येशू यरूशलेम शहराच्या दिशेने वाटचाल करीत असता, गांवागांवातून आणि खेड्यापाड्यांतून तो लोकांस शिकवीत होता. कोणीतरी त्यास विचारले, “प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हास सांगतो की, पुष्कळजण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही. घराच्या मालकाने उठून दरवाजा बंद केल्यावर, तुम्ही बाहेर उभे रहाल व दरवाजा ठोठवाल आणि म्हणाला; प्रभू, आम्हासाठी दरवाजा उघडा! परंतु तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही. नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले! आणि तो तुम्हास म्हणेल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, अन्याय करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा. तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल. आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील. जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील, हे लक्षात ठेवा.”
त्यावेळी काही परूशी येशूकडे आले आणि ते त्यास म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हास ठार मारणार आहे.” येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भूते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’ तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टा यरूशलेम शहराबाहेर मारला जावा हे शक्य नाही.”
यरूशलेमे, यरूशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे कितीतरी वेळा तुम्हा लोकांस एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती. “पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हास सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो’ असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.”