नहेम्या 4
4
बांधकाम करणारे विरोधकांवर नजर ठेवून काम करतात
1आम्ही कोट बांधत होतो हे सनबल्लटाने ऐकले तेव्हा त्याला मोठा क्रोध आला व तो यहूदी लोकांचा उपहास करू लागला.
2तो आपले बांधव व शोमरोनचे सैन्य ह्यांच्यासमोर म्हणाला, “हे दुर्बळ यहूदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? आच खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगार्यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय?”
3त्याच्याजवळ अम्मोनी तोबीया होता तो म्हणाला, “ते जे बांधकाम करीत आहेत त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकील.”
4हे आमच्या देवा, ऐक, आमचा धिक्कार होत आहे; ते निर्भर्त्सना करीत आहेत ती त्यांच्या शिरी उलट आण; बंदिवासाच्या देशात त्यांची लूट होऊ दे.
5त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नको, त्यांची पातके तुझ्यापुढून पुसून जाऊ नयेत, कारण त्यांनी कोट बांधणार्यांसमोर तुला संताप आणला आहे.
6ह्या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालवले; तो कोट निम्मा तयार झाला; कारण लोक अगदी मन लावून काम करीत होते.
7यरुशलेमेचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे, त्यातली खिंडारे बुजू लागली आहेत असे सनबल्लट, तोबीया, अरबी, अम्मोनी व अश्दोदी ह्यांनी ऐकले तेव्हा त्यांना फार राग आला;
8त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरुशलेमेबरोबर लढू व तेथे गोंधळ उडवून देऊ.
9पण आम्ही आपल्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवली.
10यहूदी लोक म्हणू लागले की, “भारवाहकांची शक्ती क्षीण झाली आहे, व अजून खच फार पडला आहे, तेव्हा आमच्याने हा कोट बांधवणार नाही.”
11आमचे शत्रू म्हणाले, “आम्ही त्यांच्यामध्ये शिरून त्यांना मारून टाकू व त्यांचे काम बंद पाडीपर्यंत त्यांना काही कळायचे नाही की दिसायचे नाही.”
12मग जे यहूदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे दहादा येऊन म्हणाले की, “तुम्ही आमच्याकडे परत या.”
13ह्या कारणास्तव लोकांच्या हाती तलवारी, बरच्या व धनुष्ये देऊन कोटाच्या मागे अगदी खालच्या खुल्या ठिकाणी त्यांच्या घराण्यांप्रमाणे मी त्यांना ठेवले.
14ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक ह्यांना म्हणालो, “त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.”
15देवाने आमच्या शत्रूंची मसलत व्यर्थ केली हे आमच्या शत्रूंनी ऐकले तेव्हा आम्ही सगळे कोटाकडे परत जाऊन आपापल्या कामावर रुजू झालो.
16त्या दिवसापासून माझे अर्धे सेवक कामास लागत व अर्धे भाले, ढाली, धनुष्ये, चिलखते धारण करत आणि यहूदाच्या सर्व घराण्यांमागे त्यांचे सरदार उभे असत.
17कोट बांधणारे व भारवाहक एका हाताने काम करत व दुसर्या हातात शस्त्रे धारण करत.
18बांधकाम करणारे आपल्या कंबरेस तलवार लावून काम करत. रणशिंग वाजवणारा माझ्याजवळ असे.
19मी सरदारांना, शास्त्यांना व वरकड लोकांना सांगून ठेवले होते की, “हे काम मोठे व विस्तृत असून कोटावर काम करत असता आपण एकमेकांपासून दूर असतो.
20तर रणशिंगाचा शब्द जेथे ऐकू येईल तेथे तुम्ही आमच्याकडे एकत्र व्हा; आपला देव आपल्यातर्फे लढेल.”
21ह्या प्रकारे आम्ही काम करू लागलो; त्यांच्यातले अर्धे लोक पहाटेपासून तारे दिसू लागत तोपर्यंत भाले घेऊन उभे असत.
22त्या वेळी लोकांना मी हेही सांगितले होते की प्रत्येक मनुष्याने आपल्या दासासह यरुशलेमेच्या आतच रात्रीचे बिर्हाडास राहावे म्हणजे ते रात्री आमची रखवाली करतील आणि ते दिवसा काम करतील.”
23मी आपले कपडे उतरवीत नसे; तसेच माझे भाऊबंद, माझे चाकर आणि माझ्यामागून चालणारे गारदी कोणीही आपले कपडे उतरवीत नसत; ते सर्व आपापली शस्त्रे हाती घेऊन पाण्याला जात.
सध्या निवडलेले:
नहेम्या 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.