गलतीकरांस पत्र 3:10-29
गलतीकरांस पत्र 3:10-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाच्या अधीन आहे कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व पाळण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे.’ नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे; कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’ आणि नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही पण ‘जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्यायोगे जगेल.’ आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आणि बंधूंनो, मी हे व्यावहारिक दृष्टीने बोलतो. एखाद्या मनुष्याचा करारदेखील तो स्थापित केला गेल्यानंतर कोणी रद्द करीत नाही किंवा त्यामध्ये भर घालीत नाही. आता, जी वचने अब्राहामाला व त्याच्या संतानाला दिली होती. तो ‘संतानांना’ असे अनेकाविषयी म्हणत नाही, पण ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे. आणि, मी हे म्हणतो की, देवाने तो करार आधीच स्थापल्यावर चारशेतीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द करू होत नाही. कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते, तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही; परंतु अब्राहामाला देवाने ते कृपेने अभिवचनाद्वारे दिले. तर मग नियमशास्त्र कशाला? कारण, ज्या संतानास वचन दिले होते त्याचे येणे होईपर्यंत ते उल्लंघनामुळे नियमशास्त्र देण्यात आले; ते मध्यस्थाच्या हाती देवदूतांच्याद्वारे नेमून आले. मध्यस्थ हा एकपेक्षा अधिकांसाठी असतो; तरीही देव तर एकच आहे. तर काय नियमशास्त्र हे देवाच्या वचनाविरुद्ध आहे? कधीच नाही कारण जीवन देण्यास समर्थ असलेले नियमशास्त्र देण्यात आले असते तर, नीतिमत्त्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. तरी त्याऐवजी, नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले, या उद्देशासाठी की, विश्वास ठेवणार्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. परंतु ख्रिस्तात विश्वास आला त्यापुर्वी, हा जो विश्वास प्रकट होणार होता, तो येण्याअगोदर आपण बंदिवान असता आपल्याला नियमशास्त्राखाली असे रखवालीत ठेवले होते. ह्यांवरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते. पण आता, विश्वासाचे येणे झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन राहिलो नाही. पण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे देवाचे पुत्र आहात. कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहूदी किंवा ग्रीक, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण एकच आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा; तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाप्रमाणे वारीस आहात.
गलतीकरांस पत्र 3:10-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे नियमशास्त्रावर विसंबून आहेत ते सर्वजण शापाच्या बंधनाखाली आहेत. कारण पवित्रशास्त्र स्पष्ट म्हणते: “जो कोणी नियमशास्त्राच्या पुस्तकात जे सर्वकाही लिहिले आहे त्याप्रमाणे करीत नाही तो शापित आहे.” यास्तव, हे अगदी स्पष्ट आहे की नियमशास्त्रावर अवलंबून राहणारे परमेश्वरापुढे नीतिमान ठरणार नाहीत, कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.” नियम विश्वासावर आधारित नाही; याव्यतिरिक्त नियमशास्त्र म्हणते, “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.” ख्रिस्ताने आम्हासाठी शाप होऊन, नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला खंडणी देऊन सोडविले, कारण असे लिहिले आहे, “जो कोणी खांबावर टांगला आहे, तो शापित आहे.” हे सर्व यासाठी की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूंच्याद्वारे गैरयहूदीयांनाही प्राप्त व्हावा, म्हणजे विश्वासाद्वारे अभिवचन दिल्याप्रमाणे आपल्याला आत्म्याचे दान प्राप्त व्हावे. प्रिय बंधू व भगिनींनो, रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. मानवी करार जो प्रस्थापित केलेला आहे त्यात कोणी वेगळे करू शकत नाही किंवा त्यामध्ये भर घालू शकत नाही त्याप्रमाणे हे आहे. ही अभिवचने अब्राहाम व त्याच्या संतानाला दिली होती. शास्त्रलेख “आणि संतानांना” असे अनेक लोकांविषयी म्हणत नाही, तर “आणि तुझ्या संतानाला,” म्हणजे एका व्यक्तीविषयी म्हणतात, आणि ते ख्रिस्त आहे. मला म्हणावयाचे ते हे: चारशेतीस वर्षानंतर देण्यात आलेले नियमशास्त्र, परमेश्वराने आधी कायम केलेल्या कराराला वेगळे करू शकत नाही व दिलेले वचन रद्द करू शकत नाही. कारण जर वारसा नियमशास्त्रावर अवलंबून आहे, तर ते अभिवचनांवर अवलंबून नाही. परंतु परमेश्वराने अब्राहामाला आपल्या कृपेने, अभिवचनाद्वारे वारसाहक्क दिला. तर मग नियमशास्त्र कशासाठी देण्यात आले? ज्या संतानाला त्यांचे अभिवचन दिलेले होते, त्यांचे आगमन होईपर्यंत उल्लंघन काय आहे हे समजण्यासाठी हे लावून दिले होते. आपले नियम देवदूतांद्वारे मध्यस्थाला सोपवून दिले. मध्यस्थ म्हणजे एकापेक्षा अधिक पक्षाचा असतो; पण परमेश्वर एक आहे. तर मग नियमशास्त्र आणि परमेश्वराची अभिवचने परस्परविरोधी आहेत काय? मुळीच नाही! नियमशास्त्र दिल्याने जीवन मिळत असले, तर नीतिमत्व नियमापासून आले असते. पूर्ण जग पापाच्या नियंत्रणात आहे असे शास्त्रलेखाने स्पष्ट केले. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्यांाठी जे अभिवचन मिळणार होते, ते त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना दिले जावे. हा विश्वास येण्यापूर्वी, आपण नियमशास्त्राच्या पहार्यात होतो आणि आपण पहार्यात राहू जोपर्यंत तो विश्वास प्रकट होत नाही. विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यासाठी ख्रिस्त येईपर्यंत नियमशास्त्र आपले संरक्षक होते. पण आता विश्वास आल्यामुळे आपण संरक्षकाच्या अधीन नाही. कारण आता आपण ख्रिस्त येशूंवरील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराची लेकरे आहोत. ज्या आपण सर्वांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, त्या आपण ख्रिस्ताला परिधान केले आहे. आता कोणी यहूदी किंवा गैरयहूदी, गुलाम किंवा स्वतंत्र, स्त्री किंवा पुरुष नाहीत, तर आपण सर्व ख्रिस्त येशूंमध्ये एक आहोत, जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर अब्राहामाचे खरे संतान व परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांचे वारस आहोत.
गलतीकरांस पत्र 3:10-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे.” नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे; कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.” नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे; परंतु “जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्या योगे जगेल.” आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे; ह्यात उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा; म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. बंधुजनहो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो; माणसांनी देखील कायम केलेला करार कोणी रद्द करत नाही किंवा त्यात भर घालत नाही. अब्राहामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. “संतानांना” असे पुष्कळ जणांसंबंधाने तो म्हणत नाही; तर “तुझ्या संतानाला” असे एकाविषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे. मी असे म्हणतो की, देवाने अगोदरच [ख्रिस्ताच्या ठायी] कायम केलेला करार चारशेतीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही. कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते, तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही; पण अब्राहामाला देवाने ते कृपेने अभिवचनाच्या द्वारे दिले आहे. तर मग नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनांमुळे लावून देण्यात आले; ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले. मध्यस्थ हा एकाचा नसतो; आणि देव तर एक आहे. तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्त्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. तरी शास्त्राने सर्वांना पापामध्ये कोंडून ठेवले आहे; ह्यात उद्देश हा की, विश्वास ठेवणार्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. हा जो विश्वास प्रकट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेवले होते. ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात; आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात.
गलतीकरांस पत्र 3:10-29 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नियमशास्त्रातील कृत्यांवर अवलंबून राहणारे जितके लोक आहेत, तितके सर्व शापित आहेत, कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे, ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही, तो शापित आहे.’ नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे, कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल’, असा धर्मशास्त्रलेख आहे. परंतु नियमशास्त्राचा विश्वासाशी संबंध नाही. उलट, धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे ‘जो त्यातील कृत्ये आचरणात आणतो, तो त्यांच्या योगे जगेल.’ आपल्यासाठी ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून मुक्त केले कारण ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा धर्मशास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की, अब्राहामला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये यहुदीतर लोकांना मिळावा, ज्यामुळे आपणाला विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. बंधुजनहो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो, माणसांनीदेखील कायम केलेले मृत्युपत्र कोणी एकटाच रद्द करू शकत नाही किंवा त्यात भर घालू शकत नाही. अब्राहामला व त्याच्या संतानाला देवाने अभिवचने दिली. संतानांना असे पुष्कळ जणांसंबंधाने म्हणजे अनेक वचनी असे तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे आणि तो एक म्हणजे ख्रिस्त. मी असे म्हणतो की, देवाने अगोदरच अब्राहामबरोबर करार केला व तो पाळण्याचे त्याने अभिवचन दिले. चारशे तीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे हा करार संपुष्टात येत नाही व अभिवचन रद्द होत नाही. कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते, तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही, पण देवाने मात्र ते अब्राहामला अभिवचनाद्वारे कृपादान म्हणून दिले आहे. नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन देण्यात आले होते, त्या संतानाच्या आगमनापर्यंत नियमशास्त्र हे उ्रंघनाच्या संदर्भात देण्यात आले होते. ते एका मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांद्वारे देण्यात आले. परंतु एका व्यक्तीचाच संबंध असल्यामुळे मध्यस्थाची गरज नव्हती आणि परमेश्वर एक आहे. तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? मुळीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते, तर नियमशास्त्र पाळून सर्वांना नीतिमत्व प्राप्त करून घेता आले असते. परंतु धर्मशास्त्रलेख असे म्हणतो की, नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे, ज्यामुळे विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने जे अभिवचन मिळते ते देण्यात यावे. पुढे येणाऱ्या विश्वासाची प्रकट होण्याची वेळ येण्यापूर्वी आपल्याला नियमशास्त्राने पापाच्या तुरुंगात कोंडून ठेवले होते. म्हणजेच आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचविणारे रक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे त्या रक्षकाच्या अधीन नाही. तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे देवाचे पुत्र आहात. तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला जणू परिधान केले आहे. यहुदी व ग्रीक, गुलाम व स्वतंत्र, स्त्री व पुरुष, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात, तर अब्राहामचे संतान आणि अभिवचनाच्याद्वारे वारस आहात.