YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहूम 1

1
1निनवेहविषयी भविष्यवाणी. एल्कोशवासी नहूमच्या दृष्टान्ताचे पुस्तक.
निनवेहविषयी याहवेहचा क्रोध
2याहवेह ईर्ष्यावान व सूड घेणारे परमेश्वर आहेत;
याहवेह सूड घेणारे आणि क्रोधाने भरलेले आहेत.
त्यांच्या शत्रूंचा ते सूड घेतात
आणि आपला कोप त्यांच्याविरुद्ध मोकळा करतात.
3याहवेह मंदक्रोध आहेत, पण अत्यंत सामर्थ्यशाली आहेत;
याहवेह दुष्टांना शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही.
त्यांचे मार्ग चक्रीवादळ व वादळामधून जातात.
ढग त्यांच्या पायाखालची धूळ आहेत.
4ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो;
ते सर्व नद्यांना कोरडे करतात.
बाशान व कर्मेल मलूल होतात;
लबानोनचा मोहोर कोमेजतो.
5त्यांच्यासमोर पर्वत कंपित होतात
व टेकड्या विरघळतात.
पृथ्वी आणि जग व त्यात राहणारे सर्वजण
त्यांच्या समक्षतेत थरकापतात.
6संतप्त याहवेहपुढे कोणाचा निभाव लागेल?
त्यांचा क्रोध कोण सहन करू शकेल?
त्यांचा उग्र क्रोध अग्नीसारखा ओतला जातो;
त्यांच्यापुढे खडक ढासळून पडतात.
7याहवेह चांगले आहेत,
संकटसमयी आश्रयस्थान आहेत.
त्यांच्यावर भरवसा ठेवणार्‍या प्रत्येकाची ते काळजी घेतात.
8परंतु भयंकर महापुराने
ते निनवेहचा अंत करतील;
त्यांच्या शत्रूचा ते अंधकाराच्या साम्राज्यातही पाठलाग करतात.
9याहवेहच्या विरुद्ध ते जे काही कारस्थान करतात#1:9 किंवा तुम्ही जे शत्रू ते याहवेहविरुद्ध काय कट रचता?
त्याचा ते अंत करतील;
ते संकट दुसऱ्यांदा येणार नाही.
10याहवेहचे शत्रू काटेरी झुडूपात गुंतून पडतील
आणि स्वतःचेच मद्य पिऊन ते धुंद होतील;
वाळलेल्या गवताप्रमाणे ते अग्नीमध्ये भस्म होतील.
11हे निनवेह, तुमच्यापैकी कोण आहे
जो याहवेहविरुद्ध कट रचेल
आणि दुष्ट योजना करू शकेल?
12याहवेह असे म्हणतात:
“यद्यपि त्यांना अनेक दोस्त राष्ट्र आहेत व ते असंख्य आहेत,
तरी ते नष्ट होतील व त्यांचे अस्तित्व नाहीसे होईल.
हे यहूदाह, मी जरी तुला पीडित केले,
तरी आता मी तुला पीडा देणार नाही.
13आता मी तुमच्या मानेवरील जू मोडून टाकीन
आणि तुमच्या शृंखला तोडून टाकीन.”
14हे निनवेह, याहवेहने तुझ्याविषयी आज्ञा दिली आहे:
“तुझे नाव पुढे चालविणारी कोणीही संतती राहणार नाही.
आणि जी तुझ्या दैवताच्या मंदिरात आहेत
ती तुझी दैवते आणि मूर्ती मी नष्ट करेन.
मी तुझी कबर तयार करेन,
कारण तू तिरस्करणीय आहेस.”
15पाहा, पर्वतांवरून संदेशवाहक येत आहेत,
ज्यांची पावले एक शुभवार्ता आणत आहेत,
जे शांतीची घोषणा करतात!
हे यहूदाह, तू तुझे सण साजरे कर,
आणि तुझे नवस फेड.
कारण आता कोणी दुष्ट लोक तुझ्यावर आक्रमण करणार नाहीत;
त्यांचा कायमचा उच्छेद होईल.

सध्या निवडलेले:

नहूम 1: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन