रोमकरांस पत्र 9:9-21
रोमकरांस पत्र 9:9-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’ आणि इतकेच नाही; पण ज्या एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून रिबेका गरोदर असतेवेळी, आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्याच्या इच्छेप्रमाणे, तिला सांगण्यात आले होते की, ‘मोठा धाकट्याची सेवा करील.’ कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘याकोबावर मी प्रीती केली पण एसावाचा द्वेष केला.’ मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो. कारण तो मोशेला म्हणतो, ‘मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करीन आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करीन.’ तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे. म्हणून शास्त्रलेख फारोला म्हणतो, ‘मी तुला ह्यासाठी मोठे केले की, तुझ्याद्वारे मी माझे सामर्थ्य प्रकट करावे आणि सर्व पृथ्वीवर माझे नाव गाजविले जावे.’ म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठिण करतो. तू ह्यावर म्हणशील की, तो तरीही दोष का लावतो? त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे? पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्याला म्हणू शकेल? कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय?
रोमकरांस पत्र 9:9-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण अशा रीतीने वचन दिले होते: “ठरलेल्या वेळी मी परतेन त्यावेळी सारेला पुत्र होईल.” एवढेच नव्हे, परंतु रिबेकाच्या लेकरांचीही एकाच वेळी आपला बाप इसहाक यांच्याद्वारे गर्भधारणा झाली होती. जुळ्या मुलांचा जन्म होण्याअगोदर, किंवा चांगले वाईट करण्याअगोदर; परमेश्वराचा उद्देश निवडीसंबंधाने कायम राहावा. कृत्याने नव्हे तर पाचारण देणार्याने असे रिबेकाला सांगितले होते, “मोठा लहान्याची सेवा करील.” जसे शास्त्रलेखात लिहिले आहे: “मी याकोबावर प्रीती केली, परंतु एसावाचा द्वेष केला.” तर मग आपण काय म्हणावे? परमेश्वर अन्यायी आहे का? नक्कीच नाही. कारण ते मोशेला म्हणाले: “ज्या कोणावर मला दया करावयाची असेल, त्यांच्यावर मी दया करेन आणि ज्यांच्यावर करुणा करावयाची माझी इच्छा आहे, त्यांच्यावर मी करुणा करेन.” हे मानवी इच्छेने किंवा प्रयत्नांनी नव्हे, तर परमेश्वराच्या दयेवर अवलंबून आहे. शास्त्रलेख फारोला सांगते: “तुला उभे करण्यात माझा एकमात्र उद्देश हा होता, की माझे सामर्थ्य तुझ्यामध्ये प्रकट व्हावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.” यास्तव ज्यांच्यावर दया करावी असे परमेश्वराला वाटते, त्यांच्यावर ते दया करतात व ज्याला कठोर करावे त्यांना ते कठोर करतात. तुमच्यापैकी काही मला म्हणतील: “परमेश्वर आम्हाला दोष का लावतात? त्यांच्या इच्छेला विरोध कोण करणार?” मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? “घडलेल्या वस्तुने ती घडविणार्याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ ” कुंभाराला एकाच मातीच्या गोळयातून एक पात्र विशेष उद्देशासाठी व दुसरे सर्वसामान्य उद्देशासाठी घडविण्याचा अधिकार नाही काय?
रोमकरांस पत्र 9:9-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण, “पुढे ह्याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल,” ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते. इतकेच नव्हे, तर रिबकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिल्यावर, मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरेवाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मांमुळे नव्हे, तर पाचारण करणार्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा, म्हणून तिला सांगण्यात आले की, “वडील धाकट्याची सेवा करील.” त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला.” तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय आहे काय? कधीच नाही! कारण तो मोशेला म्हणतो, “ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन.” ह्यावरून हे इच्छा बाळगणार्यावर नव्हे किंवा धावपळ करणार्यावर नव्हे, तर दया करणार्या देवावर अवलंबून आहे. शास्त्रलेख फारोला असे सांगतो, “मी तुला पुढे केले आहे ते ह्याचकरता की, तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.” ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल त्याला तो ‘कठीण हृदयाचे करतो.’ ह्यावर तू मला म्हणशील, तर मग तो अजून दोष का लावत असतो? कारण त्याच्या संकल्पाला कोण आड आला आहे? हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडवणार्याला, “तू मला असे का केलेस,” असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय?
रोमकरांस पत्र 9:9-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण पुढे ह्याच सुमारास मी येईन, तेव्हा सारेला पुत्र होईल, ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते. इतकेच नव्हे, तर रिबकादेखील आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिली व तिच्या दोन मुलांविषयी त्यांनी काही बरे-वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प होता, म्हणजे जो कृत्यामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेनुसार होता, तो पूर्ण व्हावा म्हणून तिला सांगण्यात आले की, मोठा मुलगा धाकट्याची सेवा करील. त्याचप्रमाणे धर्मशास्त्रात असे लिहिले आहे, ‘मी याकोबवर प्रीती केली आणि एसावचा द्वेष केला.’ तर आपण काय म्हणावे? देवाकडून अन्याय होतो काय? मुळीच नाही! कारण तो मोशेला म्हणतो, ‘ज्या कोणावर मला दया करावयाची आहे, त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करू इच्छितो त्याच्यावर मी करुणा करीन.’ ह्यावरून इच्छा बाळगणाऱ्या किंवा कृती करणाऱ्यावर काही अवलंबून नाही; तर दया करणाऱ्या देवावर सर्वकाही अवलंबून आहे. धर्मशास्त्रलेख इजिप्तच्या राजाला असे सांगतो, ‘मी तुला राजा केले आहे ते ह्यासाठी की, तुझ्याद्वारे मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.’ ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल, त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल, त्याला तो कठीण हृदयाचे करतो. ह्यावर तू मला म्हणशील, “तर मग तो कुणालाही दोष कसा लावू शकतो? कारण त्याच्या संकल्पाच्या आड कोण येऊ शकतो?” हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला, “तू मला असे का केलेस?”, असे म्हणेल काय? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे, असा कुंभाराचा अधिकार मातीच्या गोळ्यावर नाही काय?