YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 9

9
इस्राएली लोकांच्या अविश्वासाबद्दल खंत
1मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सदसद्विवेकबुद्धीही पवित्र आत्म्याच्या साहाय्याने माझ्याबरोबर साक्ष देते की, 2मला मोठे दु:ख वाटते व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना होतात. 3कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे, हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. 4ते इस्राएली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी वैभव, करारमदार, नियमशास्त्र, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत. 5महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे, तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ असून युगानुयुगे धन्य असा देव आहे. आमेन.
देवाने दिलेली वचने व्यर्थ झाली नाहीत
6देवाचे वचन व्यर्थ झाले, असे मी म्हणत नाही, इस्राएल वंशांतले ते सर्व इस्राएली आहेत, असे नाही. 7ते अब्राहामचे पुत्र आहेत म्हणून ती सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर इसहाकच्याच वंशाला तुझे पुत्र मानले जाईल. 8म्हणजे देहस्वभावानुसार झालेली मुले देवाची मुले आहेत, असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात; 9कारण पुढे ह्याच सुमारास मी येईन, तेव्हा सारेला पुत्र होईल, ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते.
10इतकेच नव्हे, तर रिबकादेखील आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून गरोदर राहिली व तिच्या दोन मुलांविषयी 11त्यांनी काही बरे-वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प होता, म्हणजे जो कृत्यामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेनुसार होता, तो पूर्ण व्हावा 12म्हणून तिला सांगण्यात आले की, मोठा मुलगा धाकट्याची सेवा करील. 13त्याचप्रमाणे धर्मशास्त्रात असे लिहिले आहे, ‘मी याकोबवर प्रीती केली आणि एसावचा द्वेष केला.’
देव अन्यायी नाही
14तर आपण काय म्हणावे? देवाकडून अन्याय होतो काय? मुळीच नाही! 15कारण तो मोशेला म्हणतो, ‘ज्या कोणावर मला दया करावयाची आहे, त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करू इच्छितो त्याच्यावर मी करुणा करीन.’ 16ह्यावरून इच्छा बाळगणाऱ्या किंवा कृती करणाऱ्यावर काही अवलंबून नाही; तर दया करणाऱ्या देवावर सर्वकाही अवलंबून आहे. 17धर्मशास्त्रलेख इजिप्तच्या राजाला असे सांगतो, ‘मी तुला राजा केले आहे ते ह्यासाठी की, तुझ्याद्वारे मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.’ 18ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल, त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल, त्याला तो कठीण हृदयाचे करतो.
परमेश्वराचा क्रोध आणि करुणा
19ह्यावर तू मला म्हणशील, “तर मग तो कुणालाही दोष कसा लावू शकतो? कारण त्याच्या संकल्पाच्या आड कोण येऊ शकतो?” 20हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला, “तू मला असे का केलेस?”, असे म्हणेल काय? 21किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे, असा कुंभाराचा अधिकार मातीच्या गोळ्यावर नाही काय?
22आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वागवून घेतले 23-24आणि ज्या आपल्याला केवळ यहुदी लोकांतून नव्हे तर यहुदीतरांतूनही पाचारण झाले, त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्रांविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी, असे त्याला वाटत असले, तर काय? 25होशेयच्या पुस्तकात परमेश्वर हेही म्हणतो:
जे माझे लोक नव्हते,
त्यांना मी माझे लोक म्हणेन
आणि जे राष्ट्र प्रिय नाही
त्याला प्रिय म्हणेन
26आणि असे होईल की,
तुम्ही माझे लोक नाही,
असे जेथे म्हटले होते,
तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र
असे म्हणण्यात येईल.
27यशयासुद्धा इस्राएलविषयी असे म्हणतो:
जरी इस्राएली लोकांची संख्या
समुद्राच्या वाळूसारखी असली,
तरी थोड्याच लोकांचा बचाव केला जाईल;
28कारण प्रभू पृथ्वीविषयीचा त्याचा न्याय त्वरित आणि निर्णायकरीत्या पूर्ण करील.
29हे यशयाने पूर्वीच म्हटल्याप्रमाणे आहे:
जर सेनाधीश प्रभूने आमच्यांसाठी
बीज राहू दिले नसते,
तर आम्ही सदोम नगरासारखे झालो असतो व आमची अवस्था
गमोर नगराप्रमाणे झाली असती.
नीतिमत्त्व प्राप्त न होण्याचे कारण
30तर मग आपण असे म्हणावे की, जे यहुदीतर नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते, त्यांना विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले. 31परंतु इस्राएली लोक नीतिमत्त्वाच्या नियमशास्त्रामागे लागले होते तरी ते त्या नियमशास्त्रापर्यंत जाऊन पोहोचले नाहीत. 32का? कारण विश्वासाने नव्हे तर कृत्यांनी कार्य होईल, असे समजून ते त्याच्या मागे लागले. अशा प्रकारे अडथळ्याच्या धोंड्यावर ते ठेचाळले. 33त्याप्रमाणे धर्मशास्त्रात लिहिले आहे:
पाहा, सीयोनमध्ये मी अडथळ्याचा धोंडा, अडखळण्याचा खडक ठेवतो,
लोक त्यावर पडतील.
परंतु त्याच्यावर जो विश्वास ठेवील,
तो फजित होणार नाही.

सध्या निवडलेले:

रोमकरांना 9: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन