मीखाह 5
5
बेथलेहेमातून अधिपती देण्याचे अभिवचन
1हे सैन्याच्या नगरी, आता आपल्या सैन्याला एकत्र करा,
कारण आमच्याविरुद्ध वेढा पडला आहे.
ते काठीने इस्राएलाच्या
शासकाच्या गालावर मारतील.
2“परंतु, तू हे बेथलेहेम एफ्राथा,
तू जरी यहूदीयाच्या वंशजांपैकी सर्वात लहान आहेस,
तरी तुझ्यातून माझ्यासाठी
इस्राएलचा शासक उदय पावेल,#5:2 किंवा अधिपती
ज्याची उत्पत्ती
प्राचीन काळातील आहे.”
3म्हणून प्रसूती वेदनेत असलेली
एका मुलाला जन्म देईपर्यंत
आणि तिचे बाकीचे भाऊ परत इस्राएल लोकांमध्ये येईपर्यंत
इस्राएलचा त्याग केला जाईल.
4तो याहवेहच्या सामर्थ्याने,
याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाच्या वैभवात उठेल
आणि आपल्या कळपाचा मेंढपाळ होईल आणि ते सुरक्षित राहतील,
कारण तेव्हा पृथ्वीच्या टोकापर्यंतच्या लोकांना
याहवेहची महानता कळेल.
5ते पुरुष#5:5 ते पुरुष अर्थात् याहवेह आपली शांती असतील
जेव्हा अश्शूरी आपल्या देशावर हल्ला करतील
आणि आपल्या किल्ल्यांमध्ये प्रवेश करतील,
तेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध सात मेंढपाळ,
आठ देखील सेनापती उभे करू,
6अश्शूर देशावर तलवारीने,
निम्रोदाच्या देशावर उपसलेल्या तलवारीने कोण शासन#5:6 किंवा चुराडा करेल.
अश्शूरचे लोक जेव्हा आपल्या देशावर आक्रमण करतील
आणि आपली सीमा ओलांडतील
तेव्हा याहवेह आपल्याला त्यांच्यापासून सोडवतील.
7याकोबाचे उरलेले लोक
अनेक लोकांमध्ये असतील,
ते याहवेहने पाठविलेल्या दहिवराप्रमाणे,
गवतावर पडणाऱ्या पावसाप्रमाणे असतील,
जे कोणाचीही वाट पाहत नाही
आणि कोणा मनष्यावर अवलंबून राहत नाही.
8याकोबाचे अवशेष राष्ट्रांमध्ये
आणि अनेक लोकांमध्ये असणार,
जंगली श्वापदांमध्ये सिंहासारखे
आणि मेंढरांच्या कळपामध्ये तरुण सिंहासारखे असतील,
ते त्यांच्यावर झेप घेतील आणि त्यांना ठार करीत पुढे जातील
आणि कोणीही त्यांना वाचवू शकत नाही.
9तुझ्या शत्रूंवर विजय मिळवून तुझा हात उंच होईल
आणि तुझ्या सर्व शत्रूंचा नाश होईल.
10“त्या दिवशी,” याहवेह ही घोषणा करतात,
“मी तुमच्या घोड्यांचा तुमच्यामध्ये नाश करेन
आणि तुमच्या रथांनाही नष्ट करेन.
11मी तुझ्या देशातील शहरांचा नाश करेन
आणि तुझे किल्ले उद्ध्वस्त करेन.
12मी तुमच्यातील चेटके नष्ट करेन
आणि यापुढे तुझ्यामध्ये कोणीही शकुन पाहणार नाही.
13मी तुमच्या मूर्ती
आणि तुमच्यातील पवित्र दगडांचा नाश करेन;
तुमच्या हस्तकृतींना
तुम्ही पुन्हा दंडवत करणार नाही.
14जेव्हा मी तुझी नगरे उद्ध्वस्त करेन,
तेव्हा तुझे अशेरा स्तंभ#5:14 किंवा अश्शेरा देवीचे लाकडी चिन्ह उपटून टाकीन.
15ज्या राष्ट्रांनी माझी आज्ञा पाळली नाही,
त्यांचा मी रागाने आणि क्रोधाने सूड उगवेन.”
सध्या निवडलेले:
मीखाह 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.