YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 1

1
1[देवाचा पुत्र] येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ.
बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश
2यशया संदेष्ट्याच्या#1:2 मुळात : भविष्यद्यांच्या. ग्रंथात लिहिले आहे की,
“पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो;
तो तुझा मार्ग तयार करील;
3अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली,
ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा;
त्याच्या ‘वाटा नीट करा.”’
4त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रकट झाला.
5तेव्हा सगळा यहूदीया देश व सर्व यरुशलेमकर त्याच्याकडे लोटले आणि त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला.
6योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे.
7तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षा समर्थ असा कोणीएक माझ्यामागून येत आहे; त्याच्या पायतणांचा बंद लवून सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही.
8मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे; तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे.”
येशूचा बाप्तिस्मा
9त्या दिवसांत असे झाले की, येशू गालीलातील नासरेथाहून आला आणि योहानाच्या हातून यार्देनेत त्याचा बाप्तिस्मा झाला.
10आणि लगेचच पाण्यातून वर येताना, आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे, असे त्याला दिसले;
11तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
येशूची परीक्षा
12मग आत्म्याने त्याला लगेचच अरण्यात घालवले.
13आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला; तो वनपशूंमध्ये होता, आणि देवदूत त्याची सेवा करत होते.
येशूच्या लौकिक कार्याचा प्रारंभ
14योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या [राज्याची] सुवार्ता गाजवत गालीलात आला व म्हणाला,
15“काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्‍चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
पहिल्या शिष्यांना पाचारण
16नंतर गालील समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.
17येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.”
18मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले.
19तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले.
20आणि त्याने त्यांना लगेचच बोलावले; मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
कफर्णहूमातील सभास्थानात येशू शिक्षण देतो व अशुद्ध आत्मा काढतो
21नंतर ते कफर्णहूमास गेले; आणि लगेचच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले.
22त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नाही तर अधिकार असल्यासारखा शिकवत होता.
23त्याच वेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता;
24तो ओरडून म्हणाला, “हे येशू नासरेथकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करायला आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच!”
25येशूने त्याला धमकावून म्हटले, “उगाच राहा व ह्याच्यातून नीघ.”
26तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला.
27तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांना विचारू लागले, “हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण! हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.”
28ही त्याची कीर्ती लगेच गालीलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली.
पेत्राची सासू व इतर रोगी ह्यांना येशू बरे करतो
29सभास्थानातून निघाल्यावर ते लगेचच याकोब व योहान ह्यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले.
30शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लगेच त्यांनी त्याला सांगितले.
31तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले व लगेचच तिचा ताप निघाला, आणि ती त्यांची सेवा करू लागली.
32संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखणाइतांना व भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले.
33आणि सबंध शहर दाराशी लोटले.
34तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भुते काढली; त्या भुतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही.
येशू प्रार्थनेसाठी एकान्त स्थळी जातो व पुढे कफर्णहूम सोडतो
35मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.
36तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करत गेले,
37व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध करत आहेत.”
38तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मला आसपासच्या गावांत उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ; कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे.”
39मग तो सबंध गालीलात त्यांच्या सभास्थानांतून उपदेश करत व भुते काढत फिरला.
येशू कुष्ठरोग्याला बरे करतो
40तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”
41तेव्हा येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”
42तेव्हा तो बोलता क्षणीच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला.
43मग त्याने त्याला ताकीद देऊन ताबडतोब लावून दिले,
44आणि सांगितले, “पाहा, कोणाला काही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि लोकांना प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.”
45पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना; म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला; तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.

सध्या निवडलेले:

मार्क 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन

मार्क 1 साठी चलचित्र