YouVersion लोगो
सर्च आयकॉन

हाग्गय 2

2
नव्या मंदिराचे ऐश्वर्य
1सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे :
2आता यहूदाचा प्रांताधिकारी शल्तीएल ह्याचा पुत्र जरूब्बाबेल, मुख्य याजक यहोसादाक ह्याचा पुत्र यहोशवा आणि अवशिष्ट लोक ह्यांना असे विचार :
3‘ज्याने ह्या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हांला दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय?
4हे जरूब्बाबेला, हिम्मत धर,’ असे परमेश्वर म्हणतो; ‘हे मुख्य याजका, यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर; परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास लागा; मी तुमच्याबरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
5तुम्ही मिसर देशातून निघालात तेव्हा तुमच्याबरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठायी कायम आहे; तुम्ही भिऊ नका.
6कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन, ही हलवून सोडीन;
7मी सर्व राष्ट्रांना हलवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू येतील;1 आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
8रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
9ह्या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी ह्या स्थळाला शांती देईन,”’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
बेइमानीबद्दल लोकांचा निषेध
10दारयावेशाच्या कारकिर्दिच्या दुसर्‍या वर्षी नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे हे वचन आले :
11सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “याजकांना शास्त्राचा अर्थ विचारा की,
12‘कोणी समर्पित मांस आपल्या वस्त्राच्या पदरात घेऊन जात असता त्याच्या पदराचा भाकरीला, कालवणाला, द्राक्षारसाला, तेलाला किंवा इतर कोणत्याही अन्नाला स्पर्श झाला, तर ते पवित्र होईल काय?”’ तेव्हा याजकांनी “नाही” असे उत्तर दिले.
13मग हाग्गय म्हणाला, “प्रेताचा स्पर्श झाल्यामुळे कोणी अशुद्ध झालेला ह्यांपैकी कशासही शिवला, तर ते अशुद्ध होईल ना?” तेव्हा याजकांनी “होईल” असे उत्तर दिले.
14हाग्गयाने म्हटले, “परमेश्वर म्हणतो की ह्या लोकांची व ह्या राष्ट्राची माझ्या दृष्टीने अशीच स्थिती आहे, आणि त्यांच्या हातचे प्रत्येक काम असेच आहे; तेथे ते जे अर्पण करतात ते अशुद्ध आहे.
15आजपासून मागची, म्हणजे परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड रचण्यापूर्वीची, जी स्थिती होती तिच्याकडे लक्ष पुरवा;
16त्या सर्व दिवसांत कोणी वीस मापे धान्याच्या राशीकडे गेला तर त्याच्या हाती दहा लागत; द्राक्षकुंडांतून पन्नास पात्रे भरून काढण्यास गेला तर त्याला वीसच मिळत.
17मी तुमच्यावर, तुमच्या हातच्या सर्व कामांवर तांबेरा, भेरड व गारा ह्यांचा मारा केला; तरी तुमच्यातला एकही माझ्याकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो.
18ह्यास्तव आजपासून मागच्या म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या तारखेस परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला त्या मागच्या काळाकडे लक्ष पुरवा.
19कोठारांत काही धान्य आले आहे काय? द्राक्षलता, अंजिराचे झाड, डाळिंब व जैतून ह्यांना काही फळ आले नाही. आजच्या दिवसापासून मी तुम्हांला आशीर्वाद देईन.”
जरूब्बाबेलला परमेश्वराचे अभिवचन
20महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गयाला परमेश्वराचे वचन दुसर्‍यांदा प्राप्त झाले की,
21“यहूदाचा प्रांताधिकारी जरूब्बाबेल ह्याला सांग : मी आकाश व पृथ्वी ही हलवून सोडीन;
22मी राज्यांचे तक्त उलथून टाकीन, राष्ट्रांच्या राज्यांचे बल नष्ट करीन; रथ व रथी उलथून टाकीन, घोडे व त्यांवरील स्वार पतन पावतील, प्रत्येक आपल्या भावाच्या तलवारीने पडेल.
23सेनाधीश परमेश्वर म्हणतो : त्या दिवशी, हे जरूब्बाबेला, शल्तीएलाच्या पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण मी तुला निवडले आहे,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

सध्या निवडलेले:

हाग्गय 2: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन