YouVersion लोगो
सर्च आयकॉन

जखर्‍या 1:7-17

जखर्‍या 1:7-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा याला, परमेश्वराचा संदेश प्राप्त झाला तो असा: “रात्र असतांना मला दृष्टांतात दिसले ते असे: तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक मनुष्य मी पाहिला आणि तो दरीतल्या मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा होता. त्याच्यामागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते.” मी विचारले, “प्रभू, हे कोण आहेत?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत मला म्हणाला, “हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.” मग मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा असलेल्या मनुष्याने उत्तर दिले व म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे पाठवले आहेत.” नंतर त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले व ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो आणि पाहा संपूर्ण पृथ्वी शांत व विसावली आहे.” मग परमेश्वराच्या दिव्यदूताने उत्तर देऊन म्हटले, “हे सेनाधीश परमेश्वरा, या सत्तर वर्षांपासून यरूशलेमेचे आणि यहूदातील नगरांनी जो क्रोध सहन केला आहे त्याविषयी आणखी किती काळ तू करूणा करणार नाहीस?” माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या देवदूताला परमेश्वर चांगल्या शब्दांत व सांत्वन देणाऱ्या शब्दांत बोलला. मग माझ्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचा दूत मला म्हणाला, “घोषणा करून सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: “मी यरूशलेम व सियोन यांच्यासाठी अती ईर्षावान असा झालो आहे! आणि स्वस्थ बसलेल्या राष्ट्रांवर माझा राग पेटला आहे; कारण मी तर थोडासाच रागावलो होतो, पण या राष्ट्रांनी त्यांच्या दुःखात आणखी भर घालण्याची मदत केली.” म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी यरूशलेमेकडे करुणामय होऊन परत फिरलो आहे. माझे निवासस्थान तिच्यात पुन्हा बांधले जाईल.” सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मापनसूत्र यरूशलेमेवर लावण्यात येईल.” पुन्हा पुकार आणि असे सांग, “सेनाधीश परमेश्वर म्हणतो: ‘माझी नगरे पुन्हा एकदा चांगूलपणाने भरभरून वाहतील, परमेश्वर पुन्हा सियोनचे सांत्वन करील, आणि तो पुन्हा एकदा यरूशलेमची निवड करील.”

सामायिक करा
जखर्‍या 1 वाचा

जखर्‍या 1:7-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी वर्षाच्या अकराव्या महिन्यातील चोविसाव्या दिवशी, शबात महिन्यात, संदेष्टा जखर्‍याह, बेरेख्याहचा पुत्र व इद्दोचा नातू याला याहवेहचे वचन प्राप्त झाले. रात्रीच्या वेळी मला एक दृष्टान्त मिळाला, एका तांबड्या घोड्यावर एक मनुष्य बसलेला मी पाहिला. तो एका खोऱ्यात मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता. त्याच्या पाठीमागे तांबडे, तपकिरी व पांढरे असे दुसरे घोडे होते. मी विचारले, “माझ्या प्रभू, हे सर्व काय आहे?” एक स्वर्गदूत जो माझ्याशी बोलत होता, त्याने उत्तर दिले, “ते काय आहे हे मी तुला दाखवेन.” मग मेंदीच्या झुडपांमध्ये उभे असलेल्या मनुष्याने सांगितले, “याहवेहने यांना संपूर्ण पृथ्वीवरून फेरी मारण्याकरिता पाठविले आहे.” मग त्यांनी मेंदीच्या झुडपांमध्ये उभ्या असलेल्या याहवेहच्या दूताला वृतांत सांगितला, “आम्ही सर्व पृथ्वीवरून फिरून आलो आहोत आणि संपूर्ण जगात विश्रांती व शांतता नांदत आहे.” मग याहवेहच्या दूताने म्हटले: “हे सर्वसमर्थ याहवेह, गेली सत्तर वर्षे तुम्ही यरुशलेम व यहूदीयाच्या नगरांवर संतापलेले आहात, त्यांच्यावर दया करण्याचे तुम्ही किती वेळ नाकारणार आहात?” तेव्हा माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला याहवेहने सांत्वनपर व आश्वासनदायक उत्तर दिले. मग माझ्याशी संवाद करीत असलेला याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “या वचनाची घोषणा कर: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘मी यरुशलेम व सीयोनाबाबत अत्यंत ईर्ष्यावान आहे, ज्या अन्य राष्ट्रांना सुरक्षित वाटते त्यांच्यावर मी फार क्रोधित झालो आहे, कारण आधी मी माझ्या लोकांवर थोडा नाराज होतो, पण त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार मिळालेली राष्ट्रे मर्यादेपलिकडे गेली.’ “म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी करुणायुक्त होऊन यरुशलेमकडे परत येईन आणि तिथे माझे भवन पुन्हा बांधले जाईल आणि मापनपट्टी यरुशलेमवर ताणली जाईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. “आणखी पुढे घोषणा करा: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘माझी नगरे पुन्हा समृद्धीने ओसंडून वाहू लागतील आणि याहवेह पुन्हा सीयोनाचे सांत्वन करतील आणि यरुशलेमची निवड करतील.’ ”

सामायिक करा
जखर्‍या 1 वाचा

जखर्‍या 1:7-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

दारयावेशाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्‍या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे : “मला रात्री दृष्टान्त झाला तो असा : एक मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार झाला असून तळवटीतल्या मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता; त्याच्यामागे तांबडे, सावळे व पांढरे घोडे होते. मी म्हणालो, ‘माझ्या प्रभू, हे कोण आहेत?’ तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत म्हणाला, ‘हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.’ तेव्हा मेंदीच्या झुडपात उभे असलेल्या पुरुषाने उत्तर दिले की, ‘पृथ्वीवर फेरी करण्यासाठी परमेश्वराने ज्यांना पाठवले ते हे :’ तेव्हा त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभे असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले की, ‘आम्ही पृथ्वीवरून फेरी करून आलो आहोत; पाहा, सर्व पृथ्वी स्वस्थ व शांत बसली आहे.’ तेव्हा परमेश्वराचा दिव्यदूत म्हणाला, ‘हे सेनाधीश परमेश्वरा, तू आज सत्तर वर्षे यरुशलेम व यहूदाची नगरे ह्यांवर कोपायमान झाला आहेस; त्यांच्यावर तू कोठवर करुणा करणार नाहीस?’ तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला परमेश्वर चांगले व सांत्वनदायक शब्द बोलला. मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, ‘असे जाहीर कर की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, यरुशलेम व सीयोन ह्यांविषयी मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे. जी राष्ट्रे स्वस्थ आहेत त्यांच्यावर माझा राग फार पेटला आहे; कारण मी थोडासा रागावलो होतो पण त्यांनी अरिष्ट वाढवले. ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, मी करुणायुक्त होऊन पुन्हा यरुशलेमेकडे वळत आहे; त्यात माझे मंदिर बांधतील असे सेनाधीश परमेश्वराचे म्हणणे आहे; यरुशलेमेवर मापनसूत्र लावतील. पुन्हा पुकारून सांग की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझी नगरे पुन्हा सुबत्तेने भरून जातील; परमेश्वर पुन्हा सीयोनेचे सांत्वन करील, तो पुन्हा यरुशलेमेस निवडील.”’

सामायिक करा
जखर्‍या 1 वाचा