YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 1:1-22

मार्क 1:1-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे. यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, “पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील; अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.’” त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता. यहूदीया प्रांत व यरूशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे. तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे आणि मी त्याच्या वहाणांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.” त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला. येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले. तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” मग आत्म्याने लगेचच त्यास अरण्यांत घालवले. सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते. योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली. तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले. त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले. नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम नगरास गेले, आणि लगेचच येशूने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्यास अधिकार असल्यासारखा शिकवीत होता.

सामायिक करा
मार्क 1 वाचा

मार्क 1:1-22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त, यांच्याबद्दलच्या शुभवार्तेचा प्रारंभ. यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे: “मी माझा संदेशवाहक तुमच्या पुढे पाठवीन, तो तुमचा मार्ग तयार करील,” “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, ‘प्रभुसाठी मार्ग तयार करा, आणि त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ” आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान पापक्षमेसाठी पश्चातापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश देत अरण्यात प्रकट झाला. यहूदीया प्रांतातील आणि सर्व यरुशलेमेतील लोक त्यांच्याकडे आले. त्यांनी पापे कबूल केल्यानंतर, यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा होत असे. योहान उंटाच्या केसांपासून तयार केलेल्या कपड्याचा झगा घालीत असे, कंबरेला चामड्याचा पट्टा बांधीत असे. तो टोळ आणि रानमध सेवन करीत असे. त्याचा संदेश हा होता: “माझ्यानंतर असा एकजण येत आहे, जो माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहे व त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडणारा एक गुलाम होण्याची सुद्धा माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करतील.” त्यावेळी येशू गालील प्रांतातील नासरेथ गावातून आले आणि योहानाने यार्देन नदीत त्यांचा बाप्तिस्मा केला. येशू पाण्यातून बाहेर येत होते त्याचवेळेस, आकाश उघडलेले आणि आत्मा कबुतरासारखा त्यांच्यावर उतरत आहे असे त्यांनी पाहिले त्याचवेळी स्वर्गातून एक वाणी झाली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.” नंतर लगेच पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात पाठविले, रानात चाळीस दिवस असताना, सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. त्यांच्या सोबतीला जंगली प्राणी होते आणि देवदूतांनी त्यांची सेवा केली. योहानाला बंदीत टाकल्यानंतर, परमेश्वराच्या शुभवार्तेची घोषणा करीत येशू गालील प्रांतात आले. ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!” एके दिवशी येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” हे ऐकताच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले. थोडे पुढे जाताच, त्यांनी जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना होडीत बसून आपली जाळी तयार करताना पाहिले. त्यांनी उशीर न करता त्यांना बोलावले, तेव्हा ते आपला पिता जब्दी याला नावेमध्ये मजुरांबरोबर सोडून त्यांच्यामागे गेले. ते कफर्णहूम या शहरात आले, शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये जाऊन येशूंनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिकवणकीवरून लोक थक्क झाले, कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.

सामायिक करा
मार्क 1 वाचा

मार्क 1:1-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

[देवाचा पुत्र] येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, “पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो; तो तुझा मार्ग तयार करील; अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली, ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा; त्याच्या ‘वाटा नीट करा.”’ त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रकट झाला. तेव्हा सगळा यहूदीया देश व सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे. तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षा समर्थ असा कोणीएक माझ्यामागून येत आहे; त्याच्या पायतणांचा बंद लवून सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे; तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.” त्या दिवसांत असे झाले की, येशू गालीलातील नासरेथाहून आला आणि योहानाच्या हातून यार्देनेत त्याचा बाप्तिस्मा झाला. आणि लगेचच पाण्यातून वर येताना, आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे, असे त्याला दिसले; तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” मग आत्म्याने त्याला लगेचच अरण्यात घालवले. आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला; तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत त्याची सेवा करत होते. योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या [राज्याची] सुवार्ता गाजवत गालीलात आला व म्हणाला, “काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्‍चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.” नंतर गालील समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.” मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले. आणि त्याने त्यांना लगेचच बोलावले; मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्यामागे गेले. नंतर ते कफर्णहूमास गेले; आणि लगेचच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नाही तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता.

सामायिक करा
मार्क 1 वाचा

मार्क 1:1-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ: यशया संदेष्ट्याने लिहिले आहे, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवीन. तो तुझा मार्ग तयार करील. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी: ‘प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा.’ त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करत बाप्तिस्मा देणारा योहान अरण्यात आला. यहुदिया प्रांतातील व यरुशलेम नगरातील कित्येक लोक त्याच्याकडे गेले आणि त्यांनी स्वतःची पापे कबूल करून योहानकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे व त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे. टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते. तो घोषणा करत म्हणे, “माझ्यापेक्षा अधिक समर्थ असा एक माझ्यामागून येत आहे. लवून त्याच्या पादत्राणाचा बंद सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही. मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु तो तुम्हांला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल.” त्या दिवसांत असे झाले की, येशू गालीलमधील नासरेथहून आला आणि योहानच्या हातून यार्देन नदीत त्याचा बाप्तिस्मा झाला. लगेच, पाण्यातून वर येत असताना, त्याला दिसले की, आकाश उघडले आहे व आत्मा कबुतरासारखा स्वतःवर उतरत आहे. आणि त्या वेळी आकाशातून वाणी झाली, “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी प्रसन्न आहे.” आत्म्याने येशूला लगेच अरण्यात नेले. तेथे सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो त्या ठिकाणी चाळीस दिवस राहिला. तेथे वनपशूदेखील होते. मात्र देवदूत त्याची सेवा करत होते. योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत गालीलमध्ये आला व म्हणाला, “काळाची परिपूर्ती झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्‍चात्ताप करा व शुभवर्तमानावर विश्वास ठेवा.” एकदा गालील सरोवराजवळून जात असताना येशूला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते कोळी होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” ते लगेच त्यांची जाळी सोडून येशूच्या मागे निघाले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचे मुलगे याकोब व योहान दिसले. ते त्यांच्या तारवात जाळी नीट करीत होते. त्याने त्यांनाही बोलावले. तेव्हा त्यांचे वडील जब्दी ह्यांना नोकरांबरोबर तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले. येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमला गेले असता लगेच येशूने साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन प्रबोधन केले. त्याच्या प्रबोधनावरून लोक थक्क झाले कारण तो त्यांना शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत असे.

सामायिक करा
मार्क 1 वाचा