लूक 12

12
दांभिकतेबद्दल शिष्यांना इशारा
1त्या वेळी येशूभोवती हजारो लोकांची इतकी गर्दी जमली होती की, तेथे चेंगराचेंगरी होऊ लागली. येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “परुश्यांचे खमीर म्हणजेच त्यांचा दांभिकपणा ह्याविषयी तुम्ही स्वतःला सांभाळा. 2जे उघड होणार नाही, असे काही झाकलेले नाही व जे कळणार नाही, असे काही गुप्त नाही. 3जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या बंद खोलीत कुजबुज करून सांगितले, ते छपरावरून घोषित केले जाईल.
निर्भयतेचा मंत्र
4माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका. 5तुम्ही कोणाची भीती बाळगावी, हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो:वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याची भीती बाळगा.
6पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. 7फार काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहात!
8मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो, त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील. 9परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो, तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल.
10जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल, त्याला क्षमा मिळेल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो, त्याला क्षमा मिळणार नाही.
11जेव्हा तुम्हांला सभास्थाने, सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे, ह्याविषयी काळजी करू नका. 12तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.”
श्रीमंताविषयीचा दाखला
13लोकसमुदायातील एकाने येशूला म्हटले, “गुरुवर्य, मला माझा वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.”
14तो त्याला म्हणाला, “गृहस्था, तुमचा न्याय करण्यासाठी किंवा वाटणी करण्यासाठी मला कोणी नेमले?” 15आणखी त्याने त्यांना म्हटले, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली, तर ती त्याचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करील असे नाही.”
16नंतर त्याने त्यांना पुढील दाखला सांगितला:“एका धनवान मनुष्याच्या जमिनीत खूप पीक आले. 17त्याने मनातल्या मनात विचार केला, ‘मी काय करू? माझे उत्पन्‍न साठवायला माझ्याकडे पुरेशी जागा नाही.’ 18त्याने म्हटले, ‘मी असे करीन - मी माझी कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी माझे सर्व धान्य व माल साठवीन 19आणि मग मी स्वतःला म्हणेन, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका भरपूर माल साठवलेला आहे. विसावा घे, खा, पी, मजा कर.’ 20परंतु देवाने त्याला म्हटले, ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू जमवून ठेवले आहे, ते कोणाचे होईल?’
21जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो, परंतु देवाच्या दृष्टीने धनवान नाही त्याचे असेच आहे.”
चिंता न करण्याविषयी
22त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, उदरनिर्वाहासाठी ज्या अन्नाची तुम्हांला गरज आहे, त्याची वा शरीरासाठी ज्या कपड्यांची तुम्हांला आवश्यकता आहे, त्यांची चिंता करत बसू नका. 23अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रांपेक्षा शरीर अधिक महत्त्वाचे आहेत. 24कावळ्यांचे निरीक्षण करा. ते पेरत नाहीत व कापणीही करीत नाहीत, त्यांचा कणगा नसतो व कोठारही नसते, तरी देव त्यांचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात! 25आणि चिंता करून आपले आयुष्य थोडेफार वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे?
26अशी ही अगदी छोटी गोष्टदेखील जर तुम्हांला जमत नाही, तर इतर गोष्टीविषयी का चिंता करत बसता? 27रानफुले कशी वाढतात, ह्याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत, तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील त्याच्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखा सजला नव्हता. 28जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोषाख घालतो, तर अहो, अल्पविश्वासी जनहो, तो किती विशेषकरून तुमची काळजी घेईल?
29तसेच काय खावे, काय प्यावे, ह्याच्यामागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ होऊ नका. 30जगातील परराष्ट्रीय लोक ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड करतात परंतु तुम्हांला त्यांची गरज आहे, हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. 31उलट, तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा म्हणजे ह्या गोष्टी तुम्हांला मिळतील.
