YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 4:24-37

प्रेषितांची कृत्ये 4:24-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

ते ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले, “हे प्रभू, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही ज्याने निर्माण केले तो तूच आहे. तुझा सेवक, आमचा पूर्वज दावीद, याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले, ‘राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या? प्रभूविरूद्ध व त्याच्या ख्रिस्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी एकत्र जमले.’ कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक, येशू, ह्याच्याविरुद्ध या नगरात परराष्ट्रीय व इस्राएली लोक यांच्याबरोबर हेरोद व पंतय पिलात एकत्र झाले. यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या इच्छेने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे. तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे. तू आपला हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अद्भूते घडावी असे ही कर.” आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हालली, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा व एकजिवाचा होता: आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ सामाईक होते. आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते, आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती. त्यांतील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घरांचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले. आणि ते प्रेषितांच्या पायाशी ठेवले, मग जसजशी कोणाला गरज लागत असे, तसतसे ते प्रत्येकाला वाटून देत असत. आणि कुप्र बेटाचा रहिवासी लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्णबा, म्हणजे उत्तेजन पुत्र असे नाव दिले होती. त्याची जमीन होती, ती त्याने विकून तिचा पैसा आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला.

प्रेषितांची कृत्ये 4:24-37 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यांचे हे विवरण ऐकून सर्व विश्वासणार्‍यांनी मोठ्या स्वराने मिळून परमेश्वराकडे प्रार्थना केली: “सार्वभौम प्रभू” तुम्ही आकाश, पृथ्वी, सागर व त्यांतील सर्वकाही निर्माण केले आहे. पवित्र आत्म्याच्याद्वारे तुम्ही, तुमचा सेवक आणि आमचा पिता दावीद याच्या मुखातून बोलला आहात: “ ‘राष्ट्रे क्रोधाने का खवळतात आणि जाती व्यर्थ बेत का रचतात? पृथ्वीवरील राजे उठले आहेत आणि शासक लोक एकत्र आले आहेत, प्रभुविरुद्ध आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध.’ खरोखर हेरोद राजा आणि राज्यपाल पंतय पिलात आणि सर्व गैरयहूदी आणि त्याचप्रमाणे या शहरात राहणारे इस्राएल लोक तुमचा पवित्र सेवक येशू ज्यांचा तुम्ही अभिषेक केला आहे, त्यांच्याविरुद्ध कट कारस्थान करण्यास एकत्र आले. तुमच्या शक्तीने आणि इच्छेने जे घडावे असे तुम्ही योजले होते तेच त्यांनी केले. तर आता, हे प्रभू, त्यांच्या धमक्यांकडे लक्ष द्या आणि मोठ्या धैर्याने तुमचे वचन सांगण्यासाठी तुमच्या सेवकांना सामर्थ्य द्या. तुमचा पवित्र सेवक येशू यांच्या नावामध्ये आजार बरे होण्यासाठी, चिन्हे आणि आश्चर्यकारक गोष्टी करून दाखविण्यासाठी तुम्ही आपला हात लांब करा.” या प्रार्थनेनंतर, ज्या ठिकाणी ते जमले होते, ती हादरली आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन धैर्याने परमेश्वराचे वचन सांगू लागले. त्यावेळी सर्व विश्वासणारे एक हृदयाचे आणि एकमनाचे होते. त्यांच्यापैकी कोणीही त्यांची संपत्ती स्वतःची आहे असे हक्काने सांगत नव्हते, परंतु त्यांच्याकडे असलेले सर्वकाही त्यांनी समाईक मानले होते. प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाविषयी प्रेषित मोठ्या शक्तीने सतत साक्ष देत राहिले आणि त्या सर्वांवर परमेश्वराची विपुल कृपा शक्तीने कार्य करीत होती. त्यांच्यामध्ये गरजवंत असा कोणीही राहिला नव्हता. कारण घर व जमिनीचे जे मालक होते ते त्यांची घरे व जमिनी विकून आलेले पैसे प्रेषितांच्या चरणी आणून ठेवीत होते आणि जे कोणी गरजवंत होते, त्यांना वाटून देत. योसेफ लेवी असून सायप्रसवासी होता ज्याला प्रेषितांनी बर्णबा म्हणजे, “उत्तेजनाचा पुत्र” असे नाव दिले होते, त्याने त्याच्या मालकीची शेतजमीन विकून मिळालेली रक्कम प्रेषितांच्या चरणी आणून ठेवली.

प्रेषितांची कृत्ये 4:24-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, “हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस. आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटलेस, ‘राष्ट्रे का खवळली, व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी जमले;’ कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले; ह्यासाठी की, जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे. तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा; आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर; तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर.” त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. तेव्हा विश्वास धरणार्‍यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्वकाही समाईक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनींचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवत; मग ज्याच्या-त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्णबा (म्हणजे बोधपुत्र) म्हणत. त्याची शेतजमीन होती; ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणी ठेवले.

प्रेषितांची कृत्ये 4:24-37 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ते ऐकून श्रद्धावंत एकत्रितपणे देवाकडे प्रार्थना करीत म्हणाले, “हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यांत जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस. आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले: राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्‍ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले. कारण ज्याला तू अभिषिक्‍त केलेस तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्याविरुद्ध ह्या शहरात यहुदीतर लोक व इस्राएली लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे खरोखर एकत्र झाले आहेत. जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी नियोजित केले होते ते त्यांनी पूर्ण करावे. तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि बरे करण्याकरता तू आपला हात पुढे करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व चमत्कार घडावेत अशी कृपा कर.” त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेवर ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने घोषित करू लागले. विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे, असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; त्या सर्वांवर परमेश्वराची मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही काही उणे नव्हते कारण जमिनीचे किंवा घराचे जेजे मालक होते, ते आपली मालमत्ता विकत आणि तिचे मोल आणून प्रेषितांच्या स्वाधीन करत. त्यानंतर ज्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे ते प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्र बेटावर जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. प्रेषित त्याला बर्णबा म्हणजे उत्तेजनपुत्र म्हणत. त्याची शेतजमीन होती. ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवले.