YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रूथ 3

3
रूथ आणि बवाज यांची खळ्यातील भेट
1एके दिवशी रूथची सासू नाओमी तिला म्हणाली, “माझ्या मुली, जिथे तुझी चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल असे घर#3:1 किंवा विसावा मला तुझ्यासाठी शोधलेच पाहिजे. 2ज्याच्या स्त्रियांबरोबर तू काम केले आहेस तो बवाज आपला नातेवाईकच आहे. आज रात्री तो झोडपणी करण्याच्या जागेवर जव पाखडण्याचे काम करेल. 3आंघोळ कर, सुगंधी अत्तर लाव आणि तुझी उत्तम वस्त्रे घाल. नंतर खाली खळ्यात जा, परंतु त्याचे खाणे आणि पिणे होईपर्यंत त्याला माहीत होऊ देऊ नकोस की, तू तिथे आहेस. 4जेव्हा विश्रांती घेतो तेव्हा तो कुठे झोपत आहे, हे पाहून ठेव. नंतर जा आणि त्याच्या पायांवरील पांघरूण काढ आणि तिथेच पडून राहा. काय करावयाचे तोच तुला सांगेल.”
5रूथने उत्तर दिले, “तुम्ही जे काही सांगता ते मी करेन.” 6तेव्हा ती खाली खळ्यात गेली आणि तिच्या सासूने जे सर्वकाही तिला करावयास सांगितले होते तसे तिने केले.
7जेव्हा बवाजने खाणे आणि पिणे संपविले आणि तो आनंदात होता, मग तो झोपण्यासाठी धान्य रचून ठेवलेल्या ढिगाऱ्यांच्या शेवटी गेला. रूथ शांतपणे त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या पायांवरचे पांघरूण काढले आणि तिथेच पडून राहिली. 8मध्यरात्री त्या मनुष्याला कशाचातरी धक्का लागला; त्याने वळून पाहिले—आणि त्याच्या पायाजवळ एक स्त्री निजली होती!
9त्याने विचारले, “तू कोण आहेस?”
“मी तुमची दासी रूथ आहे. तुमच्या वस्त्राचा कोपरा माझ्यावर पसरून टाका, कारण तुम्ही आमच्या कुटुंबाला सोडविणाऱ्यांपैकी एक आहात.”
10“माझ्या मुली, याहवेह तुला आशीर्वाद देवो,” त्याने उत्तर दिले. “जो दयाळूपणा तू आता दाखविला, तो पूर्वी दाखविला त्यापेक्षा अधिक आहे: गरीब असो वा श्रीमंत, पण तू अशा तरुण पुरुषांच्या मागे गेली नाहीस. 11आणि आता, माझ्या मुली, घाबरू नकोस. तू जे काही मागशील ते मी सर्व तुझ्यासाठी करेन. माझ्या नगरातील सर्व लोकांना माहीत आहे की, तू एक नीतिमान चरित्र असलेली स्त्री आहेस. 12ही गोष्ट खरी आहे की, मी आपल्या कुटुंबाचा सोडविणारा नातेवाईक आहे, परंतु माझ्याहीपेक्षा अधिक जवळचा संबंध असलेला असा दुसरा एकजण आणखी आहे. 13आज रात्री येथेच राहा आणि सकाळी जर त्याला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सोडविणारा म्हणून त्याचे कर्तव्य करावयाचे असेल, तर चांगलेच आहे; त्याला तुम्हाला सोडवू द्या. परंतु जर त्याची तशी इच्छा नसेल, तर याहवेहची शपथ, मी ते करेन. सकाळ होईपर्यंत येथेच पडून राहा.”
14म्हणून ती सकाळपर्यंत त्याच्या पायाजवळ पडून राहिली, परंतु इतर कोणालाही कळण्याआधी ती उठून बसली, तेव्हा तो म्हणाला, “कोणालाही हे माहीत व्हायला नको की एक स्त्री या खळ्यात आली होती.”
15तो असेही म्हणाला, “तू घातलेली ओढणी माझ्याकडे आण आणि ती उघडून धरून ठेव.” जेव्हा तिने तसे केले तेव्हा त्याने सहा मापे भरून जव त्यावर ओतले आणि ते गाठोडे बांधून तिच्या खांद्यावर दिले. नंतर तो परत नगराकडे निघून गेला.
16जेव्हा ती घरी तिच्या सासूकडे आली, तेव्हा नाओमीने तिला विचारले, “माझ्या मुली, कसे काय झाले?”
तेव्हा बवाजने तिच्यासाठी जे केले, ते तिने तिला सर्वकाही सांगितले, 17आणि ती पुढे म्हणाली, “त्याने मला ही सहा मापे जव दिले व म्हणाला, ‘तुझ्या सासूकडे रिकामी हाताने परत जाऊ नकोस.’ ”
18तेव्हा नाओमी म्हणाली, “माझ्या मुली, काय घडते हे समजेपर्यंत वाट पाहा, कारण तो मनुष्य या गोष्टीचा निकाल लागेपर्यंत स्वस्थ राहणार नाही.”

सध्या निवडलेले:

रूथ 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन