YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 4:11-18

नहेम्या 4:11-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि आपले शत्रू म्हणतात, “यहूद्यांना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आम्ही त्यांच्यात शिरकाव केलेला असेल आणि आम्ही त्यांना मारुन टाकू म्हणजे कामच थांबेल.” त्यावेळी जे यहूदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे आले आणि आमच्याविरूद्ध त्यांनी जी योजना केली होती त्याविषयी इशारा देऊन दहा वेळा बोलले. तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काहीजणांना ठेवले. प्रत्येक कुटुंबाला ठराविक जागेवर नेमले. त्यांच्याजवळ तलवारी, भाले आणि धनुष्य ही शस्त्रे होती. सगळी परिस्थिती मी डोळ्यांखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूंची भीती बाळगू नका. आमचा प्रभू, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे, त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद, मुले, मुली, आपल्या स्त्रिया आणि घरेदारे यांच्यासाठी लढा.” आपले बेत आम्हास कळून चुकले आहेत हे आमच्या शत्रूंनी ऐकले आणि देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आपल्या वाट्याचे काम करु लागला. त्यादिवसापासून माझे निम्मे सेवक फक्त तटबंदीचे काम करत होते आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य, यासह चिलखत घालत, सर्व यहूदी लोकांच्या पाठीमागे अधिकारी उभे होते. बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती. तलवार कमरेला बांधूनच प्रत्येकजण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इशाऱ्याचे रणशिंग वाजवणारा मनुष्य माझ्या शेजारीच होता.

सामायिक करा
नहेम्या 4 वाचा

नहेम्या 4:11-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आमच्या शत्रूंनी हे देखील म्हटले, “त्यांना काही कळण्याआधी व ते आपल्याला पाहण्याआधी, आपण त्यांच्यामध्ये जाऊ, अचानक हल्ला करून आपण त्यांना ठार करू व त्यांचे काम बंद करू.” तेव्हा जवळपास राहणारे यहूदी लोक आले व आम्हाला दहा वेळेस येऊन सांगून गेले, “तुम्ही ज्या दिशेने जाल, हे लोक त्या दिशेने तुमच्यावर हल्ला करतील.” याकारणास्तव मी प्रत्येक कुटुंबानुसार काही लोक निवडले व त्यांना तलवारी, भाले व धनुष्‍यबाण देऊन तटाच्या खालच्या मागील खुल्या जागी त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांना पहारेकरी म्हणून बसविले. संपूर्ण परिस्थितीकडे नजर टाकल्यावर, मी उभा राहिलो व सर्व प्रतिष्ठितांना, अधिकाऱ्यांना व बाकी लोकांना एकत्र बोलाविले आणि त्यांना म्हणालो, “त्यांना भिऊ नका! महान व भयावह परमेश्वराची आठवण ठेवा. आपल्या कुटुंबांसाठी, तुमच्या पुत्रांसाठी, तुमच्या कन्यांसाठी, तुमच्या पत्नीसाठी आणि घरांसाठी लढा!” आमच्या शत्रूंनी ऐकले की आम्हाला त्यांचा कट समजला आहे आणि परमेश्वराने त्यांच्या सर्व योजना व्यर्थ केल्या आहेत. मग आम्ही तट बांधण्याच्या कामाला पुन्हा लागलो. पण त्या दिवसापासून पुढे माझे फक्त अर्धेच पुरुष काम करीत असत व बाकी अर्धे पाठीमागे भाले, ढाली, धनुष्य व शस्त्रे घेऊन होते. हे अधिकारी जे यहूदीयाचे लोक बांधकाम करीत होते त्यांच्यामागे उभे राहिले. जे कामकरी सामान नेआण करीत, ते आपली लढाईची शस्त्रे एका हातात ठेवून दुसऱ्या हाताने कामे करीत असत. आपल्या कमरेला तलवारी लटकवून प्रत्येकजण काम करीत असत. मात्र रणशिंग वाजविणारा माझ्याजवळच असे.

सामायिक करा
नहेम्या 4 वाचा

नहेम्या 4:11-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आमचे शत्रू म्हणाले, “आम्ही त्यांच्यामध्ये शिरून त्यांना मारून टाकू व त्यांचे काम बंद पाडीपर्यंत त्यांना काही कळायचे नाही की दिसायचे नाही.” मग जे यहूदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे दहादा येऊन म्हणाले की, “तुम्ही आमच्याकडे परत या.” ह्या कारणास्तव लोकांच्या हाती तलवारी, बरच्या व धनुष्ये देऊन कोटाच्या मागे अगदी खालच्या खुल्या ठिकाणी त्यांच्या घराण्यांप्रमाणे मी त्यांना ठेवले. ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक ह्यांना म्हणालो, “त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.” देवाने आमच्या शत्रूंची मसलत व्यर्थ केली हे आमच्या शत्रूंनी ऐकले तेव्हा आम्ही सगळे कोटाकडे परत जाऊन आपापल्या कामावर रुजू झालो. त्या दिवसापासून माझे अर्धे सेवक कामास लागत व अर्धे भाले, ढाली, धनुष्ये, चिलखते धारण करत आणि यहूदाच्या सर्व घराण्यांमागे त्यांचे सरदार उभे असत. कोट बांधणारे व भारवाहक एका हाताने काम करत व दुसर्‍या हातात शस्त्रे धारण करत. बांधकाम करणारे आपल्या कंबरेस तलवार लावून काम करत. रणशिंग वाजवणारा माझ्याजवळ असे.

सामायिक करा
नहेम्या 4 वाचा