2 तीमथ्य 3
3
1हे लक्षात ठेव, शेवटच्या दिवसांमध्ये कठीण संकटाचे काळ येतील. 2लोक स्वार्थी, धनलोभी, गर्विष्ठ, बढाईखोर, परमेश्वराचा उपहास करणारे, मातापित्यांची अवज्ञा करणारे, दयाहीन, अपवित्र, 3ममताहीन, क्षमा न करणारे, चहाड्या करणारे, आत्मसंयमन न करणारे, क्रूर, चांगल्याचा द्वेष करणारे, 4विश्वासघातकी, बेपर्वा, अहंकारी परमेश्वरावर प्रीती करण्याऐवजी सुखोपभोगावर प्रीती करणारे, असे होतील. 5ते भक्तिचा देखावा करतील. परंतु त्यांच्या सामर्थ्याला नाकारतील, अशा सर्व लोकांपासून दूर राहा.
6-7ते अशाप्रकारचे लोक आहेत की ते घरांमध्ये शिरतात व पापांनी दबलेल्या, सर्वप्रकारच्या दुष्ट वासनांनी वेढलेल्या व सतत शिकत असूनही ज्यांना सत्य कधीही उमगले नाही, अशा स्त्रियांना वश करतील. 8यान्नेस आणि यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला, तसेच हे शिक्षक सत्याचा विरोध करतात. ते भ्रष्ट बुद्धिचे आणि विश्वासाविषयी नाकारलेले असे लोक आहेत. 9परंतु हे फार काळ चालणार नाही. कारण जसा त्यांचा मूर्खपणा उघड झाला, तसेच यांचाही मूर्खपणा प्रत्येकाला कळून येईल.
तीमथ्याला सोपविलेला अंतिम कार्यभार
10परंतु माझी शिकवण, वागणूक, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर 11आणि अंत्युखिया, इकुन्या व लुस्त्र या शहरात आलेली संकटे आणि माझा झालेला छळ हे तुला पूर्ण माहीत आहे. परंतु या सर्वांतून प्रभुनेच मला सोडविले. 12खरे पाहिले तर ख्रिस्त येशूंमध्ये जे सुभक्तीने जीवन जगण्याचा निश्चय करतात, त्या सर्वांचा छळ होईल. 13परंतु दुष्ट आणि भोंदू लोक हे दुसर्यांना फसवून आणि स्वतः फसून अधिक वाईटाकडे जातील. 14परंतु तुझ्यासाठी, तू ज्या गोष्टी शिकलास, ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे, त्या धरून राहा; कारण त्या तू कोणापासून शिकलास तुला माहीत आहे. 15लहानपणापासूनच पवित्रशास्त्र तुला माहीत आहे. हेच पवित्रशास्त्र ख्रिस्त येशूंमधील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराचे तारण स्वीकारण्यासाठी तुला सुज्ञ करते. 16संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण यांकरिता उपयोगी आहे. 17यासाठी की, परमेश्वराचा सेवक पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.
सध्या निवडलेले:
2 तीमथ्य 3: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.