जखर्या 1
1
परमेश्वराकडे वळण्याचे आवाहन
1दारयावेशाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :
2“परमेश्वर तुमच्या वाडवडिलांवर फार कोपायमान झाला,
3म्हणून तू त्यांना असे सांग : ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळेन,’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
4तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका; त्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी पुकारून सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या कुमार्गांपासून व आपल्या दुष्कर्मांपासून परावृत्त व्हा; पण त्यांनी माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो.
5तुमचे पूर्वज आता कोठे आहेत? संदेष्टे तरी सर्वकाळ जगतात काय?
6असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे ह्यांना जी वचने व नियम मी आज्ञापले होते त्यांनी तुमच्या पूर्वजांना गाठले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे ह्यांप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे.”
संदेष्ट्याला घोड्यांचा दृष्टान्त
7दारयावेशाच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :
8“मला रात्री दृष्टान्त झाला तो असा : एक मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार झाला असून तळवटीतल्या मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता; त्याच्यामागे तांबडे, सावळे व पांढरे घोडे होते.
9मी म्हणालो, ‘माझ्या प्रभू, हे कोण आहेत?’ तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत म्हणाला, ‘हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.’
10तेव्हा मेंदीच्या झुडपात उभे असलेल्या पुरुषाने उत्तर दिले की, ‘पृथ्वीवर फेरी करण्यासाठी परमेश्वराने ज्यांना पाठवले ते हे :’
11तेव्हा त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभे असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले की, ‘आम्ही पृथ्वीवरून फेरी करून आलो आहोत; पाहा, सर्व पृथ्वी स्वस्थ व शांत बसली आहे.’
12तेव्हा परमेश्वराचा दिव्यदूत म्हणाला, ‘हे सेनाधीश परमेश्वरा, तू आज सत्तर वर्षे यरुशलेम व यहूदाची नगरे ह्यांवर कोपायमान झाला आहेस; त्यांच्यावर तू कोठवर करुणा करणार नाहीस?’
13तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्या दिव्यदूताला परमेश्वर चांगले व सांत्वनदायक शब्द बोलला.
14मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, ‘असे जाहीर कर की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, यरुशलेम व सीयोन ह्यांविषयी मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे.
15जी राष्ट्रे स्वस्थ आहेत त्यांच्यावर माझा राग फार पेटला आहे; कारण मी थोडासा रागावलो होतो पण त्यांनी अरिष्ट वाढवले.
16ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, मी करुणायुक्त होऊन पुन्हा यरुशलेमेकडे वळत आहे; त्यात माझे मंदिर बांधतील असे सेनाधीश परमेश्वराचे म्हणणे आहे; यरुशलेमेवर मापनसूत्र लावतील.
17पुन्हा पुकारून सांग की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझी नगरे पुन्हा सुबत्तेने भरून जातील; परमेश्वर पुन्हा सीयोनेचे सांत्वन करील, तो पुन्हा यरुशलेमेस निवडील.”’
शृंगे व लोहार ह्यांचा दृष्टान्त
18मी आपले डोळे वर करून पाहिले आणि पाहा, चार शृंगे दृष्टीस पडली.
19माझ्याबरोबर भाषण करणार्या दिव्यदूताला मी विचारले, “ही काय आहेत?” त्याने मला म्हटले, “ज्यामुळे यहूदा, इस्राएल व यरुशलेम ही परागंदा झाली आहेत ती ही शृंगे.”
20आणखी परमेश्वराने मला चार लोहार दाखवले.
21मी विचारले, “ह्यांचे येथे काय काम?” तो मला म्हणाला, “ज्यांनी यहूदास परागंदा करून कोणाला आपले डोके वर काढू दिले नाही ती ही शृंगे आहेत; परंतु आता त्यांना भेदरवून सोडावे व ज्या राष्ट्रांनी यहूदास परागंदा करण्यासाठी त्याच्या भूमीविरुद्ध आपले शृंग उचलले त्यांची शृंगे पाडून टाकावीत म्हणून हे आले आहेत.”
सध्या निवडलेले:
जखर्या 1: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.