रूथ 2
2
रूथ बवाज यांची शेतात भेट होते
1नाओमीच्या पतीचा एक नातेवाईक होता, तो मनुष्य एलीमेलेखच्या कुळातील असून, त्याचे नावे बवाज असे होते.
2आणि मोआबी रूथ नाओमीला म्हणाली, “ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल अशा मनुष्याच्या शेतामध्ये जाऊन त्याच्यामागे राहिलेले धान्य वेचण्यासाठी मला जाऊ दे.”
नाओमी म्हणाली, “ठीक आहे, माझ्या मुली, तू जा.” 3तेव्हा ती गेली, तिने एका शेतात प्रवेश केला आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे राहिलेले धान्य जमा करू लागली, संयोगाने ते शेत बवाजच्या मालकीचे होते, जो एलीमेलेखच्या कुळातील होता.
4त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!”
त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!”
5बवाजाने त्याच्या कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास विचारले, “ती तरुण स्त्री कोणाची आहे?”
6त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे. 7ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणार्यांच्यामागे पेंढ्यांमधून राहिलेले धान्य जमा करून गोळा करू द्या.’ ती सकाळीच शेतामध्ये आली आणि थोडाच वेळ छताखाली विश्रांती घेऊन आतापर्यंत येथेच आहे.”
8तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, माझे ऐक. धान्य वेचण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस आणि येथून दूर जाऊ नकोस. माझ्यासाठी काम करणार्या स्त्रियांबरोबर इथेच राहा. 9ज्या शेतात माणसे कापणीचे काम करीत आहेत तिकडे लक्ष ठेव आणि या स्त्रियांच्या बरोबरीने त्यांच्यामागे जात राहा. तुला त्रास न देण्याबद्दल मी माणसांना सांगून ठेवले आहे. जेव्हा तुला तहान लागेल, तेव्हा तू जाऊन माणसांनी भरून ठेवलेल्या या रांजणातील पाणी पीत जा.”
10त्यावर तिने तिचे मुख जमिनीकडे खाली लवून ते मान्य केले. ती त्याला म्हणाली, “मी एक परदेशी असूनही तुम्ही माझ्यावर एवढी कृपादृष्टी का बरे दाखवित आहात?”
11बवाज म्हणाला, “तुझ्या पतीच्या निधनानंतर तू तुझ्या सासूसाठी जे काही केले ते सर्व मला सांगण्यात आलेले आहे—कशाप्रकारे तू तुझ्या वडिलांकडे आणि आईकडे आणि तुझ्या गावाकडे जाण्याचे मान्य केले नाहीस आणि अशा लोकांबरोबर राहण्यास आली आहेस की, ज्यांना तू ओळखत नाही. 12तू जे काही केले आहेस त्याचे फळ याहवेह तुला देतील. याहवेह इस्राएलांचे परमेश्वर ज्यांच्या पंखाखाली आश्रय घेण्यास तू आली आहेस, त्यांच्याद्वारे तुला भरपूर मजुरी मिळो.”
13तेव्हा ती म्हणाली, “हे स्वामी, तुमच्याकडून माझ्यावर सतत कृपा होत रहावी, जरी मी तुमच्या एखाद्या नोकरांपैकी नाही तरी तुमच्या या दासीबरोबर दयाळूपणाने बोलण्याने मला समाधान झाले आहे.”
14भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये. थोडी भाकरी घे आणि द्राक्षाच्या सिरक्यामध्ये बुडवून खा.”
जेव्हा ती कापणी करणाऱ्याबरोबर खाली बसली, तेव्हा त्याने तिला थोडे भाजलेले धान्य दिले. तिने तिला हवे तेवढे खाल्ले आणि थोडेसे राहिले होते. 15जेव्हा ती उरलेले धान्य जमा करण्यास उठली, तेव्हा बवाजाने त्याच्या माणसांना आज्ञा दिल्या, “तिला पेंढ्यांमधून राहिलेले धान्य गोळा करू द्या आणि तिला मनाई करू नका. 16उलट पेंढ्यांतून काही ताटे ओढून तिला वेचण्यासाठी पडू द्या, आणि तिला धमकावू नका.”
17अशाप्रकारे रूथने शेतात संध्याकाळपर्यंत धान्य वेचले. नंतर तिने गोळा केलेल्या जवाची झोडपणी केली आणि ते एकूण एक एफा#2:17 अंदाजे 13 कि.ग्रॅ. भरले. 18ते घेऊन ती नगरात गेली आणि तिच्या सासूने पाहिले की तिने किती गोळा केले आहे. रूथने खाऊन राहिलेले अन्नसुद्धा आणले आणि ते तिला दिले.
19तिच्या सासूने तिला विचारले, “धान्य गोळा करण्यासाठी आज तू कुठे गेली होतीस? तू कुठे काम केलेस? ज्याने तुझी एवढी काळजी घेतली, तो मनुष्य आशीर्वादित असो!”
तेव्हा रूथने तिच्या सासूला त्याच्याबद्दल सांगितले ज्याच्या ठिकाणी ती काम करीत होती. ती म्हणाली, “ज्या माणसाबरोबर मी आज काम केले त्याचे नाव बवाज असे आहे,”
20नाओमी तिच्या सुनेला म्हणाली, “याहवेह त्याला आशीर्वादित करो! त्याने जिवंतांना आणि मृतांना त्याचा चांगुलपणा दाखविणे थांबविले नाही.” ती पुढे म्हणाली, “तो मनुष्य आपला जवळचा नातेवाईक आहे; तो आम्हाला सोडविणाऱ्यांपैकी#2:20 म्हणजे सोडविणारा गंभीर परिस्थितीत असलेल्या नातेवाईकाला त्यातून सोडविण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीसाठी वापरला जाणारा शब्द (लेवी 25:25‑55 पाहा). एक आहे.”
21तेव्हा मोआबी रूथ म्हणाली, “तो मला असेही म्हणाला की, ‘जोपर्यंत ते माझ्या संपूर्ण धान्याची कापणी करीत आहेत, तोपर्यंत माझ्या कामकऱ्यांबरोबर राहा.’ ”
22नाओमी तिची सून रूथला म्हणाली, “माझ्या मुली, त्याच्यासाठी काम करणाऱ्या स्त्रियांबरोबर जाणे हे तुझ्यासाठी हिताचे होईल, कारण दुसर्या कोणाच्याही शेतात तुझ्यावर अत्याचार होण्याची शक्यता आहे.”
23म्हणून जव आणि गव्हाची कापणी संपेपर्यंत रूथ जव गोळा करीत बवाजच्या स्त्रियांच्या जवळच राहिली. ती तिच्या सासूसह राहिली.
सध्या निवडलेले:
रूथ 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.