YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलातीकरांस 3:10-29

गलातीकरांस 3:10-29 MRCV

जे नियमशास्त्रावर विसंबून आहेत ते सर्वजण शापाच्या बंधनाखाली आहेत. कारण पवित्रशास्त्र स्पष्ट म्हणते: “जो कोणी नियमशास्त्राच्या पुस्तकात जे सर्वकाही लिहिले आहे त्याप्रमाणे करीत नाही तो शापित आहे.” यास्तव, हे अगदी स्पष्ट आहे की नियमशास्त्रावर अवलंबून राहणारे परमेश्वरापुढे नीतिमान ठरणार नाहीत, कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.” नियम विश्वासावर आधारित नाही; याव्यतिरिक्त नियमशास्त्र म्हणते, “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.” ख्रिस्ताने आम्हासाठी शाप होऊन, नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला खंडणी देऊन सोडविले, कारण असे लिहिले आहे, “जो कोणी खांबावर टांगला आहे, तो शापित आहे.” हे सर्व यासाठी की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूंच्याद्वारे गैरयहूदीयांनाही प्राप्त व्हावा, म्हणजे विश्वासाद्वारे अभिवचन दिल्याप्रमाणे आपल्याला आत्म्याचे दान प्राप्त व्हावे. प्रिय बंधू व भगिनींनो, रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. मानवी करार जो प्रस्थापित केलेला आहे त्यात कोणी वेगळे करू शकत नाही किंवा त्यामध्ये भर घालू शकत नाही त्याप्रमाणे हे आहे. ही अभिवचने अब्राहाम व त्याच्या संतानाला दिली होती. शास्त्रलेख “आणि संतानांना” असे अनेक लोकांविषयी म्हणत नाही, तर “आणि तुझ्या संतानाला,” म्हणजे एका व्यक्तीविषयी म्हणतात, आणि ते ख्रिस्त आहे. मला म्हणावयाचे ते हे: चारशेतीस वर्षानंतर देण्यात आलेले नियमशास्त्र, परमेश्वराने आधी कायम केलेल्या कराराला वेगळे करू शकत नाही व दिलेले वचन रद्द करू शकत नाही. कारण जर वारसा नियमशास्त्रावर अवलंबून आहे, तर ते अभिवचनांवर अवलंबून नाही. परंतु परमेश्वराने अब्राहामाला आपल्या कृपेने, अभिवचनाद्वारे वारसाहक्क दिला. तर मग नियमशास्त्र कशासाठी देण्यात आले? ज्या संतानाला त्यांचे अभिवचन दिलेले होते, त्यांचे आगमन होईपर्यंत उल्लंघन काय आहे हे समजण्यासाठी हे लावून दिले होते. आपले नियम देवदूतांद्वारे मध्यस्थाला सोपवून दिले. मध्यस्थ म्हणजे एकापेक्षा अधिक पक्षाचा असतो; पण परमेश्वर एक आहे. तर मग नियमशास्त्र आणि परमेश्वराची अभिवचने परस्परविरोधी आहेत काय? मुळीच नाही! नियमशास्त्र दिल्याने जीवन मिळत असले, तर नीतिमत्व नियमापासून आले असते. पूर्ण जग पापाच्या नियंत्रणात आहे असे शास्त्रलेखाने स्पष्ट केले. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्‍यांाठी जे अभिवचन मिळणार होते, ते त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना दिले जावे. हा विश्वास येण्यापूर्वी, आपण नियमशास्त्राच्या पहार्‍यात होतो आणि आपण पहार्‍यात राहू जोपर्यंत तो विश्वास प्रकट होत नाही. विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यासाठी ख्रिस्त येईपर्यंत नियमशास्त्र आपले संरक्षक होते. पण आता विश्वास आल्यामुळे आपण संरक्षकाच्या अधीन नाही. कारण आता आपण ख्रिस्त येशूंवरील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराची लेकरे आहोत. ज्या आपण सर्वांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, त्या आपण ख्रिस्ताला परिधान केले आहे. आता कोणी यहूदी किंवा गैरयहूदी, गुलाम किंवा स्वतंत्र, स्त्री किंवा पुरुष नाहीत, तर आपण सर्व ख्रिस्त येशूंमध्ये एक आहोत, जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर अब्राहामाचे खरे संतान व परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांचे वारस आहोत.