गलातीकरांस 3
3
नियमशास्त्राचे पालन किंवा विश्वास
1अहो मूर्ख गलातीकरांनो! तुम्हाला कोणी मोहात पाडले आहे? तुमच्या डोळ्यांसमोरच येशू ख्रिस्त यांना क्रूसावर खिळण्यात आले असे स्पष्ट चित्रित केले होते. 2तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट समजून घेणे मला आवडेल: नियमशास्त्राप्रमाणे कार्य केल्याने तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला किंवा जे काही तुम्ही ऐकले त्यावर विश्वास ठेवल्याने? 3तुम्ही इतके मूर्ख आहात काय? जे आत्म्याच्याद्वारे सुरू केले ते तुम्ही आता दैहिकरितीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहात काय? 4इतके अपार दुःख तुम्ही व्यर्थच अनुभवले आहे काय, जर ते खरोखरच व्यर्थ होते? 5तर मी पुन्हा विचारतो, परमेश्वर त्यांचा आत्मा तुम्हाला देतात आणि चमत्काराचे कार्य तुम्हामध्ये नियमशास्त्राच्या कार्याद्वारे करतात किंवा तुम्ही जे ऐकले आहे त्यावर विश्वास ठेवण्याद्वारे? 6त्याचप्रमाणे अब्राहामानेसुद्धा, “परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.”#3:6 उत्प 15:6
7ज्यांनी विश्वास ठेवला तीच अब्राहामाची मुले आहेत, हे तुम्हाला स्पष्ट समजू द्या. 8पवित्र शास्त्राने अगोदरच सांगितले होते की परमेश्वर विश्वासाने गैरयहूदीयांना नीतिमान ठरवतील आणि त्यांनी अब्राहामास अगोदरच शुभवार्तेची घोषणा केली: “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादीत होतील.”#3:8 उत्प 12:3; 18:18; 22:18 9म्हणून जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामासोबत आशीर्वाद प्राप्त होतील.
10होय, आणि जे नियमशास्त्रावर विसंबून आहेत ते सर्वजण शापाच्या बंधनाखाली आहेत. कारण पवित्रशास्त्र स्पष्ट म्हणते: “जो कोणी नियमशास्त्राच्या पुस्तकात जे सर्वकाही लिहिले आहे त्याप्रमाणे करीत नाही तो शापित आहे.”#3:10 अनु 27:26 11यास्तव, हे अगदी स्पष्ट आहे की नियमशास्त्रावर अवलंबून राहणारे परमेश्वरापुढे नीतिमान ठरणार नाहीत, कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.”#3:11 हब 2:4 12नियम विश्वासावर आधारित नाही; या व्यतिरिक्त नियमशास्त्र म्हणते, “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.”#3:12 लेवी 18:5 13ख्रिस्ताने आम्हासाठी शाप होऊन, नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला खंडणी देऊन सोडविले, कारण असे लिहिले आहे, “जो कोणी खांबावर टांगला आहे, तो शापित आहे.”#3:13 अनु 21:23 14हे सर्व यासाठी की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूंच्याद्वारे गैरयहूदीयांनाही प्राप्त व्हावा, म्हणजे विश्वासाद्वारे अभिवचन दिल्याप्रमाणे आपल्याला आत्म्याचे दान प्राप्त व्हावे.
नियम आणि अभिवचन
15प्रिय बंधू व भगिनींनो, रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. मानवी करार जो प्रस्थापित केलेला आहे त्यात कोणी वेगळे करू शकत नाही किंवा त्यामध्ये भर घालू शकत नाही त्याप्रमाणे हे आहे. 16ही अभिवचने अब्राहाम व त्याच्या संतानाला दिली होती. शास्त्रलेख “आणि संतानांना” असे अनेक लोकांविषयी म्हणत नाही, तर “आणि तुझ्या संतानाला,”#3:16 उत्प 12:7; 13:15; 24:7 म्हणजे एका व्यक्तिविषयी म्हणतात, आणि ते ख्रिस्त आहे. 17मला म्हणावयाचे ते हे: चारशेतीस वर्षांनंतर देण्यात आलेले नियमशास्त्र, परमेश्वराने अगोदरच कायम केलेल्या कराराला वेगळे करू शकत नाही व दिलेले वचन रद्द करू शकत नाही. 18कारण जर वारसा नियमशास्त्रावर अवलंबून आहे, तर ते अभिवचनांवर अवलंबून नाही. परंतु परमेश्वराने अब्राहामाला आपल्या कृपेने, अभिवचनाच्याद्वारे वारसाहक्क दिला.
19तर मग नियमशास्त्र कशासाठी देण्यात आले? ज्या संतानाला त्यांचे अभिवचन दिलेले होते, त्यांचे आगमन होईपर्यंत उल्लंघन काय आहे हे समजण्यासाठी हे लावून दिले होते. आपले नियम देवदूतांद्वारे मध्यस्थाला सोपवून दिले. 20मध्यस्थ म्हणजे एकापेक्षा अधिक पक्षाचा असतो; पण परमेश्वर एक आहे.
21तर मग नियमशास्त्र आणि परमेश्वराची अभिवचने परस्परविरोधी आहेत काय? मुळीच नाही! नियमशास्त्र दिल्याने जीवन मिळत असले, तर नीतिमत्व नियमापासून आले असते. 22पूर्ण जग पापाच्या नियंत्रणात आहे असे शास्त्रलेखाने स्पष्ट केले. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्यांवर जे अभिवचन मिळणार होते ते त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना दिले जावे.
परमेश्वराची लेकरे
23हा विश्वास येण्यापूर्वी, आपण नियमशास्त्राच्या पहार्यात होतो आणि आपण पहार्यात राहू जोपर्यंत तो विश्वास प्रकट होत नाही. 24विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यासाठी ख्रिस्त येईपर्यंत नियमशास्त्र आपले संरक्षक होते. 25पण आता विश्वास आल्यामुळे आपण संरक्षकाच्या अधीन नाही.
26कारण आता आपण ख्रिस्त येशूंवरील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराची मुले आहोत. 27ज्या आपण सर्वांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, त्या आपण ख्रिस्ताला परिधान केले आहे. 28आता कोणी यहूदी किंवा गैरयहूदी, गुलाम किंवा स्वतंत्र, स्त्री किंवा पुरुष नाहीत, तर आपण सर्व ख्रिस्त येशूंमध्ये एक आहोत, 29जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर अब्राहामाचे खरे संतान व परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांचे वारस आहोत.
सध्या निवडलेले:
गलातीकरांस 3: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.