मीखाह 2
2
मानवी योजना आणि परमेश्वराच्या योजना
1जे वाईट कृत्याची योजना करतात,
जे आपल्या अंथरुणावर कट रचतात, त्यांचा धिक्कार असो!
पहाट होताच ते त्यांचा कट पूर्ण करतात
कारण हे सामर्थ्य त्यांच्या हातात असते.
2ते लोभीपणाने इतरांची शेते बळकावतात,
दुसऱ्यांची घरेही हिसकावून घेतात.
ते कपटाने लोकांची घरे बळकावतात
आणि त्यांच्या पूर्वजांची संपत्ती लुटतात.
3म्हणून याहवेह म्हणतात:
“मी या लोकांविरुद्ध विपत्ती योजत आहे,
ज्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही.
तुम्ही पुन्हा कधीही गर्वाने चालणार नाही,
कारण तो आपत्तीचा काळ असेल.
4त्या दिवशी लोकांकरिता तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल;
ते तुम्हाला या विलाप गीताने टोमणे मारतील:
‘आमचा संपूर्ण नाश झाला आहे;
माझ्या लोकांच्या मालमत्तेची विभागणी झाली आहे.
ते ती माझ्यापासून काढून घेतात!
ते आमची शेते बंडखोरांना देतात.’ ”
5म्हणून याहवेहच्या सभेत चिठ्ठ्या टाकून
सूत्राने जमिनीची वाटणी करण्यास तुमच्याकडे कोणी राहणार नाही.
खोटे संदेष्टे
6त्यांचे संदेष्टे म्हणतात, “संदेश देऊ नका,
या गोष्टींबद्दल संदेश देऊ नका;
आमच्यावर अप्रतिष्ठा येणार नाही.”
7हे याकोबाच्या घराण्या, “असे म्हटले जावे काय,
याहवेह#2:7 याहवेह किंवा याहवेहचा आत्मा अधीर होतात काय?
ते अशी कामे करतात काय?
“ज्याचे मार्ग सरळ आहेत त्याचे
माझे शब्द भले करत नाहीत काय?
8अलीकडे माझे लोक
शत्रूसारखे उठले आहेत.
जे लोक निष्काळजीपणे जवळून जातात
त्यांचे किमती कपडे तुम्ही काढून घेता,
जसे युद्धातून परत येणारे पुरुष करतात.
9तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना
त्यांच्या सुखी घरातून हाकलून देतात.
तुम्ही त्यांच्या मुलांकडून
माझे आशीर्वाद कायमचे हिरावून घेता.
10उठा, चालते व्हा!
कारण हे तुमचे विश्रांतिस्थान नाही,
कारण हे अशुद्ध झाले आहे,
सर्व उपायांच्या पलीकडे, ते उद्ध्वस्त झाले आहे.
11जर एखादा लबाड आणि फसवणूक करणारा येऊन म्हणाला,
‘मी तुम्हाला भरपूर द्राक्षारस व मद्याची भविष्यवाणी करेन,’
तर अशीच व्यक्ती या लोकांसाठी योग्य संदेष्टा होईल!
सुटकेचे अभिवचन
12“हे याकोबा, मी तुम्हा सर्वांना निश्चित गोळा करेन;
इस्राएलच्या उरलेल्यांना मी खचित गोळा करेन.
जसे मेंढवाड्यात मेंढरे,
जसे कुरणात कळप, तसे मी त्यांना एकत्र गोळा करेन;
आणि ती जागा लोकांनी फुलून जाईल.
13जे कुंपण तोडून मार्ग उघडणारे त्यांच्या पुढे जातील;
ते द्वार तोडून त्यातून बाहेर जातील.
त्यांचा राजा त्यांच्या पुढे जाईल,
याहवेह त्यांचे पुढारी असतील.”
सध्या निवडलेले:
मीखाह 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.