तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत देत यरुशलेमेकडे चालला.
तेव्हा कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?”
तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा; कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही.
घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, ‘प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’ तेव्हा तो तुम्हांला उत्तर देईल, ‘तुम्ही कोठले आहात, हे मला माहीत नाही.’
तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिले.’
परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही; अहो, सर्व अन्याय करणार्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’
तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल.
पूर्वेकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील.
आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत.”
त्याच घटकेस कित्येक परूशी येऊन त्याला म्हणाले, “येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हांला जिवे मारायला पाहत आहे.”
त्याने त्यांना म्हटले, “त्या खोकडाला जाऊन सांगा, ‘पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो, आणि तिसर्या दिवशी मी परिपूर्ण होईन.
तरी मला आज, उद्या व परवा पुढे गेले पाहिजे; कारण यरुशलेमेबाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हायचे नाही.’
यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!
पाहा, तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे. मी तुम्हांला सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.”