YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 1:1-22

मार्क 1:1-22 MACLBSI

देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ: यशया संदेष्ट्याने लिहिले आहे, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवीन. तो तुझा मार्ग तयार करील. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी: ‘प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा.’ त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करत बाप्तिस्मा देणारा योहान अरण्यात आला. यहुदिया प्रांतातील व यरुशलेम नगरातील कित्येक लोक त्याच्याकडे गेले आणि त्यांनी स्वतःची पापे कबूल करून योहानकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे व त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे. टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते. तो घोषणा करत म्हणे, “माझ्यापेक्षा अधिक समर्थ असा एक माझ्यामागून येत आहे. लवून त्याच्या पादत्राणाचा बंद सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही. मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु तो तुम्हांला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल.” त्या दिवसांत असे झाले की, येशू गालीलमधील नासरेथहून आला आणि योहानच्या हातून यार्देन नदीत त्याचा बाप्तिस्मा झाला. लगेच, पाण्यातून वर येत असताना, त्याला दिसले की, आकाश उघडले आहे व आत्मा कबुतरासारखा स्वतःवर उतरत आहे. आणि त्या वेळी आकाशातून वाणी झाली, “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी प्रसन्न आहे.” आत्म्याने येशूला लगेच अरण्यात नेले. तेथे सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो त्या ठिकाणी चाळीस दिवस राहिला. तेथे वनपशूदेखील होते. मात्र देवदूत त्याची सेवा करत होते. योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत गालीलमध्ये आला व म्हणाला, “काळाची परिपूर्ती झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्‍चात्ताप करा व शुभवर्तमानावर विश्वास ठेवा.” एकदा गालील सरोवराजवळून जात असताना येशूला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते कोळी होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” ते लगेच त्यांची जाळी सोडून येशूच्या मागे निघाले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचे मुलगे याकोब व योहान दिसले. ते त्यांच्या तारवात जाळी नीट करीत होते. त्याने त्यांनाही बोलावले. तेव्हा त्यांचे वडील जब्दी ह्यांना नोकरांबरोबर तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले. येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमला गेले असता लगेच येशूने साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन प्रबोधन केले. त्याच्या प्रबोधनावरून लोक थक्क झाले कारण तो त्यांना शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत असे.

मार्क 1:1-22 साठी चलचित्र