नहेम्या 4
4
पुनर्बांधणीस विरोध
1आम्ही कोटाची पुन्हा बांधणी करीत आहोत, हे सनबल्लटाला समजले, तेव्हा तो संतापला आणि अत्यंत कृद्ध झाला. त्याने यहूदी लोकांचा उपहास केला. 2आपले सोबती व शोमरोनचे सेनाधिकारी यांच्यादेखत थट्टा करीत तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करीत आहेत? ते तटाची पुनर्बांधणी करू शकतील काय? ते अर्पणे वाहू शकतील काय? एका दिवसात ते कामे संपवू शकतील काय? मातीच्या ढिगार्यातून उपसून काढलेल्या दगडात ते प्राण घालू शकतील काय—ते तर पार जळून गेलेले दगड!”
3तोबीयाह अम्मोनी त्याच्या जवळच उभा होता. तो बोलला, “काय तरी यांचे बांधकाम—एखादा कोल्हा जरी यांच्या त्या तटावरून चालत गेला तरी तो दगडी तट कोसळेल!”
4आमच्या परमेश्वरा, आमचे ऐका, कारण आमचा उपहास होत आहे. त्यांची थट्टा त्यांच्याच शिरी उलटो आणि एखाद्या परकीय देशात बंदिवान म्हणून त्यांची लूट होऊ द्या. 5त्यांच्या अपराधांकडे डोळेझाक करू नका; त्यांचे पाप पुसून टाकू नका, कारण बांधणार्यांना त्यांनी अपमानित केले आहे.
6शेवटी मूळ उंचीच्या अर्ध्या उंचीपर्यंतचा तट पूर्ण झाला, कारण लोकांनी अगदी मन लावून काम केले होते.
7पण सनबल्लट, तोबीयाह अरबी, अम्मोनी व अश्दोदी यांनी ऐकले की यरुशलेमच्या तटाचे काम झपाट्याने पुढे चालले आहे आणि तटाची खिंडारे बुजू लागलेली आहेत, तेव्हा ते अतिशय संतप्त झाले. 8त्यांनी यरुशलेममध्ये दंगे व गोंधळ निर्माण करण्याचा कट केला. 9पण आम्ही आमच्या परमेश्वराची प्रार्थना केली आणि आपले संरक्षण करण्यासाठी शहरावर रात्रंदिवस पहारा ठेवला.
10नंतर यहूदीयाचे लोक म्हणाले, “कामकऱ्यांची शक्ती घटत चालली आहे आणि दगडविटांचे इतके खच पडले आहेत की पुढील भिंत बांधणे अशक्यच वाटते.”
11आमच्या शत्रूंनी हे देखील म्हटले, “त्यांना काही कळण्याआधी व ते आपल्याला पाहण्याआधी, आपण त्यांच्यामध्ये जाऊ, अचानक हल्ला करून आपण त्यांना ठार करू व त्यांचे काम बंद करू.”
12तेव्हा जवळपास राहणारे यहूदी लोक आले व आम्हाला दहा वेळेस येऊन सांगून गेले, “तुम्ही ज्या दिशेने जाल, हे लोक त्या दिशेने तुमच्यावर हल्ला करतील.”
13याकारणास्तव मी प्रत्येक कुटुंबानुसार काही लोक निवडले व त्यांना तलवारी, भाले व धनुष्यबाण देऊन तटाच्या खालच्या मागील खुल्या जागी त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांना पहारेकरी म्हणून बसविले. 14संपूर्ण परिस्थितीकडे नजर टाकल्यावर, मी उभा राहिलो व सर्व प्रतिष्ठितांना, अधिकाऱ्यांना व बाकी लोकांना एकत्र बोलाविले आणि त्यांना म्हणालो, “त्यांना भिऊ नका! महान व भयावह परमेश्वराची आठवण ठेवा. आपल्या कुटुंबांसाठी, तुमच्या पुत्रांसाठी, तुमच्या कन्यांसाठी, तुमच्या पत्नीसाठी आणि घरांसाठी लढा!”
15आमच्या शत्रूंनी ऐकले की आम्हाला त्यांचा कट समजला आहे आणि परमेश्वराने त्यांच्या सर्व योजना व्यर्थ केल्या आहेत. मग आम्ही तट बांधण्याच्या कामाला पुन्हा लागलो.
16पण त्या दिवसापासून पुढे माझे फक्त अर्धेच पुरुष काम करीत असत व बाकी अर्धे पाठीमागे भाले, ढाली, धनुष्य व शस्त्रे घेऊन होते. हे अधिकारी जे यहूदीयाचे लोक 17बांधकाम करीत होते त्यांच्यामागे उभे राहिले. जे कामकरी सामान नेआण करीत, ते आपली लढाईची शस्त्रे एका हातात ठेवून दुसऱ्या हाताने कामे करीत असत. 18आपल्या कमरेला तलवारी लटकवून प्रत्येकजण काम करीत असत. मात्र रणशिंग वाजविणारा माझ्याजवळच असे.
19मग मी प्रतिष्ठित लोक, अधिकारी आणि इतर लोकांना समजावून सांगितले, “काम इतके मोठे व विस्तृत आहे की त्यामुळे आपण भिंतीशी बांधकाम करीत असताना एकमेकांपासून लांब लांब असतो. 20म्हणून तुम्ही रणशिंगाचा आवाज ऐकाल, तेव्हा तुम्ही आम्ही असलेल्या जागी धावत आले पाहिजे आणि आपले परमेश्वर आपल्यासाठी लढतील!”
21आम्ही सूर्योदयापासून कामाला सुरुवात करून तारे दिसेपर्यंत करीत असू आणि अर्धे लोक भाले घेऊन नेहमीच असत. 22त्यावेळी मी सर्व लोकांना सांगितले, “प्रत्येकाने रात्रीच्या मुक्कामाला यरुशलेमच्या आतच राहावे, म्हणजे ते रात्री पहार्याचे व दिवसा तटाच्या बांधकामाचे कार्य करू शकतील.” 23याकाळात आमच्यापैकी कोणीही, मी किंवा माझे बांधव, माझी माणसे किंवा माझ्याबरोबर असणारे पहारेकरी, कोणीही आपले कपडे बदलले नाहीत आणि जलाशयाला जाते वेळी देखील आम्ही आमची शस्त्रे नेहमीच आमच्याबरोबर बाळगत असू.
सध्या निवडलेले:
नहेम्या 4: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.