नहूम 3
3
निनवेहला धिक्कार असो
1हे रक्तपात करणाऱ्या नगरी, तुला धिक्कार असो,
लबाड्यांनी गच्च भरलेली,
लूटमाऱ्यांनी भरलेली,
कधीही पीडितांशिवाय नसणारी!
2चाबकांच्या फटकार्यांचा आवाज,
चाकांचा खडखडाट,
चौखूर धावणारे घोडे
आणि हिसके देणारे रथ!
3आक्रमक घोडेस्वारांची पलटण
लखलखणार्या तलवारी
चमचमणारे भाले!
पडलेली अनेक प्रेते,
सर्वत्र मृतांचे ढीग,
अगणित मृत शरीरे,
प्रेतांना अडखळून पडणारे लोक—
4या सर्वांचे कारण, एका वेश्येच्या रंगेलपणाची वासना,
ती भुलविणारी, जादूटोण्याची स्वामिनी आहे,
तिने आपल्या वेश्यागिरीने राष्ट्रांना
आणि जादूटोण्याने लोकांना गुलाम बनविले.
5सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, “मी तुझ्याविरुद्ध आहे,
मी तुझे वस्त्र तुझ्या चेहऱ्यावर उचलेन.
तुझी नग्नता सर्व राष्ट्रांना
आणि तुझी लज्जा सर्व देशांना दाखवेन.
6मी तुझ्यावर घृणास्पद गोष्टी फेकेन,
मी तुला अपमानित करेन
आणि तुला तमाशा बनवेन.
7तुला पाहणारे सर्व भयभीत होऊन तुझ्यापासून दूर पळतील व म्हणतील,
‘निनवेह उद्ध्वस्त झाली आहे—तिच्यासाठी कोण शोक करेल?’
तुझे सांत्वन करणारा मला कुठे मिळेल?”
8नाईल नदीकाठी वसलेल्या,
सर्व बाजूंनी पाण्याने घेरलेल्या
थेबेस नगरीपेक्षा तू अधिक चांगली आहेस काय?
नदीच तिला संरक्षण देते,
नदीच तिची तटबंदी आहे.
9कूश#3:9 नाईल नदीचा वरचा भाग आणि इजिप्त तिचे अपरिमित सामर्थ्य होते;
पूट व लिबिया तिच्या मित्रराष्ट्रांपैकी होते.
10असे असूनही थीब्जचा पाडाव झाला
आणि तिला बंदिवासात नेण्यात आले.
तिची बालके रस्त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यावर
दगडांवर आपटून ठार मारण्यात आली.
तिच्या अधिकार्यांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या,
तिच्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना साखळदंडानी बांधण्यात आले.
11तू देखील मद्यपीप्रमाणे धुंद होशील;
तू लपून बसशील
आणि सुरक्षिततेसाठी तुझ्या शत्रूपासून आश्रय शोधशील.
12तुझे सर्व गड अंजिरांच्या झाडासारखे होतील
त्यांच्या प्रथम पिकलेल्या फळांगत;
जेव्हा ते हलविले जातात,
तेव्हा ते नेमके खाणाऱ्याच्या तोंडात पडतात.
13तुझ्या सैन्य-दलांकडे पाहा—
ते सर्व दुर्बल आहेत.
तुझ्या देशाच्या वेशी
तुझ्या शत्रूंसाठी सताड उघडलेल्या आहेत;
तुझ्या वेशीच्या सळया अग्नीने भस्म केल्या आहेत.
14तुला पडणार्या वेढ्यासाठी पाण्याचा साठा करून ठेव,
तुझे किल्ले मजबूत कर!
चिखल तुडवून ठेव,
चिखलाचा गारा साच्यांत भर,
वीटकाम दुरुस्त कर!
15तिथे तुला अग्नी भस्म करेल;
तलवार तुला कापून टाकेल—
एखाद्या टोळधाडीप्रमाणे ते तुला गिळंकृत करतील.
नाकतोड्यासारखे बहुगुणित व्हा,
टोळांसारखे बहुगुणित व्हा!
16तू तुझ्या व्यापार्यांची संख्या वाढविली आहे
त्यांची संख्या आकाशातील तार्यांपेक्षाही जास्त वाढली आहे,
परंतु ते एखाद्या टोळधाडीप्रमाणे संपूर्ण भूमी ओरबाडून टाकतात
व मग ते उडून जातात.
17तुझे रक्षक टोळांसारखे आहेत,
तुझे अधिकारी टोळांच्या झुंडीप्रमाणे आहेत
थंडीच्या दिवसात ते भिंतीमध्ये वसतात—
पण सूर्योदय होताच उडून जातात,
आणि कुठे जातात ते कोणालाच कळत नाही.
18हे अश्शूरच्या राजा, तुझे मेंढपाळ#3:18 अधिपती डुलकी घेतात;
तुझे प्रतिष्ठित लोक विश्रांती घेण्यासाठी पहुडले आहेत.
तुझे लोक डोंगरांवर विखुरले आहेत
त्यांना एकत्र करण्यास कोणीही नाही.
19तुला कशानेही आरोग्य मिळणार नाही;
तुझी जखम घातक आहे.
तुझ्या दुर्दशेची बातमी जे कोणी ऐकतील
ते सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवितील,
तुझ्या क्रूरतेचा उपद्रव ज्याला झाला नाही,
असा कोण आहे?
सध्या निवडलेले:
नहूम 3: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.