लूक 13:22-35
लूक 13:22-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत देत यरुशलेमेकडे चालला. तेव्हा कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा; कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, ‘प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’ तेव्हा तो तुम्हांला उत्तर देईल, ‘तुम्ही कोठले आहात, हे मला माहीत नाही.’ तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिले.’ परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही; अहो, सर्व अन्याय करणार्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’ तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल. पूर्वेकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत.” त्याच घटकेस कित्येक परूशी येऊन त्याला म्हणाले, “येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हांला जिवे मारायला पाहत आहे.” त्याने त्यांना म्हटले, “त्या खोकडाला जाऊन सांगा, ‘पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो, आणि तिसर्या दिवशी मी परिपूर्ण होईन. तरी मला आज, उद्या व परवा पुढे गेले पाहिजे; कारण यरुशलेमेबाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हायचे नाही.’ यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती! पाहा, तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे. मी तुम्हांला सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.”
लूक 13:22-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू यरूशलेम शहराच्या दिशेने वाटचाल करीत असता, गांवागांवातून आणि खेड्यापाड्यांतून तो लोकांस शिकवीत होता. कोणीतरी त्यास विचारले, “प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हास सांगतो की, पुष्कळजण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही. घराच्या मालकाने उठून दरवाजा बंद केल्यावर, तुम्ही बाहेर उभे रहाल व दरवाजा ठोठवाल आणि म्हणाला; प्रभू, आम्हासाठी दरवाजा उघडा! परंतु तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही. नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले! आणि तो तुम्हास म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, अन्याय करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा. तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल. आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील. जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील, हे लक्षात ठेवा.” त्यावेळी काही परूशी येशूकडे आले आणि ते त्यास म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हास ठार मारणार आहे.” येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भूते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’ तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टा यरूशलेम शहराबाहेर मारला जावा हे शक्य नाही.” यरूशलेमे, यरूशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे कितीतरी वेळा तुम्हा लोकांस एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती. “पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हास सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो’ असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”
लूक 13:22-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर येशू शहरातून आणि गावातून शिक्षण देत यरुशलेमकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी कोणीतरी त्यांना विचारले, “प्रभूजी, फक्त थोड्याच लोकांना तारण प्राप्त होणार का?” येशू त्यांना म्हणाले, “अरुंद द्वाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करा, पुष्कळजण आत जाण्याचा प्रयत्न करतील, पण आत जाऊ शकणार नाहीत. एकदा जर घर प्रमुखाने दार लावून घेतले, तर तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत व विनंती करून म्हणाल, ‘महाराज, आम्हासाठी दार उघडा.’ “तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही किंवा तुम्ही कुठून आला हे मला माहीत नाही.’ “पण तुम्ही म्हणाल, ‘आम्ही तुमच्याबरोबर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले.’ “त्यावर तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही व तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. तुम्ही सर्व अन्याय करणार्यांनो माझ्यापासून दूर निघून जा!’ “अब्राहाम, इसहाक, याकोब आणि सर्व संदेष्टे परमेश्वराच्या राज्यात असलेले पाहाल पण स्वतःला मात्र बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तुमच्यामध्ये रडणे आणि दातखाणे असेल. पूर्व आणि पश्चिमेकडून, उत्तर व दक्षिणेकडून लोक येतील, आणि परमेश्वराच्या राज्याच्या मेजवानीत सामील होऊन आपआपल्या जागा घेतील. खरोखर, जे शेवटचे ते पहिले आणि जे पहिले ते शेवटचे होतील.” काही परूशी येशूंकडे येऊन त्यांना म्हणाले, “आपण येथून निघून जा, कारण हेरोद राजा आपणास जिवे मारावयास पाहत आहे.” येशूंनी उत्तर दिले, “त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, की ‘मी आज व उद्या भुते काढीत आणि रोग बरे करीत राहीन आणि तिसर्या दिवशी माझा उद्देश पूर्ण करेन.’ काही झाले तरी मला आज, उद्या आणि परवा प्रवास केलाच पाहिजे कारण संदेष्ट्यांची हत्या यरुशलेमच्या बाहेर होणे शक्य नाही. “हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती. आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे. मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने येणारे धन्यवादित असो’ असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.”
लूक 13:22-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत देत यरुशलेमेकडे चालला. तेव्हा कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा; कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, ‘प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’ तेव्हा तो तुम्हांला उत्तर देईल, ‘तुम्ही कोठले आहात, हे मला माहीत नाही.’ तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिले.’ परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही; अहो, सर्व अन्याय करणार्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’ तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल. पूर्वेकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत.” त्याच घटकेस कित्येक परूशी येऊन त्याला म्हणाले, “येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हांला जिवे मारायला पाहत आहे.” त्याने त्यांना म्हटले, “त्या खोकडाला जाऊन सांगा, ‘पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो, आणि तिसर्या दिवशी मी परिपूर्ण होईन. तरी मला आज, उद्या व परवा पुढे गेले पाहिजे; कारण यरुशलेमेबाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हायचे नाही.’ यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती! पाहा, तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे. मी तुम्हांला सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.”
लूक 13:22-35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो नगरोनगरी व खेडोपाडी शिक्षण देत यरुशलेमकडे जात होता, तेव्हा एकाने त्याला विचारले, “प्रभो, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोठावत म्हणू लागाल, ‘प्रभो, आमच्यासाठी दार उघड.’ तो तुम्हांला उत्तर देईल, “तुम्ही कुठले आहात, हे मला माहीत नाही.’ तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुझ्यासमोर खाणेपिणे केले आणि तू आमच्या रस्त्यावर शिक्षण दिलेस.’ परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कुठले आहात, हे मला माहीत नाही. अहो, अधर्म करणाऱ्या सर्वांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’ तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल. त्या वेळी पूर्वेकडून व पश्चिमेकडून तसेच उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील आणि पहा, जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.” त्याच घटकेस कित्येक परुशी येऊन त्याला म्हणाले, “येथून निघून जा कारण हेरोद तुम्हांला ठार मारायला पाहत आहे.” त्याने त्यांना म्हटले, “त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी माझे काम पुरे करीन. तरीही मला आज, उद्या व परवा पुढे जात राहिले पाहिजे कारण यरुशलेमबाहेर संदेष्ट्यांचा नाश व्हावा, हे शक्य नाही. यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्या व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगड मारणाऱ्या नगरी! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्रित करते तसे तुझ्या मुलांबाळांना एकत्रित करण्याची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तू मला तसे करू दिले नाहीस! पाहा, तुमच्या प्रार्थनास्थळाची उपेक्षा होईल. मी तुम्हांला सांगतो, ‘प्रभूच्या नावाने येणारा तो धन्य!’, असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.”