YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 4:11-18

नहेम्या 4:11-18 MRCV

आमच्या शत्रूंनी हे देखील म्हटले, “त्यांना काही कळण्याआधी व ते आपल्याला पाहण्याआधी, आपण त्यांच्यामध्ये जाऊ, अचानक हल्ला करून आपण त्यांना ठार करू व त्यांचे काम बंद करू.” तेव्हा जवळपास राहणारे यहूदी लोक आले व आम्हाला दहा वेळेस येऊन सांगून गेले, “तुम्ही ज्या दिशेने जाल, हे लोक त्या दिशेने तुमच्यावर हल्ला करतील.” याकारणास्तव मी प्रत्येक कुटुंबानुसार काही लोक निवडले व त्यांना तलवारी, भाले व धनुष्‍यबाण देऊन तटाच्या खालच्या मागील खुल्या जागी त्यांच्या घराण्याप्रमाणे त्यांना पहारेकरी म्हणून बसविले. संपूर्ण परिस्थितीकडे नजर टाकल्यावर, मी उभा राहिलो व सर्व प्रतिष्ठितांना, अधिकाऱ्यांना व बाकी लोकांना एकत्र बोलाविले आणि त्यांना म्हणालो, “त्यांना भिऊ नका! महान व भयावह परमेश्वराची आठवण ठेवा. आपल्या कुटुंबांसाठी, तुमच्या पुत्रांसाठी, तुमच्या कन्यांसाठी, तुमच्या पत्नीसाठी आणि घरांसाठी लढा!” आमच्या शत्रूंनी ऐकले की आम्हाला त्यांचा कट समजला आहे आणि परमेश्वराने त्यांच्या सर्व योजना व्यर्थ केल्या आहेत. मग आम्ही तट बांधण्याच्या कामाला पुन्हा लागलो. पण त्या दिवसापासून पुढे माझे फक्त अर्धेच पुरुष काम करीत असत व बाकी अर्धे पाठीमागे भाले, ढाली, धनुष्य व शस्त्रे घेऊन होते. हे अधिकारी जे यहूदीयाचे लोक बांधकाम करीत होते त्यांच्यामागे उभे राहिले. जे कामकरी सामान नेआण करीत, ते आपली लढाईची शस्त्रे एका हातात ठेवून दुसऱ्या हाताने कामे करीत असत. आपल्या कमरेला तलवारी लटकवून प्रत्येकजण काम करीत असत. मात्र रणशिंग वाजविणारा माझ्याजवळच असे.

नहेम्या 4 वाचा