YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 34

34
स्तोत्र 34
दावीदाचे स्तोत्र; जेव्हा अबीमेलेखापुढे त्याने वेडा झाल्याचे ढोंग केल्यावर त्याला हाकलून लावण्यात आले आणि तो निघून गेला.
1मी सर्व समयी याहवेहचा धन्यवाद करेन;
माझ्या ओठांनी मी त्यांची निरंतर स्तुती करेन.
2याहवेहने माझ्यावर केलेल्या दयेची मी प्रतिष्ठा मिरवीन;
हे ऐकून दीनजन हर्ष करोत.
3तुम्ही माझ्याबरोबर याहवेहची स्तुती करा;
आपण सर्व मिळून त्यांच्या नावाला उंच करू या.
4कारण मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले;
त्यांनी मला माझ्या सर्व भयांपासून सोडविले.
5जे त्यांच्याकडे पाहतात ते तेजस्वी होतात;
त्यांचे मुख कधीही लज्जास्पद स्थितीत राहत नाही.
6या पामराने याहवेहचा धावा केला आणि त्यांनी तो ऐकला;
त्याच्या सर्व संकटातून त्यांनी त्याला सोडविले.
7याहवेहचे भय धरणार्‍याभोवती त्यांचे देवदूत छावणी देतात
आणि त्याला ते सोडवितात.
8याहवेह किती चांगले आहेत याचा अनुभव घ्या;
जे त्यांच्यावर भाव ठेवतात ते धन्य.
9याहवेहची पवित्र प्रजा, त्यांचे भय बाळगा,
कारण जे त्यांचे भय बाळगतात, त्यांना काही उणे पडत नाही.
10तरुण सिंहदेखील दुर्बल होतील व उपाशी राहतील,
परंतु याहवेहचा शोध घेणार्‍यांना कोणत्याही उत्तम गोष्टीची उणीव पडणार नाही.
11माझ्या लेकरांनो या आणि माझे ऐका;
याहवेहचे भय कसे धरावे, हे मी तुम्हाला शिकवेन.
12तुमच्यापैकी जो जीवनावर प्रीती करतो
आणि अनेक चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो,
13तर तू आपली जीभ वाईटापासून
आणि आपले ओठ असत्य बोलण्यापासून राखावे.
14वाईटाचा त्याग कर आणि चांगले ते कर;
शांतीचा शोध घे व तिच्यामागे लाग.
15याहवेहचे नेत्र नीतिमानांवर आहेत,
आणि त्यांचे कान नीतिमानांच्या आरोळीकडे लागलेले असतात.
16परंतु जे वाईट करतात, याहवेहचे मुख त्यांच्याविरुद्ध आहे,
त्यांची नावे ते पृथ्वीवरून पुसून टाकतात.
17याहवेह नीतिमानाचा धावा ऐकून,
त्यांना सर्व संकटामधून सोडवितात.
18याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात
आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात.
19नीतिमानावर संकटे येत नाहीत असे नाही,
परंतु याहवेह त्याला प्रत्येक संकटातून सोडवितात.
20ते त्याच्या प्रत्येक हाडांचे रक्षण करतात,
त्यातील एकही मोडणार नाही.
21दुष्टांची दुष्टाई त्यांचा नाश करेल;
जे नीतिमानांचे शत्रू आहेत, त्यांना शिक्षा होईल.
22जे त्यांची सेवा करतात, त्यांचा याहवेह उद्धार करतील;
जे त्यांचा आश्रय घेतात ते दंडित होणार नाहीत.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 34: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन