स्तोत्रसंहिता 86
86
स्तोत्र 86
दावीदाची एक प्रार्थना
1हे याहवेह, माझी विनंती ऐकून मला उत्तर द्या,
कारण मी दीन व दरिद्री आहे.
2माझे रक्षण करा, कारण मी तुम्हास समर्पित आहे;
तुमच्यावर भरवसा ठेवणार्या सेवकाला वाचवा,
तुम्ही माझे परमेश्वर आहात; 3हे प्रभू, माझ्यावर कृपा करा,
कारण मी दिवसभर तुमचा धावा करतो.
4हे प्रभू, माझ्या जीवाला आनंद द्या,
कारण मी केवळ तुमच्यावरच श्रद्धा ठेवली आहे.
5हे प्रभू, तुम्ही क्षमाशील आणि चांगले आहात,
तुमच्याकडे धाव घेणार्या सर्वांवर तुम्ही विपुल दया करता.
6याहवेह, माझी प्रार्थना ऐका;
तुमच्या कृपेसाठी केलेला माझा धावा ऐका.
7मी आपल्या संकटसमयी तुमचा धावा करेन,
कारण तुम्ही मला उत्तर देता.
8हे प्रभू, सर्व दैवतांमध्ये तुमच्यासारखा परमेश्वर कुठेही नाही;
तुमची महत्कृत्ये अतुलनीय आहेत.
9हे प्रभू, तुम्ही निर्माण केलेली सर्व राष्ट्रे,
तुमच्यासमोर सन्मानाप्रत येतील व तुमची आराधना करतील;
तुमच्या पवित्र नामाची थोरवी गातील.
10कारण तुम्ही महान आहात आणि अद्भुत चमत्कार करता;
तुम्हीच एकटे परमेश्वर आहात.
11हे याहवेह, तुमचे मार्ग मला शिकवा,
म्हणजे तुमच्या विश्वासूपणावर मी भरवसा ठेवेन;
मला एकचित्त हृदय प्रदान करा,
म्हणजे मी तुमच्या नावाचे भय बाळगेन.
12माझ्या प्रभू परमेश्वरा, मी माझ्या संपूर्ण हृदयाने तुमचे स्तवन करेन;
मी तुमच्या नामाला सदासर्वकाळ गौरव देईन.
13कारण माझ्यावर तुम्ही अत्यंत प्रीती करता;
अधोलोकाच्या तळापासून
तुम्ही माझे प्राण सोडविले आहेत.
14हे परमेश्वरा, उन्मत्त शत्रू माझ्यावर हल्ला करतात;
निर्दयी लोकांची टोळी माझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहे—
त्यांना तुमची काहीही कदर नाही.
15परंतु हे प्रभू, तुम्ही कृपाळू व दयाळू परमेश्वर आहात,
मंदक्रोध, अति करुणामय आणि विश्वसनीयतेने संपन्न आहात.
16माझ्याकडे वळून मजवर दया करा;
आपल्या सेवकाच्या वतीने आपले सामर्थ्य दाखवून द्या;
माझे तारण करा, कारण माझ्या आईप्रमाणेच
मी देखील तुमची सेवा करतो.
17तुमची माझ्यावरील कृपा दाखविणारे चिन्ह मला द्या,
म्हणजे माझे शत्रू ते पाहतील व लज्जित होतील,
कारण हे याहवेह, तुम्ही मला साहाय्य केले आणि माझे समाधान केले.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 86: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.