रूथ 4
4
बवाज रूथबरोबर विवाह करतो
1त्या दरम्यान बवाज नगराच्या वेशीकडे गेला आणि तो तिथे बसला असताना तो सोडवणूक करणारा, ज्याच्याबद्दल त्याने सांगितले होते, तो मनुष्य पुढे आला. तेव्हा बवाज त्याला म्हणाला, “माझ्या मित्रा, इकडे ये आणि इथे बस.” तेव्हा तो तिकडे गेला आणि बसला.
2नंतर बवाजने नगरातील दहा वडीलजनांना बोलावून घेतले आणि त्यांना म्हणाला, “येथे बसा,” आणि ते बसले. 3तेव्हा तो जबाबदारी घेऊन सोडवणूक करणाऱ्या मनुष्यास म्हणाला, “नाओमी मोआब देशातून परत आली आहे. ती आता ज्या जमिनीचा भाग विकत आहे, ती आपला नातेवाईक एलीमेलेख याच्या मालकीची आहे. 4मला असे वाटले की, ही गोष्ट तुझ्या लक्षात आणून द्यावी आणि मी असे सुचवितो की, येथे बसलेल्या लोकांच्या उपस्थितीत आणि माझ्या वडीलजनांच्या उपस्थितीत तू ती विकत घे. जर तू ती सोडवशील, तर तसे कर. परंतु जर तू तसे करणार नाहीस, मला सांग, म्हणजे मला ते कळेल. कारण तुझ्याशिवाय तसे करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि तुझ्यानंतर मला तो अधिकार आहे.”
तो म्हणाला, “मी तो सोडवून घेईन,”
5तेव्हा बवाज म्हणाला, “ज्या दिवशी तू नाओमीकडून ही जमीन विकत घेशील तेव्हा त्याच्या कुटुंबाचे नाव त्याची मालमत्ता चालू ठेवण्यासाठी त्या मृत माणसाची विधवा मोआबी रूथसुद्धा तुला स्वीकारावी लागेल.”
6यावरून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य म्हणाला, “असे असेल, तर मग मी ती सोडवू शकत नाही. कारण त्यामुळे माझी स्वतःची मालमत्ता धोक्यात येईल. तू स्वतःच ती सोडवून घे. मी हे करू शकत नाही.”
7(इस्राएलमध्ये पूर्वीच्या काळात, मालमत्तेची सोडवणूक करणे आणि तिचे हस्तांतरण पक्के होण्यासाठी, एका पक्षाने त्याची चप्पल काढून ती दुसऱ्याला देणे ही इस्राएलमधील व्यवहार कायदेशीर करण्याची पद्धत होती.)
8म्हणून तो जबाबदारी घेऊन सोडविणारा मनुष्य बवाजला म्हणाला, “तू स्वतःच ती विकत घे.” आणि त्यावेळी त्याने त्याची चप्पल काढली.
9तेव्हा बवाजने वडीलजनांना आणि सर्व लोकांना जाहीरपणे सांगितले, “आज तुम्ही साक्षीदार आहात की मी एलीमेलेख, किलिओन आणि महलोन यांची सर्व मालमत्ता नाओमीकडून विकत घेतली आहे. 10मोआबी रूथ, म्हणजे महलोनची विधवा हिलासुद्धा माझी पत्नी म्हणून, त्या मनुष्याचे नाव त्याच्या मालमत्तेसहित चालवावे यासाठी माझ्या ताब्यात घेत आहे, म्हणजे त्याच्या कुटुंबातून किंवा त्याच्या गावातून त्याचे नाव पुसले जाणार नाही. याविषयी तुम्ही आज साक्षी आहात!”
11तेव्हा वडीलजन आणि वेशीत आलेले सर्व लोक म्हणाले, “होय, आम्ही साक्षीदार आहोत. राहेल आणि लेआ, ज्यांनी एकत्र मिळून इस्राएलचे कुटुंब तयार केले, त्याप्रमाणेच याहवेह आता तुझ्या घरात येत असलेल्या या स्त्रीचे करो. तुला एफ्राथामध्ये स्थान मिळो आणि तू बेथलेहेमात प्रसिद्ध व्हावेस. 12या तरुण स्त्रीपासून याहवेह तुला संतती देवो, तुझे कुटुंब तामार आणि यहूदाह यांचा पुत्र पेरेस यांच्यासारखे होवो.”
नाओमीला पुत्रप्राप्ती होते
13तेव्हा बवाजने रूथला स्वीकारले आणि ती त्याची पत्नी झाली. जेव्हा त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केले, तेव्हा याहवेहनी तिला गर्भ राहण्यासाठी समर्थ केले, आणि तिने मुलाला जन्म दिला. 14तेव्हा स्त्रिया नाओमीला म्हणाल्या: “याहवेहची स्तुती असो, ज्यांनी या दिवशी तुझी जबाबदारी घेऊन सोडविणाऱ्याशिवाय तुला सोडले नाही. तो संपूर्ण इस्राएलमध्ये प्रसिद्ध होवो! 15तो तुला नवजीवन देऊन तुझ्या वृद्धापकाळात तुला आधार देईल. कारण तुझी सून, जी तुझ्यावर प्रीती करते आणि जी सात मुलांपेक्षा अधिक उत्तम आहे, तिनेच त्याला जन्म दिला आहे.”
16तेव्हा नाओमीने ते बाळ उचलून उराशी धरले आणि त्याची काळजी घेऊ लागली. 17तिथे राहणाऱ्या स्त्रिया म्हणाल्या, “आता नाओमीला मुलगा आहे!” आणि त्यांनी त्याचे नाव ओबेद ठेवले. जो इशायाचा पिता, जो दावीद राजाचा पिता होता.
दावीदाची वंशावळ
18पेरेसाची वंशावळ अशी:
पेरेस हा हेस्रोनचा पिता होता,
19हेस्रोन हा रामचा पिता,
राम हा अम्मीनादाबचा पिता,
20अम्मीनादाब हा नहशोनचा पिता,
नहशोन हा सल्मोन#4:20 काही मूळ प्रतींनुसार सल्मा चा पिता,
21सल्मोन हा बवाजचा पिता,
बवाज हा ओबेदचा पिता,
22ओबेद हा इशायचा पिता,
आणि इशाय हा दावीदाचा पिता.
सध्या निवडलेले:
रूथ 4: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.