YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 35

35
स्तोत्र 35
दावीदाचे स्तोत्र.
1याहवेह, जे माझ्याशी लढतात त्यांच्याविरुद्ध तुम्हीच लढा;
जे माझ्यासोबत युद्ध करतात, तुम्हीच त्यांच्याशी युद्ध करा.
2तुम्ही चिलखत आणि ढाल घ्या;
व उठून माझी मदत करा.
3माझ्यामागे येणार्‍या
लोकांविरुद्ध भाला घेऊन त्यांचा मार्ग अडवा.
माझ्या आत्म्यास आश्वासन द्या,
“मी तुझे तारण आहे.”
4जे मला ठार करण्याचा प्रयत्न करीत आहेत,
त्यांची तुम्ही धूळधाण करा;
त्यांना मागे फिरवा
आणि त्यांना लज्जित करा.
5वार्‍याने उडणार्‍या भुशाप्रमाणे,
याहवेहचा दूत त्यांना उडवून लावो;
6त्यांच्यापुढील मार्ग हा अंधाराचा व निसरडा करा,
याहवेहचा दूत त्यांचा पाठलाग करो.
7विनाकारण त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला
आणि विनाकारण माझ्यासाठी खड्डा खणला आहे.
8सर्वनाश अचानक त्यांच्यावर ओढवो—
त्यांनी लावलेल्या सापळ्यात
ते स्वतःच अडकोत व त्या खड्ड्यात पडोत व नष्ट होवोत.
9तेव्हा माझा जीव याहवेहमध्ये आनंद करेल
आणि त्यांनी सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्षित होईल.
10माझे संपूर्ण अस्तित्व ओरडून म्हणेल,
“याहवेह, तुमच्यासारखा कोण आहे?
तुम्हीच दुबळ्यांची बलवान लोकांपासून आणि लुबाडणार्‍यांपासून
गरीब आणि गरजवंतांची सुटका करता.”
11हे दुष्ट लोक शपथेवर खोटे बोलतात;
ज्या गोष्टींची मला जाणीवही नाही, अशा गोष्टीचे आरोप ते मजवर करतात.
12ते माझ्या बर्‍याची फेड वाईटानेच करतात.
माझा जीव शोकग्रस्त झाला आहे.
13ते आजारी असताना, मी गोणपाट नेसून शोक केला;
नम्र होऊन मी त्यांच्यासाठी उपास केले.
परंतु माझ्या प्रार्थना उत्तर न मिळताच माझ्याकडे परत आल्या.
14मी असा विलाप केला जणू काय
मी माझ्या मित्रासाठी किंवा भावासाठी विलाप करीत आहे.
मी असा शोक केला जसा मी
माझ्या आईसाठी शोक करीत आहे.
15पण आता मी संकटात सापडलो असताना त्यांना आनंद होत आहे.
माझ्यावर आक्रमण करणारे मला माहीत नसताना एकत्र येऊन,
माझी एकसारखी निंदा करतात.
16ते नास्तिकाप्रमाणे माझी क्रौर्याने थट्टा करीत होते;
माझ्यावर दातओठ खात होते.
17हे प्रभू, तुम्ही केव्हापर्यंत पाहत राहणार?
त्यांच्या वाईट कृत्यापासून माझा बचाव करा,
सिंहासारख्या या दुष्टांपासून माझे रक्षण करा.
18महासभेत मी तुमचे आभार व्यक्त करेल;
मोठ्या मेळाव्यासमोर मी तुमची उपकारस्तुती करेन.
19जे विनाकारण माझे शत्रू बनले आहेत,
त्यांना आता माझा उपहास करण्यात आनंद करू देऊ नका;
निष्कारण जे माझे विरोधी झाले आहेत
त्यांना डोळे मिचकाविण्याची संधी देऊ नका.
20ते शांतता प्रस्थापित करण्यासंबंधी
चर्चा न करता, शांतीने राहणार्‍या निरपराध
लोकांविरुद्ध कट करण्यासंबंधी चर्चा करीत असतात.
21ते आपले तोंड उघडून माझ्याविरुद्ध ओरडून सांगतात,
“अहाहा! अहाहा! आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे.”
22याहवेह, सत्य तुमच्या दृष्टीत आहे; तुम्ही शांत राहू नका;
हे प्रभू, आता माझ्यापासून दूर राहू नका.
23हे माझ्या परमेश्वरा, माझ्या प्रभू,
माझ्या सुरक्षेसाठी उठा, माझ्याकरिता युद्ध करा.
24याहवेह माझ्या परमेश्वरा आपल्या नीतिमत्तेने मला निर्दोष जाहीर करा;
त्यांनी मजविरुद्ध आनंद करू नये.
25त्यांनी असे मनात बोलू नये, “हा हा हा! आम्हाला असेच हवे होते;
आम्ही त्याला गिळून टाकले.” असे त्यांना बोलू देऊ नका.
26माझी संकटे पाहून आनंद करणार्‍यांना
लज्जित आणि निराश करा;
जे माझ्यापुढे प्रौढी मिरवितात,
त्यांना लज्जित आणि अपमानित करा.
27परंतु माझे कल्याण व्हावे असे इच्छा करणार्‍या
सर्वांना मोठा आनंद प्राप्त होऊ द्या;
त्यांना आनंदाने ओरडू द्या, “आपल्या सेवकाला आनंदाने साहाय्य करणारे
याहवेह किती थोर आहेत.”
28माझी जीभ तुमच्या नीतिमत्वाची घोषणा करणार
आणि दिवसभर तुमची उपासना करीत राहणार.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 35: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन