YouVersion लोगो
सर्च आयकॉन

जखर्‍या 1:7-17

जखर्‍या 1:7-17 MARVBSI

दारयावेशाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्‍या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे : “मला रात्री दृष्टान्त झाला तो असा : एक मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार झाला असून तळवटीतल्या मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता; त्याच्यामागे तांबडे, सावळे व पांढरे घोडे होते. मी म्हणालो, ‘माझ्या प्रभू, हे कोण आहेत?’ तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत म्हणाला, ‘हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.’ तेव्हा मेंदीच्या झुडपात उभे असलेल्या पुरुषाने उत्तर दिले की, ‘पृथ्वीवर फेरी करण्यासाठी परमेश्वराने ज्यांना पाठवले ते हे :’ तेव्हा त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभे असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले की, ‘आम्ही पृथ्वीवरून फेरी करून आलो आहोत; पाहा, सर्व पृथ्वी स्वस्थ व शांत बसली आहे.’ तेव्हा परमेश्वराचा दिव्यदूत म्हणाला, ‘हे सेनाधीश परमेश्वरा, तू आज सत्तर वर्षे यरुशलेम व यहूदाची नगरे ह्यांवर कोपायमान झाला आहेस; त्यांच्यावर तू कोठवर करुणा करणार नाहीस?’ तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला परमेश्वर चांगले व सांत्वनदायक शब्द बोलला. मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, ‘असे जाहीर कर की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, यरुशलेम व सीयोन ह्यांविषयी मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे. जी राष्ट्रे स्वस्थ आहेत त्यांच्यावर माझा राग फार पेटला आहे; कारण मी थोडासा रागावलो होतो पण त्यांनी अरिष्ट वाढवले. ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, मी करुणायुक्त होऊन पुन्हा यरुशलेमेकडे वळत आहे; त्यात माझे मंदिर बांधतील असे सेनाधीश परमेश्वराचे म्हणणे आहे; यरुशलेमेवर मापनसूत्र लावतील. पुन्हा पुकारून सांग की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझी नगरे पुन्हा सुबत्तेने भरून जातील; परमेश्वर पुन्हा सीयोनेचे सांत्वन करील, तो पुन्हा यरुशलेमेस निवडील.”’