YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांना 3

3
नियमशास्त्र किंवा विश्वास
1अहो गलतीयातील बुध्दिहीन लोकांनो, क्रुसावर चढविलेल्या येशू ख्रिस्ताचे स्पष्ट वर्णन तुमच्यापुढे असता तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे? 2तुम्हांला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला किंवा शुभवर्तमान ऐकून त्यावर विश्वास ठेवल्यामुळे मिळाला, इतकेच मला तुमच्याकडून समजून घ्यावयाचे आहे. 3तुम्ही इतके बुद्धिहीन कसे काय? तुम्ही देवाच्या आत्म्याने सुरुवात केली असता आता स्वतःच्या शक्तीने पूर्ण करणार काय? 4तुम्ही इतकी दुःखे सहन केली, हे व्यर्थ आहे काय? 5जो तुम्हाला आत्मा पुरवितो व तुमच्यामध्ये चमत्कार करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याने करतो?
6ज्याप्रमाणे अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि त्याला नीतिमान असे गणण्यात आले, तसे हे आहे. 7ह्यावरून तुम्ही समजून घ्या की, विश्वास ठेवणारेच अब्राहामचे खरे वंशज आहेत. 8‘देव यहुदीतर लोकांना विश्वासाने नातिमान ठरविणार,’ ह्या धर्मशास्त्रलेखातील भाकितामुळे अब्राहामला पूर्वीच हे शुभवर्तमान सांगण्यात आले होते की, ‘तुझ्यामध्ये यहुदीतर आणि सर्व राष्ट्रे आशीर्वादीत होतील.’ 9म्हणून जे विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहामप्रमाणे आशीर्वाद मिळतो.
10नियमशास्त्रातील कृत्यांवर अवलंबून राहणारे जितके लोक आहेत, तितके सर्व शापित आहेत, कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे, ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही, तो शापित आहे.’ 11नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे, कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल’, असा धर्मशास्त्रलेख आहे. 12परंतु नियमशास्त्राचा विश्वासाशी संबंध नाही. उलट, धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे ‘जो त्यातील कृत्ये आचरणात आणतो, तो त्यांच्या योगे जगेल.’
13आपल्यासाठी ख्रिस्त शाप असा झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून मुक्त केले कारण ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा धर्मशास्त्रलेख आहे. 14ह्यात उद्देश हा की, अब्राहामला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये यहुदीतर लोकांना मिळावा, ज्यामुळे आपणाला विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.
15बंधुजनहो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो, माणसांनीदेखील कायम केलेले मृत्युपत्र कोणी एकटाच रद्द करू शकत नाही किंवा त्यात भर घालू शकत नाही. 16अब्राहामला व त्याच्या संतानाला देवाने अभिवचने दिली. संतानांना असे पुष्कळ जणांसंबंधाने म्हणजे अनेक वचनी असे तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे आणि तो एक म्हणजे ख्रिस्त. 17मी असे म्हणतो की, देवाने अगोदरच अब्राहामबरोबर करार केला व तो पाळण्याचे त्याने अभिवचन दिले. चारशे तीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे हा करार संपुष्टात येत नाही व अभिवचन रद्द होत नाही. 18कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते, तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही, पण देवाने मात्र ते अब्राहामला अभिवचनाद्वारे कृपादान म्हणून दिले आहे.
नियमशास्त्राचा हेतू
19नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन देण्यात आले होते, त्या संतानाच्या आगमनापर्यंत नियमशास्त्र हे उ्रंघनाच्या संदर्भात देण्यात आले होते. ते एका मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांद्वारे देण्यात आले. 20परंतु एका व्यक्तीचाच संबंध असल्यामुळे मध्यस्थाची गरज नव्हती आणि परमेश्वर एक आहे.
21तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? मुळीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते, तर नियमशास्त्र पाळून सर्वांना नीतिमत्व प्राप्त करून घेता आले असते. 22परंतु धर्मशास्त्रलेख असे म्हणतो की, नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे, ज्यामुळे विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने जे अभिवचन मिळते ते देण्यात यावे.
23पुढे येणाऱ्या विश्वासाची प्रकट होण्याची वेळ येण्यापूर्वी आपल्याला नियमशास्त्राने पापाच्या तुरुंगात कोंडून ठेवले होते. 24म्हणजेच आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचविणारे रक्षक होते. 25परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे त्या रक्षकाच्या अधीन नाही.
विश्वासाचा परिणाम
26तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे देवाचे पुत्र आहात. 27तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला जणू परिधान केले आहे. 28यहुदी व ग्रीक, गुलाम व स्वतंत्र, स्त्री व पुरुष, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. 29तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात, तर अब्राहामचे संतान आणि अभिवचनाच्याद्वारे वारस आहात.

सध्या निवडलेले:

गलतीकरांना 3: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन