योहान 4

4
येशू व शोमरोनी स्त्री
1येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करत आहे हे परूश्यांच्या कानी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले,
2(तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करत नसे, तर त्याचे शिष्य करत असत),
3तेव्हा तो यहूदीया सोडून पुन्हा गालीलात गेला;
4आणि त्याला शोमरोनामधून जावे लागले.
5मग तो शोमरोनामधून सूखार नावाच्या नगरास आला; ते याकोबाने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते.
6तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झर्‍यावर बसला; तेव्हा सुमारे सहावा तास होता.
7तेथे शोमरोनाची एक स्त्री पाणी काढण्यास आली. तिला येशू म्हणाला, “मला प्यायला पाणी दे.”
8कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते.
9तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहूदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात.
10येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि ‘मला प्यायला पाणी दे,’ असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”
11ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून?
12आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हांला दिली; तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय?”
13येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल,
14परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”
15ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.”
16तो तिला म्हणाला, “तू जाऊन आपल्या नवर्‍याला बोलावून आण.”
17ती स्त्री म्हणाली, “मला नवरा नाही.” येशूने तिला म्हटले, “मला नवरा नाही हे ठीक बोललीस,
18कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितलेस.”
19ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले.
20आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे.”
21येशू तिला म्हणाला, “बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान.
22तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे.
23तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा आहे.
24देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”
25ती स्त्री त्याला म्हणाली, “मशीहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे हे मला ठाऊक आहे; तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल.”
26येशू तिला म्हणाला, “जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे.”
27इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्याचे त्यांना आश्‍चर्य वाटले; तरी “आपण काय विचारत आहात” किंवा “आपण तिच्याबरोबर का बोलत आहात” असे कोणी म्हटले नाही.
28ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली,
29“चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा; तोच ख्रिस्त असेल काय?”
30तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले.
31शिष्य त्याला विनंती करू लागले की, “गुरूजी, जेवा.”
32परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे.”
33ह्यावरून शिष्य एकमेकांना म्हणू लागले, “ह्याला कोणी खायला आणले असेल काय?”
34येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.
35‘अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल’ असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हांला म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.
36कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो; ह्यासाठी की, पेरणार्‍याने व कापणी करणार्‍यानेही एकत्र आनंद करावा.
37‘एक पेरतो व एक कापतो,’ अशी जी म्हण आहे ती ह्या बाबतीत खरी आहे.
38ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापायला मी तुम्हांला पाठवले; दुसर्‍यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमांचे वाटेकरी झाला आहात.”
39“मी केलेले सर्वकाही त्याने मला सांगितले” अशी साक्ष देणार्‍या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
40म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या येथे राहण्याची विनंती केली; मग तो तेथे दोन दिवस राहिला.
41त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला.
42आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचीत ख्रिस्त, जगाचा तारणारा आहे हे आम्हांला कळले आहे.”
राजाच्या अंमलदाराच्या मुलाला येशू गालीलामध्ये बरे करतो
43मग त्या दोन दिवसांनंतर तो तेथून गालीलात निघून गेला.
44कारण येशूने स्वत: साक्ष दिली की, ‘संदेष्ट्याला स्वदेशात मान मिळत नाही.’
45म्हणून तो गालीलात आल्यावर गालीलकरांनी त्याचा स्वीकार केला, कारण यरुशलेमेमध्ये सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते, कारण तेही सणाला गेले होते.
46नंतर तो गालीलातील काना येथे पुन्हा आला; तेथे त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता.
47येशू यहूदीयातून गालीलात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली की, “आपण खाली येऊन माझ्या मुलाला बरे करा.” कारण तो मरणाच्या पंथास लागला होता.
48त्यावर येशू त्याला म्हणाला, “तुम्ही चिन्हे व अद्भुते पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारच नाही.”
49तो अंमलदार त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी खाली येण्याची कृपा करा.”
50येशू त्याला म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे.” तो मनुष्य, येशूने त्याला सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून निघून गेला.
51आणि तो खाली जात असता त्याचे दास त्याला भेटून म्हणाले, “आपला मुलगा वाचला आहे.”
52ह्यावरून त्याला कोणत्या ताशी उतार पडू लागला, हे त्याने त्यांना विचारले. त्यांनी त्याला म्हटले, “काल सातव्या ताशी त्याचा ताप गेला.”
53ह्यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे बापाने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.
54येशूने यहूदीयातून गालीलात आल्यावर पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे.

Выделить

Поделиться

Копировать

None

Хотите, чтобы то, что вы выделили, сохранялось на всех ваших устройствах? Зарегистрируйтесь или авторизуйтесь