लूक 13

13
पश्चात्ताप करण्याविषयी बोध
1ज्या गालीलकरांचे रक्त पिलातने त्यांच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्याविषयी त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी येशूला सांगितले. 2त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ह्या गालीलकरांचा अशा प्रकारे अंत झाला ह्यावरून बाकीच्या सर्व गालीलकरांपेक्षा ते अधिक पापी होते, असे तुम्हांला वाटते काय? 3मी तुम्हांला सांगतो, नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्हां सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. 4किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहमधील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते, असे तुम्हांला वाटते काय? 5मी तुम्हांला सांगतो, नव्हते. मात्र जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्हां सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.”
अंजिराच्या निष्फळ झाडाचा दाखला
6येशूने त्यांना हा दाखला सांगितला:“कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहायला आला परंतु त्याला काही आढळले नाही. 7त्याने माळ्याला म्हटले, ‘पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अंजिराच्या झाडावर फळ पाहायला येत आहे परंतु मला काही फळ आढळत नाही म्हणून ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी?’ 8त्याने त्याला उत्तर दिले, ‘महाराज, एवढे वर्ष ते राहू द्या, मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. 9त्यानंतर त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकू शकता.’”
साबाथ दिवशी रोगमुक्‍त झालेली स्त्री
10येशू साबाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. 11तेथे अठरा वर्षे दुष्ट आत्म्याने पीडलेली एक स्त्री होती. ती कुबडी असल्यामुळे तिला सरळ उभे राहता येत नव्हते. 12येशूने तिला पाहून जवळ बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या पीडेपासून मुक्‍त झाली आहेस.” 13त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णन करू लागली.
14येशूने साबाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “जेव्हा काम केले पाहिजे, असे सहा दिवस आहेत, तर त्या दिवसांत येऊन बरे व्हा. साबाथ दिवशी येऊ नका.”
15परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, “अहो ढोंग्यांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव साबाथ दिवशी गोठ्यातून सोडून पाण्यावर नेतो ना? 16ही तर अब्राहामाची कन्या आहे. पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते. साबाथ दिवशी हिला या बंधनातून सोडविणे योग्य नव्हते काय?” 17तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधक फजीत झाले आणि जी आश्‍चर्यकारक कृत्ये त्याच्याकडून होत होती, त्या सर्वांमुळे लोकसमुदायाला आनंद झाला.
मोहरीच्या दाण्याचा व खमिराचा दाखला
18ह्यावरून तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? 19ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात लावला. मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यांवर राहू लागले.”
20तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ? 21ते खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
तारणप्राप्तीचे अरुंद प्रवेशद्वार
22तो नगरोनगरी व खेडोपाडी शिक्षण देत यरुशलेमकडे जात होता, 23तेव्हा एकाने त्याला विचारले, “प्रभो, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” 24तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही. 25घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोठावत म्हणू लागाल, ‘प्रभो, आमच्यासाठी दार उघड.’ तो तुम्हांला उत्तर देईल, “तुम्ही कुठले आहात, हे मला माहीत नाही.’ 26तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुझ्यासमोर खाणेपिणे केले आणि तू आमच्या रस्त्यावर शिक्षण दिलेस.’ 27परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कुठले आहात, हे मला माहीत नाही. अहो, अधर्म करणाऱ्या सर्वांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’ 28तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल. 29त्या वेळी पूर्वेकडून व पश्चिमेकडून तसेच उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील 30आणि पहा, जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.”
हेरोदचे वैर
31त्याच घटकेस कित्येक परुशी येऊन त्याला म्हणाले, “येथून निघून जा कारण हेरोद तुम्हांला ठार मारायला पाहत आहे.”
32त्याने त्यांना म्हटले, “त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी माझे काम पुरे करीन. 33तरीही मला आज, उद्या व परवा पुढे जात राहिले पाहिजे कारण यरुशलेमबाहेर संदेष्ट्यांचा नाश व्हावा, हे शक्य नाही.
यरुशलेमची स्थिती पाहून केलेला विलाप
34यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्या व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगड मारणाऱ्या नगरी! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्रित करते तसे तुझ्या मुलांबाळांना एकत्रित करण्याची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तू मला तसे करू दिले नाहीस! 35पाहा, तुमच्या प्रार्थनास्थळाची उपेक्षा होईल. मी तुम्हांला सांगतो, ‘प्रभूच्या नावाने येणारा तो धन्य!’, असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.”

Nu geselecteerd:

लूक 13: MACLBSI

Markering

Deel

Kopiëren

None

Wil je jouw markerkingen op al je apparaten opslaan? Meld je aan of log in