ते ऐकून श्रद्धावंत एकत्रितपणे देवाकडे प्रार्थना करीत म्हणाले, “हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यांत जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस. आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्याद्वारे तू म्हटले: राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले. कारण ज्याला तू अभिषिक्त केलेस तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्याविरुद्ध ह्या शहरात यहुदीतर लोक व इस्राएली लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे खरोखर एकत्र झाले आहेत. जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी नियोजित केले होते ते त्यांनी पूर्ण करावे. तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि बरे करण्याकरता तू आपला हात पुढे करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व चमत्कार घडावेत अशी कृपा कर.” त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेवर ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने घोषित करू लागले. विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे, असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; त्या सर्वांवर परमेश्वराची मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही काही उणे नव्हते कारण जमिनीचे किंवा घराचे जेजे मालक होते, ते आपली मालमत्ता विकत आणि तिचे मोल आणून प्रेषितांच्या स्वाधीन करत. त्यानंतर ज्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे ते प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्र बेटावर जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. प्रेषित त्याला बर्णबा म्हणजे उत्तेजनपुत्र म्हणत. त्याची शेतजमीन होती. ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवले.
प्रेषितांचे कार्य 4 वाचा
ऐका प्रेषितांचे कार्य 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांचे कार्य 4:24-37
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