YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मीखाह 4

4
याहवेहचे पर्वत
1पण शेवटच्या दिवसात
याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच
असे स्थापित केले जातील;
सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जातील,
आणि लोकांचा लोंढा त्याकडे एकत्र येईल.
2अनेक राष्ट्रे येतील आणि म्हणतील,
“चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे,
याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ.
ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील,
म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.”
कारण सीयोनमधून नियमशास्त्र,
यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.
3ते देशांमधील अनेक लोकांचा न्याय करतील,
दूरदूरच्या बलाढ्य राष्ट्रांमधील वाद मिटवतील.
ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील,
व भाल्यांचे आकडे बनवतील.
एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही,
तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.
4प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेलीखाली
आणि आपआपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल,
आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही,
कारण सर्वसमर्थ याहवेहने म्हटले आहे.
5सर्व राष्ट्रे
आपआपल्या दैवतांच्या नावाने चालतील,
पण आम्ही नेहमी
याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावाने चालत राहू.
याहवेहची योजना
6याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी,
मी लंगड्यांना एकत्र करेन;
बहिष्कृत लोकांना
आणि ज्यांना मी दुखविले आहे त्यांनाही एकत्र करेन.
7मी लंगड्यांना माझे अवशेष करेन,
आणि बहिष्कृत लोकांना एक बलाढ्य राष्ट्र करेन.
त्या दिवसापासून याहवेह सीयोन पर्वतावरून
सदासर्वदा राज्य करतील.
8आणि तू, कळपाच्या टेहळणीच्या बुरुजा,
सीयोन कन्येच्या मजबूत किल्ल्या,#4:8 किंवा पर्वत
तुझे पूर्वीचे राज्य तुला परत देण्यात येईल;
यरुशलेमच्या कन्येला सिंहासन दिले जाईल.”
9तू आता मोठ्याने का रडत आहेस—
तुला राजा नाही काय?
तुमचा अधिकारी नष्ट झाला आहे काय,
म्हणून तुम्ही स्त्रीच्या प्रसूती वेदनांप्रमाणे व्याकूळ झाला आहात काय?
10हे सीयोनच्या कन्ये,
बाळंतपणाच्या प्रसूती वेदनांनी कण्हत राहा,
कारण तू आता शहर सोडून
मोकळ्या मैदानात तळ ठोकला पाहिजे.
तू बाबेलला जाशील;
आणि तिथे तुझी सुटका होईल
आणि याहवेह तिथून तुम्हाला
तुमच्या शत्रूंच्या हातातून मुक्त करतील.
11पण आता पुष्कळ राष्ट्रे
तुमच्याविरुद्ध एकत्र झाली आहेत.
ते म्हणतात, “तिला अशुद्ध होऊ द्या,
आपण सीयोनेवर दुष्ट नजर टाकून आनंद करू!”
12पण त्यांना
याहवेहचे विचार माहीत नाहीत;
त्यांना याहवेहच्या योजना समजत नाही,
खळ्यातील पेंढ्यांप्रमाणे याहवेहने त्यांना गोळा केले आहे.
13“अगे सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर;
कारण मी तुला लोखंडाची शिंगे
व कास्याचे खूर देईन,
आणि तू अनेक राष्ट्रांचे तुकडे करशील.”
त्यांची लूट तू याहवेहला,
त्यांची संपत्ती सर्व पृथ्वीच्या प्रभूला अर्पण करशील.

सध्या निवडलेले:

मीखाह 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन