लूक 11

11
1एकदा येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने पूर्ण केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, “प्रभो, जसे योहानने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले, तसे आपणही आम्हांला शिकवा.”
2तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा:
हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो.
3आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे
4आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस.”
प्रार्थनेतील चिकाटी
5पुढे येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो मध्यरात्री त्याच्याकडे जाऊन भाकरी उसन्या मागू लागतो, 6‘माझा एक मित्र माझ्याकडे आला आहे व त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही’ 7आणि तो आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नकोस, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ झोपली आहेत, मी उठून तुला भाकरी देऊ शकत नाही.’ 8मी तुम्हांला सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नसला तरी त्याच्या आग्रहामुळे तो उठून त्याची गरज भागवेल.
9मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. 10जो कोणी मागतो त्याला मिळते; जो कोणी शोधतो त्याला सापडते; जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते. 11तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की, जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? 12किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? 13तुम्ही वाईट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यायचे कळते, तर मग स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती अधिक प्रमाणात पवित्र आत्मा देईल.”
आरोपाचे खंडण
14एकदा येशू एक भूत काढत होता व ते मुके होते. भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. त्यावरून लोकसमुदायाला आश्चर्य वाटले. 15पण त्यांतील कित्येक म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बालजबूल ह्याच्या साहाय्याने हा भुते काढतो.”
16दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याजवळ स्वर्गातले चिन्ह मागू लागले. 17परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसात फूट पडलेले कोणतेही राष्ट्र फार काळ टिकत नाही आणि कुटुंब आपसात भांडू लागले, तर तेही दुभंगते. 18मग सैतानाच्या राज्यात फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, असे तुम्ही म्हणता. 19पण मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील. 20परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भुते काढत आहे, तर हे सिद्ध होते की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.
21सशस्त्र व बलवान मनुष्य त्याच्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. 22परंतु जेव्हा त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य येऊन त्याच्यावर ह्रा करतो व विजय मिळवतो तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती, ती तो घेतो आणि लूट म्हणून वाटून टाकतो.
23जो मला अनुकूल नाही, तो मला प्रतिकूल आहे. जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखरतो.
सावधानतेचा इशारा
24मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळांमधून विश्रांतीचे ठिकाण शोधत हिंडतो आणि ते मिळाले नाही म्हणजे म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन.’ 25तो परत आल्यावर ते घर झाडलेले व सुशोभित केलेले त्याला आढळते. 26नंतर तो जाऊन आपणापेक्षा अधिक दुष्ट असे सात आत्मे बरोबर आणतो आणि ते आत शिरून तेथे राहतात. मग त्या मनुष्याची ती शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
देवाच्या वचनाची महती
27तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील एक स्त्री त्याला उच्च स्वरांत म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जिने स्तनपान देऊन तुला वाढवले ती धन्य !”
28तथापि तो म्हणाला, “त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य.”
चिन्ह मागण्यासंबंधी दिलेली समज
29लोकसमुदाय एकत्र जमला तेव्हा येशू म्हणाला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्हाची अपेक्षा करते. परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दाखवले जाणार नाही. 30जसा योना निनवेकरांना एक चिन्ह म्हणून देण्यात आला होता, तसा मनुष्याचा पुत्र आजच्या लोकांकरिता चिन्ह म्हणून देण्यात आलेला आहे. 31दक्षिणेकडची राणी न्यायसमयी उठून आजच्या लोकांना दोषी ठरवील कारण शलमोनचे शहाणपण ऐकायला ती तिच्या दूरच्या देशातून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा कुणीतरी येथे आहे. 32निनवेचे लोक न्यायसमयी उभे राहून तुम्हांला दोषी ठरवतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा कुणीतरी येथे आहे.
दिव्यावरून धडे
33दिवा लावून तो लपवून ठेवला जात नाही किंवा धान्यमापाखाली ठेवला जात नाही तर आत येणाऱ्यांना उजेड मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात. 34तुझा डोळा तुझ्या शरीराचा दिवा आहे, तुझे डोळे निर्दोष असतात, तेव्हा तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते. तुझे डोळे सदोष असतात, तेव्हा तुझे शरीरही अंधकारमय असते. 35म्हणून तुझ्यामधील प्रकाश हा अंधार तर नाही ना हे पाहा. 36तुझे शरीर जर प्रकाशमय असेल म्हणजेच त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर सर्व काही उजळून निघेल - अगदी दिवा त्याच्या ज्योतीने तुला उजळून टाकतो तसा.”
परुशी व शास्त्री ह्यांचा निषेध
37येशूचे प्रबोधन संपल्यावर एका परुश्याने त्याला आपल्याकडे भोजनाला येण्याची विनंती केली. तो भोजनाला बसला असता 38त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत, असे पाहून परुश्याला आश्चर्य वाटले. 39परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परुशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता मात्र तुमचे अंतर्याम हावरेपणा व दुष्टपणा ह्यांनी बरबटलेले असते. 40अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बाह्यांग निर्माण केले त्याने अंतरंगही केले नाही काय? 41म्हणून जे तुमच्याजवळ आहे, त्याचा दानधर्म करा आणि पाहा, तुमच्याकरिता सर्वकाही शुद्ध होईल.
42परंतु तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार! मसाल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे पुदिना, कढीपत्ता व प्रत्येक प्रकारची वनस्पती ह्यांचा तुम्ही दशांश देता आणि न्याय व देवाची प्रीती यांच्याकडे मात्र कानाडोळा करता. न्याय व देवप्रीती ह्या गोष्टी आचरणात आणणे आवश्यक होते.
43तुम्हां परुश्यांची केवढी दुर्दशा होणार! सभास्थानांमध्ये मानाची आसने मिळवणे व बाजारात नमस्कार घेणे, हे तुम्हांला आवडते. 44तुमची केवढी दुर्दशा होणार! ओळखू न येणाऱ्या थडग्यांसारखे तुम्ही आहात. त्यांच्यावरून माणसे नकळत चालत फिरत असतात.”
45शास्त्र्यांपैकी एकाने त्याला म्हटले, “गुरुवर्य, तुम्ही असे बोलून आमचाही अपमान करता.”
46तो म्हणाला, “तुम्हां शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! वाहायला अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्यांना लावत नाही. 47तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी ठार मारले! 48अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार ठरता व तुमच्या पूर्वजांच्या कृत्यांना मान्यता देता; तुमच्या पूर्वजांनी तर संदेष्ट्यांना ठार मारले व तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता. 49ह्यावरून देवाच्या शहाणपणाने स्पष्ट केले आहे, ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यांतील कित्येकांना ते ठार मारतील व कित्येकांना छळतील.’ 50ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून सर्व संदेष्ट्यांचे रक्‍त, 51म्हणजे हाबेलच्या रक्‍तापासून वेदी व मंदिर ह्यांच्यामध्ये ज्या जखऱ्याचा घात करण्यात आला, त्याच्या रक्‍तापर्यंत जे रक्‍त सांडले गेले; त्याचा हिशेब ह्या पिढीकडून घेतला जाईल. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीकडून घेतला जाईल.
52तुम्हां शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ज्ञानाची किल्‍ली घेऊन गेलात, परंतु तुम्ही स्वतः आत गेला नाहीत व जे आत जात होते, त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.”
53येशू तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परुशी त्याच्यावर दबाव आणीत पुष्कळ गोष्टींविषयी त्याला चिथवू लागले. 54म्हणजेच त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात पकडावे म्हणून ते प्रयत्नशील होते.

Nu geselecteerd:

लूक 11: MACLBSI

Markering

Deel

Kopiëren

None

Wil je jouw markerkingen op al je apparaten opslaan? Meld je aan of log in