32हे लहान कळपा, भिऊ नकोस. तुम्हांला देवराज्य द्यावे, हे तुमच्या पित्याला उचित वाटले आहे. 33जे तुमचे आहे, ते विकून दानधर्म करा. जीर्ण न होणाऱ्या थैल्यांमध्ये आपणासाठी स्वर्गात अक्षय धन साठवून ठेवा. तेथे चोर येत नाहीत व कसर लागत नाही. 34अर्थात, जेथे तुमचे धन आहे, तेथे तुमचे मनही लागेल.
जागृतीची आवश्यकता
35-36लग्नाहून परत येणाऱ्या धन्याची वाट पाहत असलेल्या नोकरांप्रमाणे तुमच्या कंबरा कसलेल्या व दिवे लावलेले असू द्या म्हणजे तो येऊन दार ठोठावील, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तत्काळ दार उघडावे. 37धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हांला खातरी पूर्वक सांगतो की, तो आपली कंबर कसून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. 38तो मध्यरात्रीच्या सुमारास किंवा त्याहून उशीरा येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत. 39आणखी हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल, हे घरधन्याला माहीत असते, तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. 40तुम्हीही तयार राहा कारण तुमची अपेक्षा नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”
41पेत्राने म्हटले, “प्रभो, हा दाखला आपण आम्हांलाच सांगता की सर्वांना?”
42प्रभू म्हणाला, “आपल्या परिवारातील नोकरांना योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील, असा विश्वासू व विवेकी नोकर कोण? 43त्याचा धनी येईल, तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. 44मी तुम्हांला खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. 45मात्र आपला धनी येण्यास उशीर लागेल, असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांना व चाकरिणींना मारहाण करू लागेल आणि खाऊनपिऊन मस्त होईल, 46तर तो अपेक्षा करत नाही अशा दिवशी व त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्या नोकराचा धनी येऊन त्याला कठोर शिक्षा करील आणि त्याची गणती अविश्वासू लोकांमध्ये करण्यात येईल.
47आपल्या धन्याची इच्छा काय आहे, हे माहीत असता ज्या नोकराने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही, त्याला पुष्कळ फटके मिळतील. 48परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली, त्याला कमी शिक्षा मिळेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे, त्याच्याकडून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्या स्वाधीन भरपूर केले आहे त्याच्याकडून अजूनही जास्त मागण्यात येईल.
काळाची लक्षणे
49मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. ती आत्तापर्यंत पेटली असती तर किती बरे झाले असते! 50मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे व तो पूर्ण होईपर्यंत मी तणावाखाली आहे! 51मी पृथ्वीवर शांती प्रस्थापित करण्यास आलो आहे, असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नाही, मी तर फूट पाडायला आलो आहे. 52आत्तापासून एका कुटुंबातील पाच जणांत दोघांविरुद्ध तिघे व तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. 53मुलांविरुद्ध वडील व वडिलांविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई व आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू व सासूविरुद्ध सून अशी फूट पडेल.”
54तो लोकसमुदायालाही म्हणाला, “जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता, तेव्हा तुम्ही लगेच म्हणता, ‘पावसाची सर येणार’ आणि तसे घडते. 55दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा तुम्ही म्हणता, ‘कडाक्याची उष्णता होईल’ आणि तसे घडते. 56अहो ढोंग्यांनो, तुम्हांला पृथ्वीवरील व आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही?
57तसेच उचित काय आहे, हे तुमचे तुम्ही का ठरवत नाही? 58जर तुझा वादी तुला न्यायालयात नेत असेल, तर वाटेतच त्याच्याशी समेट करायचा प्रयत्न कर, अन्यथा कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल. न्यायाधीश तुला अधिकाऱ्याच्या हाती देईल व तो तुला तुरुंगात टाकेल. 59मी तुला सांगतो, अगदी पैसा अन् पैसा फेडीपर्यंत तुझी तेथून मुळीच सुटका होणार नाही.”

Nu geselecteerd:

लूक 12: MACLBSI

Markering

Deel

Kopiëren

None

Wil je jouw markerkingen op al je apparaten opslaan? Meld je aan of log in