YouVersion लोगो
सर्च आयकॉन

जखर्‍याह 1

1
याहवेहकडे परतण्याचे आव्हान
1दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा नातू व बेरेख्याहचा पुत्र, संदेष्टा जखर्‍याहला याहवेहकडून हे वचन प्राप्त झाले:
2“याहवेह तुमच्या पूर्वजांवर अत्यंत क्रोधित झाले होते. 3म्हणून लोकांना सांग: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही माझ्याकडे परत या आणि मी तुम्हाकडे परत येईन,’ सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. 4तुमच्या पूर्वजांसारखे तुम्ही होऊ नका, ज्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी घोषणा केली: ‘आपल्या दुष्ट मार्गापासून व दुष्ट प्रथांपासून मागे वळा.’ पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याच्याकडे लक्ष दिले नाही, याहवेह जाहीर करतात. 5तुमचे पूर्वज कुठे आहेत? आणि संदेष्टे, ते कायमचे जगतात का? 6पण माझी वचने व माझे नियम जे मी माझ्या सेवक संदेष्ट्यांना आज्ञापिले होते, त्यांनी तुमच्या पूर्वजांना मागे टाकले आहे ना?
“तेव्हा त्यांनी पश्चात्ताप केला व ते म्हणाले, ‘आमचे वागणे व प्रथांमुळे याहवेहकडून आम्हाला जी शिक्षा मिळाली, त्यास आम्ही पात्र आहोत. जी करण्याचा त्यांनी निर्धार केला होता.’ ”
मेंदीच्या झुडूपांमधील मनुष्य
7दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी वर्षाच्या अकराव्या महिन्यातील चोविसाव्या दिवशी, शबात महिन्यात, संदेष्टा जखर्‍याह, बेरेख्याहचा पुत्र व इद्दोचा नातू याला याहवेहचे वचन प्राप्त झाले.
8रात्रीच्या वेळी मला एक दृष्टान्त मिळाला, एका तांबड्या घोड्यावर एक मनुष्य बसलेला मी पाहिला. तो एका खोऱ्यात मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता. त्याच्या पाठीमागे तांबडे, तपकिरी व पांढरे असे दुसरे घोडे होते.
9मी विचारले, “माझ्या प्रभू, हे सर्व काय आहे?”
एक स्वर्गदूत जो माझ्याशी बोलत होता, त्याने उत्तर दिले, “ते काय आहे हे मी तुला दाखवेन.”
10मग मेंदीच्या झुडपांमध्ये उभे असलेल्या मनुष्याने सांगितले, “याहवेहने यांना संपूर्ण पृथ्वीवरून फेरी मारण्याकरिता पाठविले आहे.”
11मग त्यांनी मेंदीच्या झुडपांमध्ये उभ्या असलेल्या याहवेहच्या दूताला वृतांत सांगितला, “आम्ही सर्व पृथ्वीवरून फिरून आलो आहोत आणि संपूर्ण जगात विश्रांती व शांतता नांदत आहे.”
12मग याहवेहच्या दूताने म्हटले: “हे सर्वसमर्थ याहवेह, गेली सत्तर वर्षे तुम्ही यरुशलेम व यहूदीयाच्या नगरांवर संतापलेले आहात, त्यांच्यावर दया करण्याचे तुम्ही किती वेळ नाकारणार आहात?” 13तेव्हा माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला याहवेहने सांत्वनपर व आश्वासनदायक उत्तर दिले.
14मग माझ्याशी संवाद करीत असलेला याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “या वचनाची घोषणा कर: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘मी यरुशलेम व सीयोनाबाबत अत्यंत ईर्ष्यावान आहे, 15ज्या अन्य राष्ट्रांना सुरक्षित वाटते त्यांच्यावर मी फार क्रोधित झालो आहे, कारण आधी मी माझ्या लोकांवर थोडा नाराज होतो, पण त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार मिळालेली राष्ट्रे मर्यादेपलिकडे गेली.’
16“म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी करुणायुक्त होऊन यरुशलेमकडे परत येईन आणि तिथे माझे भवन पुन्हा बांधले जाईल आणि मापनपट्टी यरुशलेमवर ताणली जाईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
17“आणखी पुढे घोषणा करा: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘माझी नगरे पुन्हा समृद्धीने ओसंडून वाहू लागतील आणि याहवेह पुन्हा सीयोनाचे सांत्वन करतील आणि यरुशलेमची निवड करतील.’ ”
चार शिंगे व चार शिल्पकार
18नंतर मी वर पाहिले तर मला चार शिंगे दिसली. 19मी माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला विचारले, “हे काय आहे?”
त्याने उत्तर दिले, “ही शिंगे आहेत, ज्यांनी यहूदीया, इस्राएल आणि यरुशलेम येथील लोकांची पांगापांग केली.”
20नंतर याहवेहने मला चार शिल्पकार दाखविले. 21तेव्हा मी विचारले, “हे काय करण्यासाठी आले आहेत?”
तेव्हा याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “ही ती चार शिंगे आहेत ज्यांनी यहूदीयाची इतकी पांगापांग केली, की कोणीही आपले मस्तक वर उचलू शकले नाही, पण हे शिल्पकार त्या चार शिंगांना पकडून भयभीत करून व यहूदीयाविरुद्ध आपली शिंगे उंच करून तिच्या लोकांची पांगापांग करणाऱ्या राष्ट्रांना फेकून देण्यासाठी आले आहेत.”

सध्या निवडलेले:

जखर्‍याह 1: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन