YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 4:24-37

प्रेषितांची कृत्ये 4:24-37 MARVBSI

हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, “हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस. आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटलेस, ‘राष्ट्रे का खवळली, व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी जमले;’ कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले; ह्यासाठी की, जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे. तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा; आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर; तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर.” त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. तेव्हा विश्वास धरणार्‍यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्वकाही समाईक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनींचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवत; मग ज्याच्या-त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्णबा (म्हणजे बोधपुत्र) म्हणत. त्याची शेतजमीन होती; ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणी ठेवले.

प्रेषितांची कृत्ये 4:24-37 साठी चलचित्र