YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 1:1-22

मार्क 1:1-22 MRCV

परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त, यांच्याबद्दलच्या शुभवार्तेचा प्रारंभ. यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे: “मी माझा संदेशवाहक तुमच्या पुढे पाठवीन, तो तुमचा मार्ग तयार करील,” “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, ‘प्रभुसाठी मार्ग तयार करा, आणि त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ” आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान पापक्षमेसाठी पश्चातापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश देत अरण्यात प्रकट झाला. यहूदीया प्रांतातील आणि सर्व यरुशलेमेतील लोक त्यांच्याकडे आले. त्यांनी पापे कबूल केल्यानंतर, यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा होत असे. योहान उंटाच्या केसांपासून तयार केलेल्या कपड्याचा झगा घालीत असे, कंबरेला चामड्याचा पट्टा बांधीत असे. तो टोळ आणि रानमध सेवन करीत असे. त्याचा संदेश हा होता: “माझ्यानंतर असा एकजण येत आहे, जो माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहे व त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडणारा एक गुलाम होण्याची सुद्धा माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करतील.” त्यावेळी येशू गालील प्रांतातील नासरेथ गावातून आले आणि योहानाने यार्देन नदीत त्यांचा बाप्तिस्मा केला. येशू पाण्यातून बाहेर येत होते त्याचवेळेस, आकाश उघडलेले आणि आत्मा कबुतरासारखा त्यांच्यावर उतरत आहे असे त्यांनी पाहिले त्याचवेळी स्वर्गातून एक वाणी झाली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.” नंतर लगेच पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात पाठविले, रानात चाळीस दिवस असताना, सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. त्यांच्या सोबतीला जंगली प्राणी होते आणि देवदूतांनी त्यांची सेवा केली. योहानाला बंदीत टाकल्यानंतर, परमेश्वराच्या शुभवार्तेची घोषणा करीत येशू गालील प्रांतात आले. ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!” एके दिवशी येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” हे ऐकताच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले. थोडे पुढे जाताच, त्यांनी जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना होडीत बसून आपली जाळी तयार करताना पाहिले. त्यांनी उशीर न करता त्यांना बोलावले, तेव्हा ते आपला पिता जब्दी याला नावेमध्ये मजुरांबरोबर सोडून त्यांच्यामागे गेले. ते कफर्णहूम या शहरात आले, शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये जाऊन येशूंनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिकवणकीवरून लोक थक्क झाले, कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.

मार्क 1 वाचा

मार्क 1:1-22 साठी चलचित्र