2 तीमथ्य 3:1-9
2 तीमथ्य 3:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु शेवटच्या काळामध्ये संकटाचा दिवस आपल्यावर येईल हे समजून घे. लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदा करणारी, आई-वडीलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक इतरांवर प्रीती न करणारी, क्षमा न करणारी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी. विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील; ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वाईट अभिलाषांनी भरलेल्या, कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवतात. अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत. यान्नेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा, ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व विश्वास अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी माणसे आहेत. ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत कारण जसा त्यांचा मूर्खपणा प्रकट झाला तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रकट होईल.
2 तीमथ्य 3:1-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे लक्षात ठेव, शेवटच्या दिवसांमध्ये कठीण संकटाचे काळ येतील. लोक स्वार्थी, धनलोभी, गर्विष्ठ, बढाईखोर, परमेश्वराचा उपहास करणारे, मातापित्यांची अवज्ञा करणारे, दयाहीन, अपवित्र, ममताहीन, क्षमा न करणारे, चहाड्या करणारे, आत्मसंयमन न करणारे, क्रूर, चांगल्याचा द्वेष करणारे, विश्वासघातकी, बेपर्वा, अहंकारी परमेश्वरावर प्रीती करण्याऐवजी सुखोपभोगावर प्रीती करणारे, असे होतील. ते भक्तिचा देखावा करतील. परंतु त्यांच्या सामर्थ्याला नाकारतील, अशा सर्व लोकांपासून दूर राहा. ते अशाप्रकारचे लोक आहेत की ते घरांमध्ये शिरतात व पापांनी दबलेल्या, सर्वप्रकारच्या दुष्ट वासनांनी वेढलेल्या व सतत शिकत असूनही ज्यांना सत्य कधीही उमगले नाही, अशा स्त्रियांना वश करतील. यान्नेस आणि यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला, तसेच हे शिक्षक सत्याचा विरोध करतात. ते भ्रष्ट बुद्धिचे आणि विश्वासाविषयी नाकारलेले असे लोक आहेत. परंतु हे फार काळ चालणार नाही. कारण जसा त्यांचा मूर्खपणा उघड झाला, तसेच यांचाही मूर्खपणा प्रत्येकाला कळून येईल.
2 तीमथ्य 3:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासूनही दूर राहा. त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की जे घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहचणार्या, अशा भोळ्या स्त्रियांना वश करतात. यान्नेस व यांब्रेस ह्यांनी जसे मोशेला अडवले, तसे हेही सत्याला अडवतात; हे लोक भ्रष्टबुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत, तरी हे अधिक सरसावणार नाहीत; कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल.
2 तीमथ्य 3:1-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे लक्षात ठेव. माणसे आत्मकेंद्रित, धनलोभी, बढाईखोर, अहंकारी, दुर्भाषण करणारी, आईबापांना न मानणारी, कृतघ्न, अपवित्र, ममताहीन, क्षमा न करणारी, निंदक, असंयमी, उग”, चांगुलपणाचा द्वेष करणारी, विश्वासघातकी, हेकेखोर, उद्धट, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, आपल्या धर्माचे बाह्यरूप पकडून त्याचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील. अशा लोकांपासून दूर राहा. त्यांच्यापैकी काही लोक दुसऱ्यांच्या घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, सदा शिकत असूनही सत्याचे ज्ञान मिळवू न शकणाऱ्या भोळ्या स्त्रियांस वश करतात. यान्नेस व यांब्रेस ह्यांनी जसे मोशेला अडविले, तसे हेही सत्याला अडवितात. हे लोक विवेकभ्रष्ट व विश्वासासंबंधाने अपयशी ठरलेले आहेत, परंतु हे लोक प्रगती करू शकणार नाहीत कारण जसे यान्नेस व यांब्रेस ह्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल.