्र म्हटले जाईल 36तुझी नातलग अलीशिबा हिलासुद्धा तिच्या वृद्धापकाळात बाळ होणार आहे आणि जी गर्भधारणा करू शकत नव्हती, तिला आता सहावा महिना आहे. 37कारण परमेश्वराला कोणतेही वचन पूर्ण करणे अशक्य नाही.”
38मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, तुम्ही जे वचन मला दिले आहे त्याची पूर्तता होवो.” आणि मग देवदूत तिला सोडून गेला.
मरीया अलीशिबाची भेट घेते
39त्या दिवसात मरीया लगेच तयारी करून यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावाकडे घाईघाईने गेली. 40तिने जखर्याहच्या घरात प्रवेश करून अलीशिबेला अभिवादन केले. 41जेव्हा मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले, तेव्हा तिच्या गर्भाशयातील बालकाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. 42अलीशिबा मोठ्या आवाजात म्हणाली: “तू सर्व स्त्रियांमध्ये धन्य आहेस आणि जे बाळ तुझ्या पोटी जन्म घेईल ते धन्य असो. 43परंतु माझ्या प्रभूच्या आईने माझ्याकडे यावे ही माझ्यावर किती मोठी कृपा आहे? 44ज्या क्षणाला तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानाने ऐकला, त्याच क्षणाला बाळाने माझ्या गर्भात आनंदाने उडी मारली. 45धन्य आहे ती, कारण प्रभूने तिला दिलेल्या वचनाची ते पूर्णता करतील असा तिने विश्वास ठेवला.”
मरीयेचे गीत
46मरीया म्हणाली:
“माझा आत्मा प्रभूचे गौरव करतो
47माझा आत्मा माझ्या तारणार्या परमेश्वरामध्ये आनंद करतो,
48कारण आता त्यांनी त्यांच्या
दासीच्या लीन अवस्थेकडे दृष्टी टाकली आहे.
यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.
49कारण ज्या सर्वशक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत,
त्यांचे नाव पवित्र आहे.
50त्यांचे भय बाळगणार्यांवर त्यांची करुणा
एका पिढीपासून दुसर्या पिढीपर्यंत टिकून राहते.
51त्यांनी आपल्या बाहूने महान कार्य केले आहेत;
जे अंतर्मनातील विचारांमध्ये गर्विष्ठ आहेत, त्यांना त्यांनी विखुरले आहे.
52त्यांनी शासकांना त्यांच्या सिंहासनावरून खाली आणले आहे.
पण नम्रजनांस उच्च केले आहे.
53भुकेल्यास त्यांनी उत्तम गोष्टींनी तृप्त केले आहे.
परंतु श्रीमंतांना रिकामे पाठविले आहे.
54त्यांचा सेवक इस्राएलास दयाळू ते असल्याचे आठवून
त्याला साहाय्य पाठविले,
55जसे आपल्या पूर्वजांना त्यांनी वचन दिले होते,
ते अब्राहाम आणि त्यांच्या संततीवर सदासर्वकाळ राहील.”
56मरीया अलीशिबेजवळ सुमारे तीन महिने राहिली आणि नंतर ती तिच्या घरी परत गेली.
बाप्तिस्मा करणार्या योहानाचा जन्म
57अलीशिबेच्या प्रसूतीची वेळ आली, तेव्हा तिने पुत्राला जन्म दिला. 58प्रभूने तिच्यावर किती मोठी दया दाखविली हे ऐकून तिचे शेजारी व नातेवाईक तिच्या आनंदात सामील झाले.
59मग आठव्या दिवशी जे बाळाची सुंता करण्यासाठी आले, ते त्याच्या वडिलांचे जखर्याह हेच नाव त्याला देणार होते, 60पण त्याची आई अलीशिबा म्हणाली, “नाही, त्याचे नाव योहान आहे.”
61तेव्हा त्यांनी तिला म्हटले पण, “हे नाव तुमच्या नातलगात सापडत नाही.”
62नंतर त्यांनी हातांनी खुणा करून त्याच्या वडिलांना, बाळाचे नाव काय ठेवायचे आहे असे विचारले. 63वडिलांनी एक पाटी मागवून त्यावर, “त्याचे नाव योहान आहे” असे लिहिले आणि प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. 64तत्क्षणी जखर्याहचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व परमेश्वराची स्तुती करू लागला. 65आणि सर्व शेजारी भयभीत झाले व डोंगराळ यहूदीया प्रदेशात राहणारे, येथील सर्व गोष्टींविषयी बोलू लागले. 66ज्या प्रत्येकाने याविषयी ऐकले व नवल करून म्हटले, “हा बालक पुढे कोण होणार?” कारण प्रभूचा हात त्याजबरोबर होता.
जखर्याहचे गीत
67नंतर बालकाचा पिता जखर्याह पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि भविष्यवाणी करू लागला:
68“प्रभूची स्तुती करा! इस्राएलाच्या परमेश्वराची स्तुती करा,
कारण ते आपल्या लोकांकडे आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी खंडणी भरली आहे.
69त्यांनी आपला सेवक दावीदाच्या घराण्यातून
आपल्यासाठी तारणाचे शिंग#1:69 शिंग प्रबळ राजाचे प्रतीक उभारले आहे.
70जसे त्यांनी फार पूर्वी आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते—
71आमच्या शत्रूपासून आणि
आमचा द्वेष करणार्या सर्वांच्या हातातून आमचा उद्धार करावा,
72आमच्या पूर्वजांवर दया करावी
आणि त्यांच्या पवित्र कराराची आठवण करावी.
73आणि त्यांनी आमचा पूर्वज अब्राहामाला शपथ देऊन वचन दिले:
74आमच्या शत्रूंच्या हातून आमची सुटका करावी,
आणि समर्थ होऊन निर्भयतेने त्यांची सेवा करावी,
75पवित्रपणाने आणि नीतिमत्त्वाने आमचे सर्व दिवस त्यांच्यासमोर घालवावेत.
76“आणि तू, माझ्या बाळा, तुला परात्पराचा संदेष्टा असे म्हणतील;
कारण तू प्रभूच्या पुढे जाऊन त्यांचा मार्ग तयार करशील,
77त्यांच्या पापांच्या क्षमेद्वारे,
त्याच्या लोकांना तारणाचे ज्ञान देशील.
78कारण परमेश्वराच्या करुणेमुळे,
आपल्यावर स्वर्गातून दिव्य प्रभातेचा उदय होण्याची वेळ आली आहे.
79जे अंधारात जगत आहेत,
जे मरणाच्या छायेत आहेत त्यांच्यावर प्रकाश पडावा आणि,
आमच्या पायांना शांतीच्या मार्गाचे मार्गदर्शन प्राप्त व्हावे.”
80तो बालक वाढत गेला आणि आत्म्यात बलवान झाला व त्याची वाढ झाली आणि तो इस्राएली लोकांस जाहीरपणे प्रकट होईपर्यंत अरण्यात राहिला.
Выбрано:
लूक 1: MRCV
Выделить
Поделиться
Копировать

Хотите, чтобы то, что вы выделили, сохранялось на всех ваших устройствах? Зарегистрируйтесь или авторизуйтесь
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.