नहूम 2
2
निनवेहचा पाडाव
1हे निनवेह, एक आक्रमक तुझ्याविरुद्ध येत आहे.
आपल्या गडांवर पहारा दे,
मार्गांची रखवाली कर,
मोर्चा बांध,
आपल्या सर्व शक्तिनिशी सैन्यांची संरक्षक फळी मजबूत कर!
2जरी संहारकाने तो देश उद्ध्वस्त केला आहे
आणि त्यांचे द्राक्षमळे नष्ट केले आहेत तरी,
इस्राएलच्या वैभवासारखे
याहवेह याकोबाचे वैभव पुनर्स्थापित करणार आहेत.
3ज्या दिवसाची त्यांनी तयारी केली आहे;
त्या दिवसासाठी रथांवरील धातू चकाकत आहेत,
सैनिकांच्या ढाली तांबड्या आहेत;
योद्धे किरमिजी पेहराव केलेले आहेत
सनोवरचे भाले परजलेले आहेत.
4रथही मार्गांवरून बेफामपणे धावत आहेत,
चौकातून झपाट्याने मागेपुढे होत आहेत.
ते प्रज्वलित मशालीप्रमाणे दिसत आहेत;
ते वीजगतीने दौडत आहेत.
5निनवेहने आपल्या निवडक सैनिकांना पाचारण केले आहे,
तरी ते आपल्या मार्गांवर अडखळत आहेत.
ते तटाच्या भिंतीकडे धाव घेतात;
संरक्षक ढाल नियोजित ठिकाणी ठेवलेली आहे.
6नदीकडचे दरवाजे सताड उघडले गेले आहेत
आणि राजवाडे ढासळत आहेत.
7अशी राजाज्ञा सुनावण्यात आली आहे,
की निनवेहला बंदिवासात टाकून नेण्यात यावे.
तिच्या दासी पारव्यांच्या घुमण्याप्रमाणे विलाप करीत आहेत
आणि त्यांचे ऊर बडवित आहेत.
8निनवेह एखाद्या जलाशयाप्रमाणे आहे
जिचे पाणी गळून चालले आहे.
“थांबा, थांबा,” ते ओरडतात,
पण कोणीही वळून तिच्याकडे परत येत नाही.
9चांदी लुटा!
सोने लुटा!
निनवेहची संपत्ती
येथील मौल्यवान वस्तूंचा अमर्याद संग्रह आहे!
10ती लुटल्या गेली, लुबाडल्या गेली व विवस्त्र करण्यात आली आहे!
तिच्या लोकांची अंतःकरणे वितळून गेली आहेत व गुडघे निकामी झाले आहेत,
त्यांची शरीरे थरथर कापत आहेत व त्यांचे चेहरे फिके पडले आहेत.
11ती सिंहाची गुहा कुठे आहे
जिथे ते त्यांच्या बछड्यांचे पालनपोषण करीत असत,
जिथे सिंह आणि सिंहिणी जातात, कोवळी मुलेदेखील निर्भयतेने राहात असत,
आणि त्यांच्या बछड्यांना कशाचेही भय नसे?
12सिंह आपल्या बछड्यांना पुरेलशी शिकार करत असे
व आपल्या सिंहिणींना भक्ष्य पुरविण्यासाठी सावजाची नरडी दाबून ठार मारत असे,
आपल्या गुहेत ते जमा करीत असत
आणि आपली गुहा भक्षांनी भरून टाकीत असत.
13सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात:
“मी तुझ्याविरुद्ध उठलो आहे,
मी तुझे रथ भस्म करून त्यांचा धूर करेन,
आणि तलवार तुझ्या सिंहाच्या बछड्यांना गिळंकृत करेल.
मी पृथ्वीवर तुझ्यासाठी एकही भक्ष ठेवणार नाही.
तुझ्या संदेशवाहकांचे आवाज
यापुढे कधीही ऐकू येणार नाहीत.”
सध्या निवडलेले:
नहूम 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.