नंतर येशू शहरातून आणि गावातून शिक्षण देत यरुशलेमकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी कोणीतरी त्यांना विचारले, “प्रभूजी, फक्त थोड्याच लोकांना तारण प्राप्त होणार का?”
येशू त्यांना म्हणाले, “अरुंद द्वाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करा, पुष्कळजण आत जाण्याचा प्रयत्न करतील, पण आत जाऊ शकणार नाहीत. एकदा जर घर प्रमुखाने दार लावून घेतले, तर तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत व विनंती करून म्हणाल, ‘महाराज, आम्हासाठी दार उघडा.’
“तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही किंवा तुम्ही कुठून आला हे मला माहीत नाही.’
“पण तुम्ही म्हणाल, ‘आम्ही तुमच्याबरोबर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले.’
“त्यावर तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही व तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. तुम्ही सर्व अन्याय करणार्यांनो माझ्यापासून दूर निघून जा!’
“अब्राहाम, इसहाक, याकोब आणि सर्व संदेष्टे परमेश्वराच्या राज्यात असलेले पाहाल पण स्वतःला मात्र बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तुमच्यामध्ये रडणे आणि दातखाणे असेल. पूर्व आणि पश्चिमेकडून, उत्तर व दक्षिणेकडून लोक येतील, आणि परमेश्वराच्या राज्याच्या मेजवानीत सामील होऊन आपआपल्या जागा घेतील. खरोखर, जे शेवटचे ते पहिले आणि जे पहिले ते शेवटचे होतील.”
काही परूशी येशूंकडे येऊन त्यांना म्हणाले, “आपण येथून निघून जा, कारण हेरोद राजा आपणास जिवे मारावयास पाहत आहे.”
येशूंनी उत्तर दिले, “त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, की ‘मी आज व उद्या भुते काढीत आणि रोग बरे करीत राहीन आणि तिसर्या दिवशी माझा उद्देश पूर्ण करेन.’ काही झाले तरी मला आज, उद्या आणि परवा प्रवास केलाच पाहिजे कारण संदेष्ट्यांची हत्या यरुशलेमच्या बाहेर होणे शक्य नाही.
“हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती. आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे. मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने येणारे धन्यवादित असो’ असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.”